जातीनिहाय जनगणना आकडेवारी प्रसिद्ध होणार

0
17

नवी दिल्ली – अखेर भारतातील जातीनिहाय जनगणनेचे आकडे जाहीर करण्याबाबत आलेला दबावपुढे नमते घेत केंद्र सरकारने या जनगणनेची आकडेवारी जाहीर करण्याचे ठरविले आहे. यासाठी आकड्यांची छाननी करणाऱ्या अरविंद पनगडिया समितीचे निष्कर्ष आणि राज्य सरकारांच्या आहवालाची प्रतिक्षा सरकारला आहे. मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीनंतर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ही माहिती दिली.
मंत्रिमंडळाची व मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीची (सीसीईए) बैठक आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. आधी ही बैठक सायंकाळी होणार होती. पण मोदी यांचा वाराणसी दौरा तिथल्या पावसामुळे सलग तिसऱ्यांदा रद्द झाल्याने बैठक सकाळी झाली. त्यानंतर जेटली यांनी सांगितले, की जातीनिहाय जनगणनेचे आकडे जाहीर करण्यासंदर्भात निती आयोगाचे उपाध्यक्ष पनगडिया यांची समिती छाननी करेल. देशात आजमितीस 46 लाख जाती-उपजाती आहेत. या जनगणनेबाबत राज्यांना त्यांचे अहवाल देण्यास सांगितले गेले असले, तरी अनेक राज्यांनी अद्याप केंद्राकडे अहवाल पाठविलेलेले नाहीत. ते आल्यावर राज्यांची मते व पनगडिया समितीचे निष्कर्ष यांची सांगड घालून जातीनिहाय जनगणनेचा तपशील सरकार जारी करेल. बिहार विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर लालूप्रसाद यादव व तत्सम विरोधी नेत्यांनी जातीनिहाय जनगणनेचे आकडे त्वरित जारी करण्याचे आव्हान सरकारला दिले होते.