पुणे ,दि.25: मराठा क्रांती मूक मोर्चाची वज्रमूठ छत्रपती संभाजीमहाराज यांच्या पुतळ्याच्या साक्षीने आवळली असून, महिलांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचा ‘नि:शब्द एल्गार’ विधान भवनावर रविवारी धडकला. कोपर्डीच्या आरोपींना फाशी द्यावी, मराठा समाजाला आरक्षण मिळावे आणि अॅट्रॉसिटीच्या कायद्यात सुधारणा करावी, या मागण्यांसाठी मराठा समाज पुण्यात रस्त्यावर उतरला होता.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मोठ्या प्रमाणावर मोर्चात सहभागी झाले होते. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, खासदार उदयनराजे भोसले, शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, शिवसेना खासदार श्रीरंग बारणे, राज्यमंत्री विजय शिवतारे, हर्षवर्धन पाटील, विश्वजीत कदम, भाई जगताप यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांची या मोर्चाला मोठ्या संख्येने उपस्थिती होती.जिल्हाधिकारी सौरभ राव यांना मागण्याचे निवेदन सादर करुन मोर्चाच्या समारोप करण्यात आला.
यवतमाळ, वाशीममध्ये पावसात जमले लाखो मराठा
berartimes.com यवतमाळ/वाशिम,दि.25- विदर्भातील यवतमाळ व वाशीम शहरांमध्येही आज सकल मराठा समाज बांधवांनी लाखोंच्या संख्येने एकत्र येऊन मुकमोर्चा काढला. यवतमाळच्या पोस्टल ग्राऊंडवरून मराठा-कुणबी क्रांती मूक मोर्चाला सुरूवात झाली. हाती भगवे ध्वज घेऊन अबालवृद्ध अत्यंत शिस्त आणि शांततेत या मोर्चात सहभागी झाले होते. काळे कपडे परिधान करून विविध मागण्यांचे फलक हाती घेऊन तरुणाई कोपर्डीच्या घटनेचा निषेध करत होती. एक मराठा लाख मराठा, असे लिहीलेल्या टोप्या घालून समाजबांधव मोठ्या संख्येन या मोर्चात सहभागी झाले. यवतमाळ व वाशीममध्ये पाऊस असूनही समाजबांधव मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते.मोर्चा बस स्थानक परिसरात जाम्बु वंत राव धोटे माजी खासदार राजाभाऊ ठाकरे संजय देशमुख विधान परिषदेचे उपाध्यक्ष माणिकराव ठाकरे माजी आमदार प्रकाश देवस रकर मराठा समाजाचे नेते हजर होते.वाशिममध्ये जिल्हा परिषदेच्या स्टेडीयममध्ये मराठे एकत्रित आले होते.यवतमाळात वकीलांनी काळे कोट घालून सहभाग घेतला.तर मोर्चेकरांना मुस्लीमबांधवानी पाणीची व्यवस्था केली.
मराठा समाजाला आरक्षण देणारंच- मुख्यमंत्री
आसाराम बापूला म्हातारचळ, नर्सची काढली छेड
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, दि. 25 – अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी तुरुंगाची हवा खात असलेला स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू आसाराम बापूच आता आणखी एक प्रकार चव्हाट्यावर आला आहे. ८० वर्षांच्या आसाराम बापू यांचं शारीरिक वय वाढले तरी, मन काही कामवासनेतून सुटत नाही आहे. एम्स रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या नर्सला पाहून आसाराम बापूने अश्लील वक्तव्य केलं. रुग्णालयात बापूंना नाश्ता घेऊन आलेल्या नर्सला पाहून ‘तू लोण्यासारखीच आहेस, त्यामुळे मला ब्रेडसोबत लोणी कशाला हवे’, असे वक्तव्य केले. या वक्तव्यामुळे बापूचा चावटपणा उघड झाला आहे.
शिक्षक बदली प्रकरण: आरोपींना १० दिवसांची पोलिस कोठडी
गडचिरोली, दि.२५: गडचिरोली जिल्हा परिषदेंतर्गत २०१३ मध्ये झालेल्या २२० शिक्षकांच्या नियमबाह्य बदल्यांप्रकरणी गडचिरोली पोलिसांनी अटक केलेले जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील लिपिक विजेंद्र सिंग व नचिकेत शिवणकर यांना न्यायालयाने १० दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
शिक्षकांच्या बोगस बदल्यांप्रकरणी पोलिसांनी काल विजेंद्र उर्फ विजय सिंग व नचिकेत शिवणकर यांना अनुक्रमे शेगाव व मुल येथून अटक केली. आज दुपारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना ४ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. तब्बल १० दिवसांची पोलिस कोठडी असल्याने पोलिसांना आरोपींकडून बरीच माहिती मिळण्याची शक्यता आहे. बोगस बदली प्रकरणात ७३ शिक्षकांच्या नस्ती गायब आहेत. शिवाय अनेक जणांचे बदली आदेशच बोगस आहेत. तत्कालिन मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या करणे, अनेक आदेशांवर जिल्हा परिषद सदस्यांनी शिफारस केल्याचा उल्लेख करणे, आदेशावर जावक क्रमांक नसणे असे अनेक प्रकार त्यावेळी करण्यात आले.
अमित कुमार अग्रवाल :८८ रेल्वेगाड्यात बायो टॉयलेट
नागपूर,berartimes.com दि..२५ : : स्वच्छता सप्ताहात स्वच्छतेबाबत अनेक उपक्रम राबवून प्रवाशांशी संवाद साधण्यात आल्याची माहिती दपूम रेल्वेचे ‘डीआरएम’ अमित कुमार अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली. रेल्वेगाड्या आणि परिसरात स्वच्छता राखण्यासाठी विभागातील ८८ रेल्वेगाड्यात बायो टॉयलेट बसविण्यात आले असून मोतीबागच्या बायो टॉयलेट युनिटमध्ये या वर्षी २५00 बायो टॉयलेट बनविण्यात येणार असून यातील ९00 बायो टॉयलेट तयार झाल्याचे त्यांनी सांगितले.
डीआरएम अग्रवाल म्हणाले, स्वच्छता सप्ताहात रेल्वेस्थानक, परिसराची सफाई, सौंदर्यीकरण, वृक्षारोपण करण्यात आले. स्वच्छ स्टेशन दिनी अधिकारी, निरीक्षक, पर्यवेक्षकांनी रेल्वेस्थानकाच्या सफाईची पाहणी करून क्लिनिंग मशीन, टुल्स, प्लान्ट्सचे निरीक्षण केले. यात भारत स्काऊट गाईड, युनियन, विविध संस्था सहभागी झाल्या होत्या.
स्वच्छ रेल्वे दिनानिमित्त विभागातून जाणार्या रेल्वेगाड्यांची सफाई करण्यात आली. प्रवाशांशी संवाद साधून त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. स्वच्छ नीर दिनानिमित्त रेल्वेस्थानक परिसरातील पाण्याच्या स्रोतांची सफाई करून पाण्याची गुणवत्ता तपासण्यात आली. स्वच्छ सहयोग दिनानिमित्त प्रवाशांशी संवाद साधून घाण पसरविणार्या प्रवाशांना दंड आकारण्यात आला. स्वच्छ संवाद दिनी प्रवाशांशी स्वच्छतेबाबत चर्चा करून पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला सिनिअर डीसीएम अर्जुन सिबल आणि अधिकारी उपस्थित होते.
दपूम रेल्वेच्या नागपूर विभागात एकूण तीन अँक्सीडेंट रिलीफ ट्रेन आहेत. यातील एक ट्रेन नॅरोगेज सेक्शनसाठी, एक गोंदिया येथे आणि एक गाडी इतवारी रेल्वेस्थानकावर तैनात आहे. गाडीत अपघात झाल्यास संबंधित ठिकाणी पोहोचून मदत करण्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध आहेत. यात तीन कोच असून एका कोचमध्ये ऑपरेशन थिएटर, दुसर्या कोचमध्ये १२ रुग्णांसाठी बेड, तिसर्या कोचमध्ये रुग्णांना खाण्यासाठी पदार्थ बनविण्याची सुविधा आहे. ही गाडी ताशी ११0 किलोमीटर वेगाने धावते. गाडीत ‘व्ही सॅट टेक्नॉलॉजी’चा समावेश आहे. अपघातस्थळी मदतकार्य कसे सुरूआहे याचे थेट प्रसारण डीआरएम कार्यालय आणि रेल्वे बोर्डात पाहण्याची सुविधा असल्याचे मुख्य आरोग्य अधिक्षक डॉ. सुनंदा राहा यांनी सांगितले. याशिवाय एखाद्या पाण्याच्या ठिकाणी अपघात झाल्यास लाईफ ज्ॉकेट, कोचमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी हायड्रोलिक कटर्स, घटनास्थळी हवेने फुलणारा टेंट उभा करण्याची सुविधा या रेल्वेगाडीत उपलब्ध आहे.
नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे बफर घोषित
गोंदिया दि..२५ : मागील तीन वर्षांपूर्वी व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा प्रदान करण्यात आलेल्या नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पासाठी आता १२४१ चौ. किलो मीटरच्या बफर क्षेत्राची घोषणा करण्यात आली आहे. यासंबंधी राज्य शासनाने अलीकडेच अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार या १२४१ चौ. किलोमीटरच्या बफरमध्ये ६४८.६८ चौ. किलोमीटरचे वनक्षेत्र आणि ५९२.५९ चौ. किलोमीटरमधील झुडपी जंगलाचा समावेश करण्यात आला आहे. वन विभागाने काही वर्षांपूर्वी नागझिरा अभयारण्य आणि नवेगाव राष्ट्रीय उद्यान यांना एकत्रित करून नव्या व्याघ्र प्रकल्पाचा प्रस्ताव तयार केला होता. त्यानुसार राज्य शासनाने १२ डिसेंबर २0१३ रोजी वन्यजीव अधिनियम १९७२ नुसार एक अध्यादेश जारी करून या नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची घोषणा केली होती. त्यानुसार भंडारा व गोंदिया येथील प्रादेशिक वन विभागासह एफडीसीएमच्या अधिकार क्षेत्रातील संरक्षित जंगल आणि झुडपी जंगलाचा या बफर क्षेत्रात समावेश करण्यात आला.
२0 टक्के अनुदानाच्या जीआरची होळी
नागपूर : गेल्या १५ वर्षापासून विना वेतन काम करणार्या कायम विना अनुदानित शाळांमधील शिक्षकांना अनुदानाचे गाजर दाखविणार्या राज्य शासनाच्या अन्यायकारक जीआरची राष्ट्रवादी शिक्षक संघातर्फे शिक्षण उपसंचालक कार्यालयापुढे होळी करण्यात आली. शासनाने १९ सप्टेंबर २0१६ रोजी काढलेल्या शाळा अनुदानाच्या शासन निर्णयात अन्यायकारक अटी लादल्या असून, शिक्षकांना व विद्यार्थ्यांना सुद्धा बायोमेट्रिक प्रणाली अनिवार्य केली आहे. त्याचबरोबर ९ व १0 वर्गाचा १00 टक्के निकाल असणे आवश्यक आहे. या अटी पूर्ण केल्यावरही २0 टक्केच अनुदान देणार असल्याने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
शासनाने कायम विना अनुदानित शाळांना १00 टक्के अनुदान द्यावे, अनुदानाच्या सूत्रात बदल करू नये, अशी मागणी शिक्षकांची आहे. शुक्रवारी शासनाच्या या निर्णयाची होळी करून निषेध करण्यात आला. यावेळी विभागीय अध्यक्ष खेमराज कोंडे, ओमप्रकाश धाबेकर, देवेंद्र सोनटक्के, मोहम्मद आबिद शेख, सतीश अवसरे, कपिल उमाळे, नरेश भोयर, सुरेश कामनापुरे, नीलेश ढोरे, प्रदीप जांगडे, माला गोडघाटे, राजाभाऊ टाकसळे, विलास कोडापे, रमेश भोयर आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत तिरोडा- करटी रस्त्याचे भूमिपूजन
तिरोडा,दि.25 : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मौजा कवलेवाडा येथे तिरोडा-कवलेवाडा करटी रस्त्याचे भूमिपूजन आमदार विजय रहांगडाले यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना आ.रहांगडाले म्हणाले, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून एका आर्थिक वर्षामध्ये एका विधानसभा क्षेत्रात एकूण २७ कि.मी. रस्ते बांधकामाचे उद्दीष्ट आहे. यातूनच आपल्या विधानसभा क्षेत्रातील तिरोडा तालुका ते तुमसर तालुक्याला जोडणारा हा मुख्य मार्ग असल्यामुळे सर्वप्रथम या रस्त्याची निवड करण्यात आली.
रस्त्याची रुंदी सदर योजनेमध्ये जास्तीत-जास्त ३.७५ मीटर असून सुद्धा या रस्त्यावर तालुक्यातील सर्व मुख्य कार्यालये (तहसील कार्यालय, पंचायत समिती, सा.बा. उपविभागीय कार्यालय, पशु वैद्यकीय कार्यालय, उपविभागीय कार्यालय, जीवन प्राधीकरण, वीज कंपनी) असल्यामुळे रेल्वे स्थानक रस्त्यापासून ते मजिप्रा कार्यालयापर्यंत ५ मीटर रूंदीच्या रस्त्याकरिता विशेष मंजुरी आणण्यात आली. त्यापुढील संपूर्ण रस्ता हा ३.७५ मीटर रुंदीचा बनणार आहे. कवलेवाडा क्षेत्रामध्ये विविध विकासकामे घेण्यात आली असून डांबरी रस्त्याच्या कामांना लगेच सुरुवात होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार भजनदास वैद्य, जि.प. उपाध्यक्ष मदन पटले, जि.प. सदस्य रजनी कुंभरे, पं.स.सदस्य वी.एस. रहांगडाले, रमणिक सयाम, पवन पटले, भाजपा तालुकाध्यक्ष भाऊराव कठाणे, तुमेश्वरी बघेले, सलामभाई शेख, डॉ.चिंतामन रहांगडाले, डॉ.वसंत भगत, संजयसिंग बैस, सरपंच देवनबाई पारधी, जयसिंग ऊपासे, ललीत परिहार, शिवलाल परिहार, महादेव कटणकर, पिंटू रहांगडाले, मिलींद कुंभरे, निरज सोनेवाने, खुमेश बघेले, भुमेश्वर रहांगडाले, स्वानंद पारधी, कैलाश कटरे, सुधीर येळे, विवेक डोरे आदी उपस्थित होते.
युनिव्हर्सल फेरो कारखाना सुरूहोण्याचा मार्ग मोकळा
तुमसर : तुमसरजवळील युनिव्हर्सल फेरो कारखान्याचा वीज दराचा गुंता सुटला असून राज्य शासनाने औद्योगिक वीज ४ रूपये ४0 पैसे युनिट दराने देण्याची घोषणा केली. यामुळे युनिव्हर्सल कारखाना सुरूहोण्याच्या मार्ग मोकळा झाला आहे. राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, कंपनीचे संचालक फिरोज नेत्रावाला व शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पटले यांची मुंबईत बैठक झाली. या बैठकीत विदर्भ तथा मराठवाड्यातील आजारी उद्योगांसाठी अत्यल्प वीज दर लागू करण्यात आले आहे.
युनिव्हर्सल फेरो मॅग्नीज शुद्ध करणारा कारखाना सन २00६ पासून कायम बंद आहे. या कारखान्यावर सुमारे २00 कोटी वीज बिल थकीत होते. अभय योजनेअंतर्गत कंपनी व्यवस्थापनाने ४६ कोटी रूपये भरले होते. शासनाने येथे १२८ कोटी माफ केले. मार्च २0१७ पर्यंत हा कारखाना सुरू करण्याची अट घातली होती. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र पटले यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले होते.
राज्य शासनाने २६ टक्के वीज दर कमी केले. राजेंद्र पटले यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई, कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांशी कारखाना सुरू करण्यासंदर्भात चर्चा केली होती. शासनावर दबाव येत असल्याने ४.४0 प्रति युनिट सरसकट वीज आकारणी करण्याची घोषणा केली. कंपनी मालक फिरोज नेत्रावाला यांनी १00 टक्के कारखाना सुरू करण्याची हमी दिली.
येथील कामगारांची याचिका न्यायालयात प्रलंबित आहे. कामगारांची ही न्याय मागणी रास्त आहे. कामगार संघटनेचे अध्यक्ष तथा वकील एस.डी. ठाकूर यांनी कारखाना सुरू करण्याकरीता अडचण नाही, असे राजेंद्र पटले यांना सांगितले. ही बाब कंपनी व्यवस्थापनाने मान्य केली. या बाबींचा विचार करता युनिव्हर्सल कारखाना सुरू करण्याकरिता कोणतीही अडचण नाही.