भंडारा जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी 30 जूनऐवजी 4 जुलैला मतदान- ज.स. सहारिया

0
24

मुंबई, दि. ११ –: भंडारा जिल्हा परिषद व त्या अंतर्गतच्या सात पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या कार्यक्रमात उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अनुषंगाने बदल करण्यात आला असून आता 30 जूनऐवजी 4 जुलैला मतदान तर 6 जुलै 2015 रोजी मतमोजणी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली.

श्री. सहारिया यांनी सांगितले की, भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गतच्या 15 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक तसेच इतर सहा जिल्हा परिषदांच्या सहा निवडणूक विभाग आणि दहा जिल्ह्यांमधील 11 पंचायत समित्यांच्या 12 निर्वाचक गणांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने 4 जून 2015 रोजी जाहीर केला होता. परंतु भंडारा जिल्हा परिषद व त्याअंतर्गतच्या पंचायत समित्यांच्या प्रभाग रचनेसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवरील निर्णयाच्या अनुषंगाने प्रभाग रचनेची सुधारित अधिसूचना तयार करावी लागणार आहे. त्यामुळे भंडारा जिल्हा परिषद व त्या अंतर्गतच्या पंचायत समित्यांच्या निवडणूक कार्यक्रमात बदल करण्यात आला आहे. गोंदिया जिल्हा परिषद व त्या अंतर्गतच्या पंचायत समित्या तसेच इतर सर्व पोटनिवडणुका पूर्व घोषित कार्यक्रमानुसार होतील.

भंडारा जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या प्रभाग रचनेची सुधारित अंतिम अधिसूचना 12 जून 2015 रोजी जाहीर केली जाणार आहे. जिल्हा परिषदेचा मुरमाडी/तूप आणि पालांदूर निवडणूक विभाग तसेच पंचायत समितीच्या मेंढाटोला व किटाळी निर्वाचक गणाच्या सुधारित मतदार याद्या 15 जून 2015 रोजी प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.

16 ते 20 जून 2015 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे दिली व स्विकारली जातील. 22 जून 2015 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल व त्याचदिवशी वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. नामनिर्देशनपत्रासंदर्भातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायाधिशांकडे 25 जून 2015 पर्यंत अपील करता येईल. अपील नसलेल्या ठिकाणी 29 जून 2015 पर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील व त्याच दिवशी तेथील निवडणूक रिंगणातील अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. अपील असलेल्या ठिकाणी 1 जुलै 2015 पर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील व त्याचदिवशी तेथेही निवडणूक रिंगणातील अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल.

मतदान केंद्रांची यादी 28 जून 2015 रोजी प्रसिद्ध केली जाईल. 4 जुलै 2015 रोजी सकाळी 7.30 ते 5.30 या वेळेत मतदान होईल. 6 जुलै 2015 रोजी सकाळी 10 वाजेपासून मतमोजणी सुरु होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल, असेही श्री. सहारिया यांनी सांगितले.