33.2 C
Gondiā
Wednesday, May 14, 2025
Home Blog Page 5661

विज कोसळुन एक ठार, एक जखमी

0

चांदुर रेल्वे, ,दि.16-तालुक्यातील जावरा येथे विज कोसळुन एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला असुन एक जण जम्भीर जखमी झाल्याची माहिती आहे. चांदुर रेल्वे वरून १२ किमी अंतरावर असलेल्या जावरा ये़थील शेतकरी पवन नीलकंठ घाटे व राहुल अरविन्द ठाकरे गुरूवारी संध्याकाळी ४ च्या दरम्यान घरचे जनावर चारायला घेवुन गेले असता पवन घाटे (वय २१) व राहुल ठाकरे यांच्यावर विज कोसळली. यामध्ये पवन घाटे यांचा जागीच मृत्यू झाला असुन राहुल ठाकरे हा जखमी झाला आहे. पवन घाटे अविवाहित असून यांच्या मागे आई वडील दोन विवाहित बहिनी आहे तसेच घरी 6 एकर शेती आहे व घरचा कमवता एकटा मुलगा होता. राहुल ठाकरे हा विवाहीत असुन त्यांना एक मुलगा- मुलगी आहे. घाटे यांच्या अचानक मृत्युमुळे त्यांच्यावर दुख:चा डोंगर कोसळला आहे. शासनाने त्यांना त्वरीत मदत देण्याची मागणी गाववासी़यांनी केली आहे.

मोहाची दारू समजून अ‍ॅसिड पिल्याने दोन जणांचा मृत्यू

0
गडचिरोली,दि.16-भामरागड तालुक्यातील टेकला येथे मोहफुलाची दारू समजून अ‍ॅसिड पिल्याने दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना १३ व १५ सप्टेंबर रोजी घडली. मृतकांमध्ये पुरूषासह एका महिलेचाही समावेश आहे.
१२ सप्टेंबर रोजी टेकडा गावात नवा पंडूम सण साजरा करण्यात आला. त्यानंतर १३ सप्टेंबरला कमली लालसू वड्डे (२३) व गोंगलू पुसू नरोटी (७०) या दोन्ही व्यक्तींनी मोहाची दारू समजून अ‍ॅसिड प्राशन केले. सुरूवातीला कमली वड्डे या महिलेने गोंगलू पुसू नरोटी याला तिच्या घरी दारू पिण्यासाठी बोलविले होते. सदर महिलेने घरात असलेल्या अ‍ॅसिडच्या बॉटल काढल्या व पहिले तिने स्वत: बॉटलमधील अ‍ॅसिड दारू समजून प्राशन केले. त्यानंतर त्याच बॉटलमधील अ‍ॅसिड गोंगलू पुसू नरोटी यांनाही पिण्यास दिले व दोघांनी मिळून बॉटलमधील अ‍ॅसिड पूर्णपणे संपविले. त्यानंतर थोड्याचवेळात कमली वड्डे ही मृत्यूमुखी पडली. तिला पाच महिन्याचा एक मुलगा आहे तर दुसºया व्यक्तीला विषबाधा झाली म्हणून कुटुंबियांनी लोकबिरादरी रूग्णालय हेमलकसा येथे दाखल केले. त्याच्यावर त्वरीत उपचार सुरू करण्यात आले. मात्र १४ सप्टेंबर रोजी त्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. कमली लालसू नरोटे हिच्यावर १४ सप्टेंबरला गावातच अंत्यविधी करण्यात आला तर मृतक गोंगलू नरोटेवर शुक्रवारी अंत्यविधी करण्यात आला. एकाच गावातील दोन व्यक्तींचा असा अकाली मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे

मनोधैर्य योजनेतील मंजूर प्रकरणाचा लाभ 15 दिवसात वितरीत करा- पंकजा मुंडे

0
मुंबई : राज्यातील बलात्कार, बालकांवरील लैंगिक अत्याचार आणि ॲसिड हल्ला यामध्ये बळी पडलेल्या महिला व बालकांना मनोधैर्य योजनेअंतर्गत जिल्हा क्षती सहाय्य मंडळाने मंजूर केलेल्या प्रकरणाचा लाभ 15 दिवसात देण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले.

वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या दालनात मनोधैर्य योजनेतील मंजूर प्रकरणाच्या निधीबाबत झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी महिला व बालविकास विभागाचे अपर मुख्य सचिव संजयकुमार, लेखा व कोषागार विभागाच्या प्रधान सचिव वंदना कृष्णा यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्रीमती मुंडे म्हणाल्या, राज्यातील मनोधैर्य अंतर्गत मंजूर प्रकरणातील लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी निधी उपलब्ध नसल्यामुळे निधीअभावी प्रलंबित होती. त्यासाठी वित्त मंत्री यांच्याकडे याविषयी चर्चा केल्याबरोबर त्यांनी तत्काळ निधी देण्याचे मान्य केले. यासंबंधी जिल्हाधिकारी यांना जिल्ह्यातील मनोधैर्य योजनेच्या उर्वरीत प्रकरणात तत्काळ निर्णय घेवून त्याची माहिती पाठविण्याच्या सूचनाही देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच चित्रा वाघ यांनी ट्रॉमा टीम कार्यरत व्हावी अशी सूचना केली. त्यावर श्रीमती मुंडे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्या म्हणाल्या, मनोधैर्य योजनेत बलात्कार व बालकांवरील लैगिक अत्याचारप्रकरणी किमान दोन लाख व विशेष प्रकरणात कमाल तीन लाख रूपये देण्यात येतात. ॲसिड हल्ल्यात जखमी झालेल्या महिला व बालकास त्यांचा चेहरा विद्रुप झाल्यास अथवा कायमचे अपंगत्व आल्यास तीन लाख रूपये देण्यात येतात. तसेच ॲसिड हल्ल्यात इतर जखमा झालेल्या महिला व बालकास 50 हजार रूपये अर्थसहाय्य देण्यात येते. पीडित महिला व बालकांना व त्यांच्या वारसदारांना गरजेनुसार निवारा, समुपदेशन, वैद्यकीय मदत, कायदेशीर सहाय्य, व्यवसाय प्रशिक्षण यासारख्या आधारसेवा पुरवून त्यांचे पुनर्वसन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

 

४५ लाख किमतीचा शासकीय मालाची अफरातफर

0

berartimes.com
गोरेगाव,दि.१६- दारिद्यरेषेखालील नागरिकांना शासनाकडून कमीत कमी दरांवर रेशन दुकानांच्या माध्यमातून गहू, तांदूळ, आदि खाद्य उपलब्ध केले जाते. परंतू सरकारकडून पाठविलेल्या रेशनाचे .काळाबाजारी करत गरीबांच्या तोंडातील घास हिसकावून घेत सुमारे ४५ लाख रुपयाच्या शासकीय धान्याची अफरातफर केल्याप्रकरणी गोरेगावचे तहसिलदार कल्याणकुमार डहाट यांनी पोलीसात तक्रार नोंदविली आहे.गोरेगाव तालुक्यातील शासकीय गोदामातून जून ते जूर्ले २०१६ या काळातील दस्तावेजाची तपासणी जिल्हा पुरवठा अधिकारी व तहसिलदार गोरेगाव यांच्या कार्यालयाने पाहणी केली असता रेशनच्या धान्याची अफरातफर झाल्याचे दिसून आले.शासकिय धान्य दुकानाचे वाहतूक दस्तावेजची चौकशी केल्यानंतर हे प्रकरण समोर आले. विभागीय चौकशी बसवून आवक-जावक रजिस्टरची तपासणी केल्यानंतर जुन २०१६ ते जुलै २०१६ या कालावधीत ८३० क्विंटल गहू, किंमत १७ लाख १७ हजार ५५७ रूपये तसेच ९५७ क्विंटल तांदूळ किंमत २७ लाख ९० हजार ८९२ रूपये या प्रकारे ४५ लाख ८ हजार ४६९ रूपयांच्या मालाची अफरातफर झाल्याचे समोर आले. शासकिय गोदामातून माल अफरातफर करणारा गोदामलिपीकाने टिपीपासेसमध्ये हेराफेरी करीत बोगस आकडे व टिपी दाखवून शासकिय गोदामात ठेवलेल्या गहु, आणि तांदूळाची अफरातफर केल्याचे चौकशीत समोर आले.
पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार ई-रजिस्टर मध्ये गोदाममध्ये येणा-या व जाणा-या मालांत गडबड करत वाहतूक कॉन्टड्ढक्टर बिल तसेच कार्यालयामध्ये सादर केली गेलेली ओरीजनल पासेस तपासले असता टिपीमध्से फरक असल्याचे दिसून आले. शासकिय गोदामाचे ३ महिन्याचा रिकॉर्ड तपासले गेले तेव्हा गव्हाचे १० टिपी आणि तांदळांच्या टिपी पासेसमध्ये हेराफेरी असल्याचे समोर आल्यानंतर हेराफेरीमध्ये सहभागी असलेल्या तत्कालीन गोदाम किपर गुलाम सरवर खान(हल्लीमुकाम तिरोडा) विरूध्द गोरेगाव पोलीस स्टेशन येथे अप.क्र. ६३/२०१६ कलम ४०८ भांदवि सहकलम ३,७ अत्यावश्यक वस्तू अधिनीयम १९५५ अन्यवे गुन्हा नोंद करण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास पोनि सुरेश कदम करीत आहेत.

राज्यात मलेरियाच्या रुग्णांमध्ये ४७ टक्के घट-आरोग्यमंत्री सावंत

0
  • जुलै आणि ऑगस्टमध्ये डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ
  • नाशिक, मुंबई, ठाणे, पुणे, अहमदनगर येथे डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण
  • चिकनगुनिया बाबत एनआयव्ही संस्था अभ्यास करणार

मुंबई, दि. १६ : डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया या आजारांवरील औषधांचा पुरेसा साठा आरोग्य विभागामध्ये असून या आजारांसाठी चाचणी करतांना खासगी वैद्यकीय प्रयोगशाळांनी रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा रक्कम आकारू नये, अन्यथा कारवाई करण्यात येईल. राज्यात मलेरियाच्या रुग्णांमध्ये गेल्यावर्षी पेक्षा ४७ टक्के घट झाली असल्याचे, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज येथे सांगितले.

राज्यातील मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया आजाराच्या सद्य:स्थितीबाबत आढावा घेण्यासाठी साथरोग नियंत्रण समितीची बैठक मंत्रालयात झाली. त्यावेळी आरोग्यमंत्री बोलत होते.

राज्यात ऑगस्ट २०१६ अखेर मलेरियाचे १५ हजार ९२१ रुग्ण आढळले आहेत. गेल्या वर्षी ही संख्या ३० हजार २२३ एवढी होती. आरोग्य विभागाने मलेरिया प्रतिबंधक मोहिम हाती घेतल्याने यावर्षी मलेरिया रुग्णांच्या संख्येत ४७ टक्के घट झाली आहे. साथरोग नियंत्रणाच्या कामगिरीमध्ये राज्य शासनाने अन्य राज्यांच्या तुलनेत समाधानकारक कामगिरी केली असून केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडून महाराष्ट्राचे कौतुक करण्यात आल्याचे आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी यावेळी सांगितले.

राज्यात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या २५८२ असून मुंबई शहरातील रुग्णांची संख्या १२२ आहे. राज्यात आढळून आलेल्या डेंग्यूच्या रुग्णांमध्ये शहरी भागात १६७२ रुग्ण तर ग्रामीण भागात ९०० रुग्ण आहेत. जुलै आणि ऑगस्टमध्ये डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ झाली असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. नाशिक, मुंबई, ठाणे, पुणे, अहमदनगर येथे डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत.

डेंग्यूचे पॉझिटिव्ह रुग्ण आणि डेंग्यू सदृश रुग्ण यामध्ये तफावत आहे. डेंग्यू सदृश रुग्ण देखील डेंग्यूचे रुग्ण म्हणून जाहीर करू नका, असे आवाहन खासगी रुग्णालयांना करण्यात आले आहे. नागरिकांमध्ये विनाकारण घबराट निर्माण होऊ शकते. आयजीएम ॲण्टीबॉडीजची चाचणी सात दिवसांमध्ये पॉझिटिव्ह आली तरच तो रुग्ण डेंग्यूचा म्हणून जाहीर करणे योग्य राहील, असेही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

डेंग्यूवरील औषधांचा साठा राज्यात पुरेसा असून नागरिकांना घाबरून जाऊ नये. डेंग्यूसाठीच्या चाचण्यांसाठी प्रयोगशाळा जास्तीचे दर आकारत असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असेही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

राज्यात चिकनगुनियाचे ४३९ रुग्ण आढळून आले असून त्यातील ९० टक्के रुग्ण हे पुणे शहर व ग्रामीण भागात आढळेले आहेत. पुणे शहरातील ठराविक भागातच रुग्ण आहेत. चिकनगुनियाचे रुग्ण का जास्त प्रमाणात आढळून येताहेत याबाबत नॅशनल इन्स्टिट्यूट व्हायरॉलॉजी (एनआयव्ही) या संस्थेस अभ्यास करायला सांगण्यात आले आहे. ज्या भागात चिकनगुनियाचे रुग्ण जास्त प्रमाणात आढळून आले आहेत तेथे पुणे महापालिकेने स्वच्छता आणि बांधकाम सुरू असलेल्या जागांची तपासणी मोहिम हाती घ्यावी,अशा सूचना आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केल्या.

कुष्ठरोग शोध अभियान 19 सप्टेंबरपासून 16 जिल्ह्यांत राबविणार  – डॉ. दीपक सावंत

0

berartimes.com,  मुंबई, दि. 16 : त्वचारोग व कुष्ठरोग शोध अभियान 2016-17 राज्यातील 16 जिल्ह्यांमध्ये दि. 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर 2016 या कालावधीत प्रभावीपणे राबविणार असून ‘झीरो लेप्रसी मोहिम’ यशस्वी करणार,
अशी माहिती आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांनी आज मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

            आरोग्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या प्रगती योजनेत राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत कुष्ठरोग शोध अभियान राबविण्याचे निर्देश आहेत.समाजातील संशयित कुष्ठरुग्ण या अभियानाच्या कालावधीत शोधून निश्चित निदानझालेल्या रुग्णांना बहुविध औषधोपचाराखाली आणणे हा या अभियानाचा उद्देश आहे. भारतातील 13 राज्य व 3 केंद्रशासित प्रदेशातील एकूण 163 जिल्ह्यांचा या अभियानामध्ये समावेश करण्यात आला आहे.
            राज्यातील कुष्ठरोगाचे प्रमाण जास्त असलेल्या गडचिरोली,चंद्रपूर, वर्धा, भंडारा,गोंदिया, नागपूर, अमरावती, वाशिम, यवतमाळ,नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगांव, ठाणे, रायगड व पालघर या 16 जिल्ह्यांत हे अभियान राबविले जाईल. या अभियानामध्ये 169 तालुके,  14 महानगरपालिका व 88 नगरपालिकांचा समावेश करण्यात आला आहे. ठाणे, रायगड, पालघर व नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे पल्स पोलिओ कार्यक्रम असल्याने या ठिकाणी 13 ऑक्टोबर 2016 पर्यंत या अभियानांतर्गत सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
            तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर अधिकारी व कर्मचारी यांना या अभियानाबाबतची माहिती देण्यासाठी विविध कार्यशाळांचे आयोजन करण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्य, जिल्हा व तालुकास्तरावर विविध समित्यांची स्थापना करुन या अभियानाबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणासाठी एकूण 4 कोटी 98 लाख एवढ्या लोकसंख्येचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यापैकी 1 कोटी 53 लाख शहरी भागातील व 3 कोटी 45 लाख ग्रामीण भागातील लोकसंख्येचे उद्दिष्ट आहे.
            हे अभियान यशस्वी करण्यासाठी आवश्यक सर्च टीम्स, सर्वेक्षणसाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध असून या टीममधील सर्व सदस्यांचे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले आहे. या टीममार्फत अभियानाच्या कालावधीमध्ये 14 दिवस घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येणार आहे. घरातील सर्व सदस्यांची कुष्ठरोग व त्वचारोगासंदर्भात शारिरीक तपासणी करण्यात येणार असून संशयित रुग्णांची यादी तयार करुन त्यांची तपासणी वैद्यकीय अधिकारी, तज्ज्ञ डॉक्टर यांच्यामार्फत करण्यात येणार आहे. निदान झालेल्या कुष्ठरुग्णांवर मोफत बहुविध औषधोपचार करण्यात येणार आहेत. अभियानांतर्गत निदान झालेल्या कुष्ठरुग्णांच्या सहवासितांवर प्रतिबंधात्मक उपचार करण्यात येणार आहे. गाव पातळीवर व शहरी भागात बॅनर्स, पोस्टर्स, लाऊड स्पिकर या माध्यमातून शालेय विद्यार्थी, आरोग्य कर्मचारी, आशा, अंगणवाडी सेविका यांच्याद्वारे व अलर्ट इंडिया या स्वयंसेवी संस्थेच्या सहभागाने या अभियानाची प्रसिद्धी करण्यात येणार आहे. राज्यस्तरावरुन सनियंत्रण व पर्यवेक्षणाकरिता अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली असून राज्यस्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. सदर कक्ष सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत कार्यरत राहणार आहे. जिल्हांमध्ये अभियानासंबंधी
काही समस्या उद्‌भवल्यास मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हास्तरावरही नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहे.

            हे अभियान यशस्वी करण्यासाठी आपल्या घरी येणाऱ्या पथकाला संपूर्ण सहकार्य करुन कुष्ठरोगाविषयी संपूर्ण माहिती द्यावी,अभियानांतर्गत आढळून आलेल्या संशयितांनी पुढील तपासणीसाठी नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जावे, अभियानात कुष्ठरोगाचे निदान झालेल्या कुष्ठरुग्णांच्या सहवासितांनी एक दिवसाचा प्रतिबंधात्मक औषध उपचार घ्यावा, तसेच कुष्ठरोगाबाबत सांगितलेल्या माहितीचा उपयोग जनजागृतीसाठी करावा, असे आवाहनही डॉ.सावंत यांनी यावेळी केले.

आर्चीला पाहण्यासाठी नागपूरकर ‘सैराट’

0

नागपूर,दि.16-‘सैराट’ सिनेमातील आर्ची अर्थात अभिनेत्री रिंकू राजगुरुची क्रेझ अद्यापही कमी झालेली नाही. नागपूरमध्येही याचा प्रत्यय आला. रिंकु राजगुरू हिची  एक झलक पाहण्यासाठी नागपुरकरांनी तोबा गर्दी केली होती.

नागपुरातील एकता गणेश मंडळाला रिंकुने भेट दिली असता तिची एक झलक पाहण्यासाठी युवक सैराट झाले होते.  रिंकू सोबत आमदार प्रकाश गजभिये आणि माजी मंत्री अनिलबाबू देशमुख हे देखील उपस्थित होते.

आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकली अमरावतीची पूर्वशा

0
अमरावती – धनुर्विद्येत (आर्चरी) भारताचा दबदबा कायम राखण्याची परंपरा अमरावतीच्या पूर्वशा शेंडे हिने कायम राखली आहे. तायवान येथे झालेल्या एशियन कप स्टेज-२ च्या स्पर्धेत पूर्वशाने रौप्य पदक पटकावले असून, या वर्षाचे हे तिचे सातवे आंतरराष्ट्रीय पदक आहे. 
 
कंपाउंड गटात भारताच्या मुलींच्या संघाने रौप्यपदक पटकावले. तर, वैयक्तिक खेळ प्रकारातसुद्धा पूर्वशाने दोन रौप्यपदके पटकावली. या स्पर्धेतील तिच्या प्रदर्शनामुळे जागतिक क्रमवारीत तिने २७ वे स्थान प्राप्त केले. आजवर अशा पद्धतीने आगेकूच करणारी अमरावतीची पूर्वशा सुधीर शेंडे ही एकमेव खेळाडू ठरली आहे. जागतिक क्रमवारीत पहिल्या ३० खेळाडूंमध्ये अमरावतीच्या खेळाडूचा समावेश झाल्याने येथील क्रीडा जगतात उत्साहाचे वातावरण आहे. 

तिहेरी हत्याकांडाचा साडेतीन वर्षांनंतर तपास सीबीआयकडे

0
लाखनी (जि. भंडारा) – खेळण्याबागडण्याच्या वयात ६ ते ११ वर्षे वयोगटातील तीन बहिणींचा संशयास्पद मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना लाखनी तालुक्‍यातील मुरमाडी/सावरी येथे १४ फेब्रुवारी २०१३ रोजी घडली होती. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यातच नव्हे, तर राज्यातदेखील खळबळ उडाली होती. स्थानिक पोलिसांनी घटनेचा तपास योग्य दिशेने केला नसल्याचा नागरिकांचा आरोप होता. त्यामुळे तब्बल साडेतीन वर्षांनंतर या घटनेचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपविण्यात आला. सीबीआयच्या पाच सदस्यीय चमूने  गुरुवारी लाखनीत भेट देत मुलींचे मृतदेह आढळलेल्या विहिरीची पाहणी केली.
 
तनुजा जयपाल बोरकर (वय ११), प्राची (वय ९ ) व प्रिया (वय ६) अशी मृतांची नावे आहेत. घटनेच्या दिवशी तनुजा आईला शेतात हुरडा खाण्यासाठी जात असल्याचे सांगून बाहेर गेली. रात्र होऊनही ती परतली नाही. तिच्या दोन्ही बहिणीसुद्धा घरी न परतल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली. गावातील नागरिकांच्या मदतीने सर्वत्र शोध घेऊनही त्यांचा थांगपत्ता लागला नाही. तक्रार केल्यावर पोलिसांनी दखलही घेतली नाही. दरम्यान, १६ फेब्रुवारीला तिन्ही बहिणींचे मृतदेह गावालगतच्या शेतातील विहिरीत आढळले. त्यामुळे घटनेतील गांभीर्य वाढले होते. पोलिस विभागातील विशेष पोलिस महानिरीक्षकांपासून अनेक बडे अधिकारी लाखनीत डेरेदाखल झाले होते. अनेक आंदोलनेही झाली. संवेदनशील घटना असताना तपासात हयगय केल्याप्रकरणी तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक तिवारी, ठाणेदार प्रकाश मुंडे यांचे तडकाफडकी स्थानांतरण करून पुढे निलंबन करण्यात आले. पोलिस तपास अनेक दिवस चालला. शवविच्छेदन प्रकरणावरूनही वादळ उठले होते. फॉरेन्सिक चमूने सदर अहवाल रद्दबातल ठरविल्याने शंकाकुशंकांना उधाण आले होते. 

भागवत आधुनिक हिटलर : प्रकाश आंबेडकर

0
वृत्तसंस्था
नवी दिल्ली,दि.16- – “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे आधुनिक काळातील हिटलर आहेत,” अशा शब्दांत भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भागवत यांच्यावर घणाघाती टीकास्त्र सोडले.
 
देशभरातील दलित अत्याचारांच्या विरोधात आज (शुक्रवार) दिल्लीत भारिप बहुजन पक्षाच्या वतीने प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली दलित स्वाभिमान संघर्ष महासभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रकाश आंबेडकर यांच्यासह सीताराम येचुरी, माजी खासदार वृंदा करात, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे खासदार डी. राजा, सरचिटणीस सुधाकर रेड्डी यांची भाषणे झाली. अनुसूचित जाती-जमातींच्या रक्षणार्थ अॅट्रॉसिटीचा कायदा आणखी कडक करण्यात यावा. दलितांवर हल्ले करणाऱ्या गुन्हेगारांवर गुन्हे दाखल करावेत. गोरक्षकांवर बंदी घालावी. तसेच, खासगी क्षेत्रातही आरक्षण लागू करावे, आणि संघाच्या विभाजनवादी अजेंड्याला व सांस्कृतिक राष्ट्रवादाला सरकारी पातळीवरून खतपाणी घालू नये, या मागण्या यावेळी करण्यात आल्या.
आंबडेकर म्हणाले, “आता देशातील दलितांनी याचा निर्णय करावा की, त्यांना राज्यघटना हवी की वामनाची पूजा करणारा मनुवाद याची निवड त्यांनी करावी.”आंबेडकर यांनी भागवत यांच्यासह पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. रामदास आठवले यांच्यावरही आंबेडकर यांनी यावेळी निशाणा साधला. ‘मोदी काळातले मनुवादी हे प्राचीन मनुवाद्यांपेक्षा भयंकर आहेत‘ असा सूर सभेतील इतर वक्त्यांनी आळवला.