उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार योजनेत सहभागी व्हा- माहिती संचालक मोहन राठोड

0
16

नागपूर दि ०३: महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे दिल्या जाणाऱ्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार योजनेत पत्रकारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे व येत्या 31 जुलै 2015 पर्यंत प्रवेशिका पाठवावी, असे आवाहन माहिती व जनसंपर्क नागपूर-अमरावती विभागाचे संचालक मोहन राठोड यांनी आज पत्रकारांशी बोलताना केले.

श्री. राठोड म्हणाले, 1985 मध्ये विकास वार्ता पुरस्कार योजना शासनाने सुरु केली होती. शासन राबवित असलेल्या समाजाभिमुख योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे आवश्यक असते. महाराष्ट्राने गेल्या 5 दशकात विकासात्मक व लोककल्याणाच्या विविध योजना राबविल्या आहेत. या योजनांची माहिती लोकांपर्यत पोहचविण्याचे काम प्रसिद्धी माध्यमे करीत असतात. विकासात्मक बातम्या, वार्तापत्रे, स्फुटलेखन यांना वृत्तपत्रातून अधिक वाव मिळावा आणि पत्रकार बजावित असलेल्या भूमिकेचा सन्मान व्हावा या उद्देशाने उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार ही योजना राबविली जाते.

2001 या वर्षापासून ही योजना नव्या स्वरुपात ‘उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार’ म्हणून सुरु करण्यात आली. 2003 या वर्षापासून इलेक्ट्रॉनिक मीडियाचाही समावेश करण्यात आला. तसेच आता सोशल मीडियाचा देखील समावेश करण्यात आला आहे.

प्रगत तंत्रज्ञानामुळे नवनवी माध्यमे निर्माण झाली असून, अभिव्यक्तीसाठी सोशल मीडिया व ई-माध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. हे लक्षात घेऊन राज्य शासनाकडून सोशल मीडियातील पत्रकारितेसाठी राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येणार आहे. 41 हजार रूपये, मानचिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असल्याचे मोहन राठोड यांनी सांगितले.

विकास पत्रकारितेत योगदान देणाऱ्या मुद्रीत व इलेक्ट्रॉनिक माध्यमांतील पत्रकारितेसाठी शासनाकडून पुरस्कार दिले जातात. त्याचप्रमाणे सोशल मीडियासाठीही पुरस्कार देण्यात येणार आहे. संकेतस्थळ व ब्लॉग या सोशल मीडियातील प्रसारित मराठी भाषेतील वृत्त व पत्रकारिताविषयक मजकुरासाठी ही स्पर्धा असून, या माध्यमांचा प्रभावी वापर करणाऱ्या पत्रकारितेच्या क्षेत्रातील व्यक्तींना सहभाग घेता येईल.

स्पर्धेच्या नियमानुसार स्वतंत्र ब्लॉगद्वारे लेखन केलेले असल्यास ब्लॉगला किमान एक वर्ष पूर्ण झालेले असावे. वृत्तविषयक संकेतस्थळ हे अधिकृत असावे व सोशल मीडियाचा वापर करताना केंद्र शासनाने विहित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब केलेला असावा. प्रवेशिका या विकास पत्रकारिताविषयक लेखनाच्या असणे आवश्यक असून, त्यात शासनाच्या विविध योजनांना पूरक अभिव्यक्ती असणे अपेक्षित आहे.

तसेच विविध स्वरुपाच्या पुरस्कारांसाठी स्वतंत्र प्रवेशिका महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.inया संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच या पुरस्कारासंबंधी विस्तृत माहितीही या संकेत स्थळावर देण्यात आली आहे, असेही ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले.