सेन्सॉर बोर्डाचे भगवाकरण

0
8

नागपूर- फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूटच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांच्या नेमणुकीचा वाद सुरू असताना नवनवे वाद समोर येत आहेत. रिकाम्या होणा-या प्रत्येक जागेवर भाजप सरकार संघ परिवारातील माणसे घुसवण्याचा प्रयत्न करीत आहे.
सेन्सॉर बोर्डाच्या भगवेकरणाचा प्रयत्न नुकताच बाहेर आला. संस्कार भारतीचे सरचिटणीस नागपूरचे चंद्रकांत घरोटे यांची केंद्रीय सेन्सॉर बोर्डावर सदस्य म्हणून नियुक्ती केली. घरोटे यांचा सिनेमा व नाटय़ चळवळीशी काय संबंध, असा सवाल नागपुरातील विचारवंतांनी विचारला आहे.
प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक पहलाज निहलानी हे या बोर्डाचे अध्यक्ष आहेत. त्यांनीच घरोटे यांची दोन वर्षासाठी नियुक्ती केली आहे. संघ परिवारच्या जवळचे घरोटे हे गेली २५ वर्षे ललित कला संवर्धनाच्या क्षेत्रात सक्रिय आहेत.
या बोर्डावर नियुक्ती झालेले ते विदर्भातून एकमेव आहेत.
नेहरू युवक केंद्रातील कार्यालयांमध्ये संघ परिवारातील श्यामप्रसाद मुखर्जी, दीनदयाळ उपाध्याय यांचे फोटो लावण्याचा वाद ताजा असतानाच आता त्यांची जयंती साजरी करणे बंधनकारक करण्याचा फतवा निघाला आहे.
महात्मा गांधी यांची पुण्यतिथी, बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करणे ऐच्छिक ठेवली आहे. नेहरू युवक केंद्रात जयंती-पुण्यतिथीचे दरवर्षी कार्यक्रम होतात. काही ऐच्छिक असतात. नेताजी बोस, भगत सिंग यांना या केंद्राने ‘ऐच्छीक’ करून टाकले आहे. सरकारने संघाचा अजेंडा लागू केल्याने समाजात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.