चंद्रपूर मेडिकल कॉलेजला अखेर मंजुरी,गोंदिया लटकले

0
9

चंद्रपूर, दि.१७: येथील शासकीय मेडिकल कॉलेज आठ दिवसात मंजूर करण्याच्या मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी नकार दिला. तसेच एमसीआयला फटकार लावत अगोदर उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची पूर्तता करा असे आदेशही बजावले.त्यानंतर केद्र सरकारने चंद्रपूरच्या महाविद्यालयाला मंजुरीचे आदेश दिले,तर गोंदियाला मात्र ताटकळत ठेवले.
चंद्रपूर मेडिकल कॉलेज प्रकरणात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशाला मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने (एमसीआय) सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. गुरुवारी याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने सरन्यायाधीश एच.एल. दत्तू यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशावर स्थगिती देण्यास नकार दिला. तसेच उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची पूर्तता करण्यास सांगितले. गेल्या दोन दिवसांपासून सर्वोच्च न्यायालयाने या विषयावर एमसीआयला चांगलीच फटकार लावली आहे.
गुरुवारीसुद्धा सर्वोच्च न्यायालयाने एमसीआयला फटकार लावली. त्यामुळे एमसीआयने गुरुवारी नरमाईची भूमिका घेत आपली बाजू मांडताना सांगितले की, चंद्रपूरच्या मेडिकल कॉलेजला आमचा विरोध नाही. भविष्यात कुणीही अशी मागणी करू नये म्हणून याचिका दाखल केली. त्यावर सरन्यायाधीशांनी ‘नंतर होणार्‍या गोष्टींचा विचार नंतर करू अगोदर चंद्रपूर मेडिकल कॉलेजसंबंधात देण्यात आलेल्या आदेशांची पूर्तता करा’ असे सुनावले. प्रकाश इटनकर (गडचिरोली) व रामदास वागदरकर (चंद्रपूर) यांच्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने चंद्रपूरचेमेडिकल कॉलेज आठ दिवसात मंजूर करावे, असा आदेश दिला होता. त्या आदेशात एमसीआयच्या एकूणच निर्णय प्रक्रियेवर आणि क्षमतेवर तीव्र ताशेरेही ओढले होते. दरम्यान १५ जून ही सुप्रीम कोर्टाने नवीन मेडिकल कॉलेज मंजूर करण्यासाठी निर्धारित केलेली तारीख आहे. त्या तारखेनंतर कोणतेही कॉलेज मंजूर करू नये, असे आदेश आहेत.
त्यामुळे आता नागपूर हायकोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन होईल, असे कारण देत एमसीआयने सरन्यायाधीश एच.एल. दत्तू यांच्यासमोर याचिका दाखल केली आहे. त्यावर गुरुवारी सुनावणी करताना सरन्यायाधीशांनी उपरोक्त आदेश दिले.
सर्वोच्च न्यायालयात याचिकाकर्त्यांतर्फे अँड. सत्यजीत देसाई आणि अनघा देसाई यांनी बाजू मांडली. तर याचिकाकर्त्यांतर्फे उच्च न्यायालयात बाजू मांडणारे अँड. अनिल किलोर यांनी त्यांना सहकार्य केले.चंद्रपूरचे माजी खासदार नरेश पुगलिया यांनी चंद्रपुरात वैद्यकीय महाविद्यालय व्हावे यासाठी आक्रमक भूमिका घेत सातत्याने पाठपुरावा केला.त्यांच्याच कार्यकर्त्यांनी जनहित याचिका दाखल केली.त्यातच सर्वोच्च न्यायालयानेसुद्धा उच्च न्यायालयाच्या आदेशाची पूर्तता करण्याचे आदेश बजावल्याने चंद्रपुरात शासकीय मेडिकल कॉलेज होईल, अशी शक्यता बळावली आहे.