गोंदियासह विदर्भाला मिळणार चार नवे कृषी महाविद्यालय!

0
13

गोंदिया दि.१७: विदर्भातील विद्यार्थ्यांचा कृषी अभ्यासक्रमाकडे वाढता कल आणि कमी पडत असलेल्या जागा बघता शासनाने चार नवे कृषी महाविद्यालय विदर्भात देण्याचा निर्यण घेतला असून, गोंदिया, गडचिरोली आणि वाशिम या तीन जिल्हय़ांसाठी नवे कृषी महाविद्यालय देण्यात यावे, यासाठीचा ठराव महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने (एमसीईएआर) ११ जुलै रोजी घेतला आहे.विशेष म्हणजे आघाडीचे सरकार असताना तत्कालीन कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गोंदियात कृषी दिन कार्यक्रमात गोंदियासाठी शासकीय कृषी महाविद्यालयाची घोषणा केली होती.परंतु त्यांच्या सरकारच्या कार्यकाळात ते अस्तित्वात येऊ शकले नव्हते.
यवतमाळ जिल्हय़ाला एक कृषी महाविद्यालय मंजूर झाले आहे. विदर्भातील युवा शेतकरी वर्ग शेतीकडे वळत असून, शेतात नवे प्रयोग करीत आहे. त्यासाठी कृषी शिक्षण घेण्याकडे त्यांचा कल वाढला आहे. विद्यार्थ्यांचा कलही कृषी शिक्षणाकडे वाढला आहे, पण कृषी अभ्यासक्रमाच्या जागा कमी असल्याने अनेक विद्यार्थी कृषी अभ्याक्रमापासून वंचित आहेत. या पृष्ठभूमीवर विदर्भात कृषी महाविद्यालयाचा विस्तार वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. विदर्भात आजमितीस ९ शासकीय कृषी महाविद्यालय असून, खासगी महाविद्यालयाची संख्या २२ आहे. यात आता यवतमाळ जिल्हय़ातील पांढरकवडानजीक एक कृषी महाविद्यालय मिळाल्याने ही संख्या २३ झाली आहे. आणखी तीन कृषी महाविद्यालयाला एमसीएआरने मान्यता दिल्याने ही संख्या २६ होणार आहे. या तीन विनाअनुदानित नवीन कृषी महाविद्यालयामध्ये गडचिरोली जिल्हय़ात चार्मोशी येथे कृषी महाविद्यालय, गोंदिया जिल्हय़ात सडक अर्जुनी येथे कृषी व्यवसाय व्यवस्थापन तर वाशिम जिल्हय़ातील आमखेड येथे कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय देण्यासाठीचा निर्णय एमसीईएआरने घेतला आहे. विदर्भातील गोंदिया, गडचिरोली व वाशिम जिल्हय़ाला नवे पदवी कृषी महाविद्यालय देण्यासाठीचा प्रस्ताव पारित केला आहे. कृषी अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा वाढता कल बघता, हा निर्णय घेण्यात आला असल्याचे पुणे येथील महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे संचालक डॉ. श्रीकांत काकडे यांनी स्पष्ट केले.

विशेष म्हणजे गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील माल्ही येथे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची मोठी जागा असून त्याठिकाणी हे महाविद्यालय सुरु झाल्यास शासनाला जागा खरेदीचा पैसा खर्च करावा लागणार नाही.तसेच त्याठिकाणी मोडकळीस आलेल्या इमारतींना दुरुस्ती करुन तिथे महाविद्यालयाची सुरवात केली जाऊ शकते.