विदर्भात वीज पडून सहा ठार,दोघे पुरात वाहून गेले

0
6

नागपूर दि.१४- विदर्भात शनिवारी मॉन्सूनने जोरदार सलामी दिली. नागपूरसह बुलडाणा, यवतमाळ, अकोल्यात आलेल्या दमदार पावसाने तेथील जनजीवन काही काळ ठप्प झाले होते. नागपूर जिल्ह्यात वीज पडून दोघांचा, तर अमरावती, बुलडाणा, वर्धा व चंद्रपूर जिल्ह्यांत प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला. तसेच बुलडाणा जिल्ह्यात दोन युवक पुरात वाहून गेले. नागपुरात दुपारी चार ते पाच यादरम्यान जोरदार पाऊस झाला.
नागपूर जिल्ह्यातील बाजारगावनजीकच्या उमरी शिवारात आज दुपारी तीनच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. या दरम्यान शेतात काम करणाऱ्या दोघांच्या अंगावर वीज पडली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. मृतांत रमेश मोतीराम घवघवे (वय 52, रा. उमरी, ता. नागपूर) व बंडू श्रीरामे (वय 40, रा. सुकडी) यांचा समावेश आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्‍यातील टाकळी येथे दुपारी साडेबाराच्या सुमारास वीज पडून एका शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य सहा जण जखमी झाले. चंद्रशेखर रामदास डाहुले (वय 35) असे मृताचे नाव आहे, तर उज्ज्वला चंद्रशेखर डाहुले (वय 30), नरेश छत्रपती डाहुले (वय 33), प्रमिला नरेश डाहुले (वय 25), सविता अशोक डाहुले (वय 35), चंद्रकला रामदास डाहुले (वय 35) व प्रेम चंद्रशेखर डाहुले (वय 7) हे गंभीररीत्या जखमी झाले. अचलपूर (जि. अमरावती) तालुक्‍यातील वडगाव (फत्तेपूर) येथील शेतकरी गजानन रंगराव अतकरे (वय 49) यांचा वीज पडून जागीच मृत्यू झाला.चंद्रपूर जिल्ह्यातील परसोडी (ता. गोंडपिपरी) शेतशिवारात सायंकाळी पाचच्या सुमारास जोरदार पाऊस पडला. यादरम्यान वीज अंगावर पडल्याने शेतमजूर अशोक बोबडे यांचा मृत्यू झाला. कोर्सुला बाजार (जि. वर्धा) येथील रहिवासी लक्ष्मी बाबाराव मेश्राम (वय 35) ही शेतात काम करीत होती. दुपारी दोनच्या सुमारास अंगावर वीज पडल्याने तिचा मृत्यू झाला, तर तिचा मुलगा विजय गंभीर जखमी झाला.
दोघे पुरात वाहून गेले
बुलडाणा : जिल्ह्यात दोन युवकांचा पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (ता. 12) रात्री घडली. नांद्राकोळी येथील राजू मोरे दुचाकीने घरी जात होता. नाल्याला पूर आल्याने तो दुचाकीसह वाहून गेला. शनिवारी दुपारी त्याचा मृतदेह आढळून आला. मोताळा तालुक्‍यातील चावर्दा येथील तानाजी अंबुसकर (वय 25) याचाही पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाला