राजस्थानही राबविणार जलयुक्त शिवार अभियान

0
13

मुंबई दि ०३: महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवार अभियानाची देशभरात चर्चा होत आहे. या अभियानाने अल्पावधीतच मिळविलेल्या यशामुळे राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे याही प्रभावित झाल्या असून त्यांनी शुक्रवारी या अभियानाच्या अभ्यासासाठी एक उच्चस्तरीय समिती महाराष्ट्रात पाठविली. या समितीने मंत्रालयात जलसंधारण मंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेऊन या अभियानाविषयी सविस्तर माहिती घेतली.
राजकीय इच्छाशक्ती आणि लोकांच्या सहभागामुळे महाराष्ट्रात या अभियानाने लोकचळवळीचे स्वरुप घेतले असून या अभियानाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र राज्य दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार आम्ही केला आहे, असे श्रीमती मुंडे यांनी सांगितले. महाराष्ट्रातील जलयुक्त शिवार अभियानाचा अभ्यास करुन राजस्थानातही तशा स्वरुपाचे अभियान राबविले जाईल, असे यावेळी राजस्थान सरकारच्या नदी खोरे आणि जलस्त्रोत महामंडळाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) श्रीराम वेदीरे यांनी सांगितले.
समितीमध्ये श्री. वेदीरे यांच्यासह ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव श्रीमंत पांडे, पंचायत राज विभागाचे सचिव आनंद कुमार, जलसंपदा सचिव अजिताभ शर्मा, मनरेगाचे आयुक्त रोहित कुमार, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता सोमेश माथुर यांच्यासह राजस्थान सरकारमधील विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश होता. याप्रसंगी महाराष्ट्र शासनाच्या जलसंधारण विभागाचे सचिव प्रभाकर देशमुख उपस्थित होते.

‘जलयुक्त शिवार’ महत्वाकांक्षी कार्यक्रम- पंकजा मुंडे
मंत्री श्रीमती मुंडे म्हणाल्या, महाराष्ट्र राज्य मागील काही वर्षांपासून दुष्काळाने होरपळत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने जलयुक्त शिवार अभियान हा एक महत्वाकांक्षी फ्लॅगशीप प्रोग्राम म्हणून हाती घेतला आहे. यात जलसंधारण विभागासह कृषी, जलसंपदा, मनरेगा, एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रम आदी विविध विभागांचा सहभाग आणि समन्वय करण्यात आला आहे. याशिवाय या अभियानात लोकांचा सहभागही मोठ्या प्रमाणात मिळाला. लोकसहभागातून सुमारे २३५ कोटी रुपयांचा निधी या अभियानासाठी मिळाला.
राज्य शासनाने केलेल्या आवाहनाला अनुसरुन विविध खाजगी कंपन्या, स्वयंसेवी संस्था, देवस्थाने यांनीही या अभियानासाठी आर्थिक योगदान दिले. राज्य शासनाने अभियानासाठी एक हजार कोटी रुपयांची भरीव तरतूद केली. याशिवाय जिल्हा विकास निधी, आमदार निधी, खासदार निधी यामधूनही मोठा निधी उपलब्ध झाला. केंद्रीत जलसाठे निर्माण करण्यापेक्षा गावांगावांत विकेंद्रीत जलसाठे निर्माण केल्यास त्याचा लाभ थेट गावकऱ्यांना मिळतो. या धोरणामुळे लोकांचाही या अभियानास प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि अभियानाने लोकचळवळीचे स्वरुप घेतले, असे त्यांनी सांगितले.

राजस्थानला सर्वतोपरी सहकार्य करु
अभियानाच्या यशाने प्रभावित होऊन राजस्थान राज्यही अशाच स्वरुपाचे अभियान राबविणार असल्याचे समजून विशेष आनंद झाला, असेही श्रीमती मुंडे म्हणाल्या. यासाठी राजस्थान शासनाला सर्वतोपरी सहकार्य करु, असे त्यांनी सांगितले. अभियानाला अधिक व्यापक स्वरुप देण्यासाठी येत्या १५ ऑगस्ट रोजी राज्यभरात जलपूजन अभियान राबविले जाईल. तसेच येत्या २ ऑक्टोबरपासून आपण राज्यात जलचेतना यात्रा काढणार आहोत,अशी माहितीही त्यांनी दिली.

‘जलयुक्त शिवार’च्या मॉडेलचा राजस्थानात अवलंब- श्रीराम वेदीरे

राजस्थान सरकारच्या नदी खोरे आणि जलस्त्रोत महामंडळाचे अध्यक्ष श्री. वेदीरे म्हणाले, मोठ्या धरणांपेक्षा गावांगावांत जलसंधारणाचे छोटे-मोठे प्रकल्प निर्माण करणारे महाराष्ट्रातील जलयुक्त शिवार अभियान हे एक आदर्श अभियान आहे. या अभियानासाठी करण्यात आलेला विविध विभागांचा समन्वय, लोकांचा सहभाग आणि सामाजिक उत्तरदायित्व निधीतून खाजगी संस्थांचा मिळत असलेला सहभाग या बाबी अनुकरणीय आहेत. राजस्थानातही या मॉडेलचा अवलंब केला जाईल, असे त्यांनी सांगितले.

समितीने विभागाचे सचिव श्री. देशमुख यांच्याशीही चर्चा करुन अभियानाविषयी सविस्तर माहिती घेतली. शिवाय ही समिती शनिवारी लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात दौरा करुन जलयुक्त शिवारच्या विविध कामांची प्रत्यक्ष पाहणी करणार आहे.