५० हजारांची लाच स्वीकारणारा शाखा अभियंता एसीबीच्या जाळयात

0
17

गडचिरोली, दि..९: महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामाचे देयक काढून देणे व मोजमाप करण्याचा मोबदला म्हणून संबंधित इसमाकडून ५० हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज आरमोरी पंचायत समितीचा शाखा अभियंता(वर्ग ३) मनोज झेबाजी मोटघरे(५०)यास रंगेहाथ पकडून अटक केली.
आरमोरी पंचायत समितींतर्गत वडधा ग्रामपंचायतीच्या हद्दीत २०१४-१५ या वर्षी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कामे करण्यात आली. मनोज मोटघरे याने या कामाचे मोजमाप दस्तऐवज(एमबी) तयार करुन १ लाख्‍ ८७ हजार ८८४ रुपये मंजूर करुन दिले. परंतु या कामाचा मोबदला म्हणून मोटघरे याने संबंधित इसमास ५५ हजारांची लाच मागितली. परंतु तडजोडीअंती मोटघरे ५० हजार घेण्यास तयार झाला. तरीही त्या इसमाची लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्याने गडचिरोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार एसीबीच्या अधिकाऱ्यांनी आज दुपारी सापळा रचला आणि संबंधित इसमाकडून ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना शाखा अभियंता मनोज मोटघरे यास त्याच्या निवासस्थानी रंगेहाथ पकडून अटक केली. संध्याकाळी उशिरापर्यंत मोटघरेच्या घराची झडती घेणे सुरु होते.
एसीबीचे पोलिस उपअधीक्षक रोशन यादव यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक एम.एस.टेकाम, दामदेव मंडलवार, सहायक फौजदार मोरेश्वर लाकडे, हवालदार विठोबा साखरे, सत्यम लोहंबरे, रवींद्र कत्रोजवार, सतीश कत्तीवार, सुधाकर दंडिकवार, गणेश वासेकर, महेश कुकुडकार, मिलिंद गेडाम, सोनल आत्राम, घनश्याम वडेट्टीवार आदींनी ही कारवाई केली.