ग्रामपंचायत निवडणूक निरिक्षक वानखेडेंनी केली निवडणूक कामाची पाहणी

0
11

गोंदिया, दि.१4 : राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील १८२ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर केला असून निवडणूक निरिक्षक नियुक्त केले आहे. चंद्रपूर येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी सुरेश वानखेडे यांची गोरेगांव, सडक/अर्जुनी, अर्जुनी/मोरगांव आणि देवरी तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी व भंडारा येथील विशेष भूसंपादन अधिकारी एच.ए.गवळी यांची गोंदिया, तिरोडा, आमगांव व सालेकसा तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक निरिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.
निवडणूक निरिक्षक सुरेश वानखेडे यांनी आज १३ जुलै रोजी गोरेगांव व सडक/अर्जुनी तहसिल कार्यालयाला भेट देऊन निवडणूकीच्या नामनिर्देशन पत्र छाननीच्या कामाची पाहणी केली. नामनिर्देशनपत्र छाननीच्या वेळी त्यांच्या समवेत गोरेगाव तहसिलदार बांबोडे व सडक/अर्जुनी तहसिलदार श्री.मोटघरे उपस्थित होते. मतदान अधिकारी यांचेकडून आलेल्या नामनिर्देशनपत्राची माहिती घेतली. ऑनलाईन व ऑफलाईन किती नामनिर्देशनपत्र प्राप्त झाले याची सुद्धा माहिती त्यांनी यावेळी घेतली. श्री.वानखेडे यांनी उमेदवारांशी सुद्धा चर्चा करुन माहिती घेतली.
श्री. वानखेडे हे चंद्रपूर येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात प्रकल्प अधिकारी आहेत. निवडणूकीच्या काळात चिन्ह वाटपाच्या दिवशी, मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांच्या दुसऱ्या प्रशिक्षणाच्या दिवशी, प्रचार कालावधीत मतदानाच्या दिवसा अगोदरच्या कोणत्याही एकदिवसा आधी, मतदानाच्या दिवशी, मतमोजणीच्या दिवशी भेट घेणार आहे.
मतदान केंद्राच्या व्यवस्थेबद्दल, ई.व्ही.एम. वापराबाबत माहिती व्यवस्थीतरितीने व वेळेवर पाठविण्यासाठी करण्यात आलेली व्यवस्था, आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी, निर्भय, मुक्त व पारदर्शक वातावरणात निवडणूका पार पाडण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना, पोलीस मनुष्यबळ, दारुबंदी करण्यात आली आहे व कसे याबाबतची तपासणी, मतदान केंद्रे व त्यावरील उपलब्ध सोयीसुविधा, ई.व्ही.एम.साठी तयार करण्यात आलेल्या स्ट्रांग रुम्स व मतमोजणीचे ठिकाण व त्यावरील सर्व व्यवस्था सुद्धा तपासणार आहे. निवडणूक काळात केलेल्या कामाचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे नियमीत सादर करणार आहे.