40.5 C
Gondiā
Friday, May 16, 2025
Home Blog Page 5675

दक्षिण फिलीपीन्सला भूकंपाचा धक्का

0

वृत्तसंस्था
मनिला – दक्षिण फिलीपीन्समधील बेटांना आज (रविवार) सकाळी जोरदार भूकंपाचा धक्का बसला.

भूगर्भशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण फिलीपीन्समधील मिंडानाओ बेटांना आज सकाळी जोरदार भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.1 इतकी मोजण्यात आली आहे. मिंडानाओ बेटावरील हिनातुआन शहरापासून 12 किमी अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू होता.

या भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा देण्यात आलेला नाही. भूकंपामुळे अद्याप कोठेही जिवीत किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

पहिल्या सौर कृषिपंप ऊर्जीकरणाचे लोकार्पण

0

वर्धा : राज्यात विजेची वाढती मागणी बघता शेतकर्‍यांच्या कृषिपंपांना दिवसा १0 तास अखंड वीज पुरवठा करणे गरजेचे आहे. यासाठी राज्यातील सर्व कृषी फीडर हे सौर उज्रेवर कार्यान्वित करण्याचा प्रकल्प लवकरच सुरू करण्यात येईल, अशी माहिती ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
अटल सौर कृषी पंप योजनेंतर्गत राज्यातील पहिल्या सौर कृषि पंप उर्जीकरणाचा लोकार्पण कार्यक्रम कांरजा तालुक्यातील बोरगाव (ढोले) येथील देविदास रामधम यांच्या शेतात पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला खा. रामदास तडस, आ. अमर काळे, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, कारंजा पं.स. समिती सभापती संगीता खोडे, कारंजा नगर पंचायत अध्यक्ष बेबी कठाणे, मुख्य अभियंता प्रसाद रेशमे, अधीक्षक अभियंता सुनील देशपांडे उपस्थित होते.
ना. बावनकुळे पुढे म्हणाले, अपारंपरिक ऊज्रेचा अधिकाधिक वापर करण्यावर केंद्र व राज्य शासनाचा भर आहे. महाराष्ट्रात १५ हजार मेगावॅट उर्जानिर्मिती सौर ऊज्रेवर करण्याचे धोरण तयार करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून ७00 ते ८00 कृषी पंप एका फीडरवर असणार्‍या भागासाठी सोलर कृषी फीडर योजना राबविण्यात येईल. यातील एक फीडर पहिल्या टप्प्यात वर्धा जिल्ह्यात उभारण्यात येईल. सोबतच गावातील नळ योजनाही सौर ऊज्रेवर चालविण्याचा शासनाचा मानस आहे.
विदर्भ मराठवाड्यात २00५ पासून १ लाख ९८ हजार शेतकर्‍यांनी पैसे भरूनही कृषी पंपाच्या जोडण्या प्रलंबित होत्या. यामुळे अनुदानाची वीज शेतकर्‍यांना मिळत नव्हती. मुख्यमंत्र्यांनी यासाठी अंदाजपत्रकात विशेष तरतूद करून दिली. यामुळे केवळ दीड वर्षात कृषी पंपाच्या सर्व जोडण्या शेतकर्‍यांना देण्यात आल्या. शेतकर्‍यांना अखंड वीज मिळावी म्हणून सोलर पंपाची योजना सुरू केली.
महाराष्ट्रात १0 हजार सोलर पंप बसविण्याचे उद्दिष्ट पहिल्या टप्प्यात ठेवण्यात आले. यात येणार्‍या अडचणी व त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. विंधन विहिरीवर सौर पंप, १0 एकर शेती असणार्‍या शेतकर्‍याचा समावेश, शेतकर्‍यांना भरावयाचा पाच टक्के हिस्सा एकरकमी न आकारता टप्पा-टप्प्यात घेण्याचा विचार शासन करीत आहे, असेही ते म्हणाले.
प्रगत महाराष्ट्रात अजूनही १७ लाख कुटुंब विजेपासून वंचित आहेत. १00 टक्के कुटुंबांना वीज मिळण्यासाठी २0१९ पर्यंत पायाभूत सुविधा उभारण्यावर शासनाचा भर असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन मधुसूदन मराठे यांनी तर आभार सुनील देशपांडे यांनी मानले.

दोषी डॉक्टरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

0

तुमसर : शासकीय सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयात गर्भवती महिलेचा उपचाराअभावी मृत्यू झाला. डॉ. संध्या डांगे यांच्या निष्काळजीपणामुळे महिलेला जीव गमवावा लागला. डॉ. डांगे यांची केवळ बदली न करता त्यांना तत्काळ निलंबित करण्याची मागणी भाजप महिला पदाधिकार्‍यांनी तहसिलदारांमार्फत राज्याच्या आरोग्यमंत्र्याकडे निवेदन पाठविले आहे.
जयश्री ठवकर यांचा मृत्यू डॉ. संध्या डांगे यांच्या निष्काळजीपणामुळे झाला. जयश्री ठवकर यांना रुग्णालयात सकाळी ११ वाजता दाखल करण्यात आले. डॉ. डांगे यांनी त्यांना सोनोग्राफी करण्यास सांगितले. सोनोग्राफीत गर्भातील बाळ दगावल्याचे दिसून आले. डॉ. डांगे यांनी उलट सर्व व्यवस्थित आहे, असे ठवकर दाम्पत्यांना सांगितले. त्यानंतर रात्री ९.३0 च्या सुमारास जयश्री ठवकर यांचा मृत्यू झाला.
डॉ. संध्या डांगे यांच्या निष्काळजीपणामुळे जयश्री ठवकर यांना आपला जीव गमवावा लागला. आरोग्य विभागाने डॉ. संध्या डांगे यांचे स्थानांतरण भंडारा येथे केले. स्थानांतरण रद्द करून त्यांना सेवेतून निलंबित करून मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजप महिला आघाडी पदाधिकार्‍यांनी केली. शिष्टमंडळात भाजप महिला आघाडी अध्यक्षा कुंदा वैद्य, माजी नगराध्यक्षा गीता कोंडेवार, नगरसेविका शोभा लांजेवार, लक्ष्मी इळपाचे, सुषमा पटले, पुष्पा तलमले, भारती साठवणे, पद्मा बिसेनसह मोठय़ा संख्येने भाजप महिला कार्यकर्ता उपस्थित होत्या.

खापावासियांना न्याय मिळवून देण्यासाठी खासदार, आमदारांना घेराव घालणार

0

तुमसर : येथील गर्भवती महिलेच्या मृत्युप्रकरणी जमावाने आपले गर्‍हाणे ऐकवण्यासाठी आंदोलनाचा पावित्रा घेतला असता पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला. येथील आमदार, खासदार यांनी दखल घेतली नाही. परिणामी राष्ट्रवादी महिला काँग्रेस आक्रमक झाल्या आहेत. आठवडाभरात खापावासीयांवरील गुन्हे मागे घेतले नाही तर आमदार, खासदारांना घेराव घालणार असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष कल्याणी भुरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी राष्ट्रवादी शहर अध्यक्ष योगेश सिंगनजुडे, पमा ठाकूर, उषा जावळे, अंकुर ठाकूर उपस्थित होते. यावेळी भुरे यांनी, प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे रूग्णांचे बेहाल झाले आहेत. रूग्णालयात तीन स्त्री रोग व प्रसुती तज्ज्ञाची जागा असताना केवळ एकच जागा भरण्यात आली आहे. इथल्या परिचारिकांच्या उर्मठ वागणुकीमुळे जनता त्रस्त झाली आहे. डॉक्टर मुख्यालयी राहत नाही आदी समस्या असताना आमदारांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली आहे. परिणामी अशा घटनांना सामोरे जावे लागते व नागरिक जेव्हा प्रशासनाचा विरोध करतात त्यांच्या चुका त्यांच्या समोर दाखविण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांच्यावर लाठीचार्ज होतो. या अगोदरही आंदोलन, रास्तारोको करण्यात आले. परंतु कधीच असे घडले नाही.
राष्ट्रवादी पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी नागरिकांना शेवटपर्यंत समजाविण्याचा कार्य केले. मात्र त्यांनाही हेतुपुरस्सर या प्रकरणात गोवण्यात आले व त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. त्याच बरोबर गावातील इतरही नागरिकांवर गुन्हे दाखल करून त्यांना तुरूंगात पाठविले जाणार आहे. असे असताना येथील आमदार, खासदारांनी मौन बाळगले आहे. शासनस्तरावर प्रयत्न करून खापा वासीयांवरील गुन्हे मागे घेणे, लाठी चार्जचे आदेश देणार्‍या त्या पोलीस अधिकार्‍याला निलंबित करणे तसेच पीडिताच्या परिवाराला १0 लाख रूपयाची मदत करणे यासाठी राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी समोर येऊन आमदार खासदारांना घेराव घालणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

विदर्भाच्या रेल्वे मध्य रेल्वेला जोडा

0

गोंदिया : गोंदिया, भंडारा, गडचिरोली, नागपूर व चंद्रपूर हे बिलासपूर झोनमध्ये आहेत. येथील लोकप्रतिनिधीना समस्या सोडविण्यासाठी बिलासपूर व छत्तीसगड येथे जावे लागते. या जिल्ह्यांना मुंबई मुख्यालय असलेल्या मध्य रेल्वेला जोडण्यात यावे, अशी मागणी डेली रेल्वे मूवर्स असोसिएशनचे अध्यक्ष गोपाल अग्रवाल व विष्णू शर्मा यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांना केली आहे.
विदर्भातील रेल्वे प्रवाशांसोबत बिलासपूर झोन भेदभाव करते. दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे व दुर्गपासून ४0-४0 जोडी एक्सप्रेस दररोज सोडल्या जातात. रायपूर,कोरबा, रायगड, देवरा रोड येथून दररोज ६ ते १२जोड्या एक्सप्रेस सोडल्या जातात. हे सर्व स्टेशन छत्तीसगडमध्ये आहे. परंतु विदर्भात येणार्‍या चांदापोर्ट, वडसा, नागभिड, इतवारी, भंडारा, गोंदिया या स्टेशनवरून एकही एक्सप्रेस १५ वर्षापासून प्रस्तावित करण्यात आली नाही. त्यामुळे या रेल्वे स्थानकाचा विकास होऊ शकला नाही. गोंदिया येथून महाराष्ट्र एक्सप्रेस व विदर्भ एक्सप्रेस सोडल्या जातात. परंतु या दोन्ही गाड्या बिलासपूर झोनच्या नाहीत. पंतप्रधानानी बिलासपूर-नागपूर सुपरफास्ट आतापर्यंत सुरू केली नाही. तिसरी रेल्वे लाईन आज ही छत्तीसगडमध्ये तयार करण्यात आली.

स्थायी समितीने फेटाळले मागील सभेचे ठराव व कार्यवृत्त

0

गोंदिया : जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत शनिवारी ‘झेप.पी.’ म्हणजे खर्‍या अर्थाने झोलबा पाटलाचा वाडा असल्याचा प्रत्यय समितीच्या सर्व सदस्यांना आला. सभा सुरू झाल्यानंतर सुरूवातीला मागील सभेतील ठराव व कार्यवृत्ताला मंजुरी देणे गरजेचे असते. मात्र प्रशासकीय यंत्रणेच्या उदासीनतेमुळे सदस्यांना त्याची प्रतच उपलब्ध झाली नसल्याने सदस्यांनी ते मंजूर करण्यास ठाम नकार दिला.
सभेच्या पाच दिवसांपूर्वी मागील सभेत झालेल्या ठरावाचे कार्यवृत्त, अनुपालन अहवाल सदस्यांना देणे गरजेचे आहे. मात्र ६ ऑगस्टला झालेल्या सभेचा अहवाल देणे तर दूर, सभेची नोटीस सुद्धा दिली जात नसल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेससह सत्ताधारी काँग्रेस आणि भाजपच्या काही सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. रमेश अंबुले, सुरेश हर्षे यांनी हा विषय उचलला. त्यानंतर राकाँचे पक्षनेता गंगाधर परशुरामकर, राजलक्ष्मी तुरकर व इतर सदस्यांनीही या विषयावरून पदाधिकार्‍यांसह अधिकार्‍यांना धारेवर धरले. शेवटी पुढील सभेपूर्वी कार्यवृत्त सदस्यांना देऊन पुढील सभेत ते मंजूर करण्याचे ठरले.
या बैठकीत जिल्ह्यात यावर्षी पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी जिल्हा परिषदेने काहीतरी उपाययोजना आखावी अशी विनंती काही सदस्यांनी केली. त्यावर काय करता येईल यावर विचार करण्याचे ठरले.
राष्ट्रवादीचे जि.प.सदस्य सुरेश हर्षे यांच्यावरील आरोपांच्या चौकशीसाठी काही पदाधिकार्‍यांनी दाखविलेल्या विशेष इंटरेस्टवरून या बैठकीत चांगलीच खडाजंगी झाली. आमगाव तालुक्यातील कट्टीपार ग्रामपंचायतमधील डिजीटल साहित्य खरेदी प्रकरणात हर्षे यांना गोवण्याचा प्रयत्न झाला. मात्र प्रत्यक्ष या प्रकरणाच्या चौकशी अहवात त्यांच्यावरील आरोप निर्थक असल्याचे स्पष्ट झाल्याने यावरून शिक्षण सभापतींना विरोधी सदस्यांनी टार्गेट केले. यावेळी चौकशी अहवाल वाचून दाखवा अशी मागणी गंगाधर परशुरामकर, राजलक्ष्मी तुरकर यांनी केली. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी व अध्यक्षांनी ग्रामसेवकाला नोटीस पाठविण्यासोबतच सात दिवसाच्या आत कट्टीपार ग्रामपंचायतच्या कारभाराची चौकशी करण्याचे आश्‍वासन दिले.

एनआरएचएमच्या कर्मचार्यांनी काढला मोर्चा,जिल्हाधिकार्यांना निवेदन

0

nrhm1गोंदिया,berarimes.com दि.3- राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत येणाऱ्या ग्रामीण व शहरी भागात पूर्ण वेळ सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यासह शासनाचे लक्ष वेधण्याकरीता सुरु केलेल्या आंदोलनातर्गंत आज(दि.3) येथील सुभाष शाळेच्या मैदानापासून भव्यदिव्य अशा मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधले.हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोचल्यानंतर जाहिर सभेत परिवर्तीत झाला.या मोर्च्याचे नेतृत्व सुनिल तरोणे,आयटकचे हौसलाल रहागंडाले,राज्य कर्मचारी संघटनेचे लिलाधर पाथोडे,जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे पी.जी.शहारे आणि माजी जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ.भीमराव मेश्राम,,अर्चना वानखेडे यांनी केले.यावेळी सर्वांनी मार्गदर्शन करीत एनआरएचम कुठल्याही परिस्थितीत बंद होता कामा नये यासाठी सतत आंदोलनात्मक भूमिका सुरु राहणार असल्याचे सांगितले.तर डाॅ.भीमराव मेश्राम यांनी 11 वर्ष एनआरएचएममधील कर्मचारी अधिकारी यांच्या प्रयत्नामुळे आज ग्रामीण भागातील आरोग्य सेवा सुरळीत होण्यास मदत झाली आहे.आधीच्या तुलनेत या वर्षात चांगले आरोग्य लोकांना मिळत आहे हे एनआरएचम योजनेचे यश असून केंद्र सरकार व राज्यसरकार हे अभियान 2017 मार्चमध्ये बंद करणार आहे.त्याआधी आपण मुबंई उच्च न्यायालयात यासंबधीची जनहित याचिका दाखल करणार असून ही योजना बंद करण्यापासून शासनाला रोखणे हाच उद्देश असल्याचे सांगितले.IMG-20160903-WA0174
केंद्रसरकारने मार्च 2017 पासून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान बंद करण्याचा निर्णय घेतल्याने या अभियानंतर्गत आरोग्यसेवा पुरविणारे जिल्ह्यातील सुमारे 100 डाॅक्टरसह 700 कर्मचारीवर्गाला नोकरीपासून वंचित व्हावे लागणार आहे.अभियान बंद होण्यापुर्वी राज्यसरकारने या सर्व कर्मचार्याना नियमित आरोग्य सेवेत सामावून घ्यावे या मुख्य मागणीला घेऊन 24 सप्टेंबर पासून जिल्ह्यातील कर्मचारी अधिकारी हे काळ्या फिती लावून कामकाज करीत होते. राज्यव्यापी आंदोलनातर्गंत आज शनिवारला त्यांनी मोर्चा काढून जिल्हाधिकारी यांना मागण्याचे निवेदन सादर केले.
दुर्गम भागातील जनतेपर्यंत सेवा देण्याचे काम आरोग्यसेवक करीत असतात. परंतु, त्यांची सेवा उद्दिष्ट्ये पूर्ण करण्यासाठी कमी पडते. ग्रामीण भागात गरोदर महिला, बालके, प्रसूती झालेल्या महिला आरोग्य सेवेपासून वंचित राहू नये, यासाठी २००५ पासून संपूर्ण राज्यात राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान राबविले जात आहे. या कर्मचाऱ्यांचे २००६ पासून मासिक मानधन अत्यल्प आहे. सध्याच्या महागाईच्या काळात अल्पशा मानधनावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण आहे. नोकरीत कायम करण्यात येईल, या आशेवर हे कर्मचारी काम करीत आहेत. आपल्या मागण्यांच्या पुर्ततेसाठी हे कर्मचारी-अधिकारी वर्गाने काळ्या फिती लावून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन सुरु केले आहे.विरोधी पक्षात असताना विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एनआरएचम कर्मचारीला कायम करावे अशी मागणी केली होती,आता मात्र सत्तेत तेच असताना आपले शब्द विसरल्याचा आरोपही कर्मचारी वर्ग करीत आहेत. आंदोलनातर्गंत 19 सप्टेंबरला एकदिवसीय लाक्षणिक संप पुकारणे,आक्टोबंर महिन्यात अहवालपाठविण्यासह सर्व रिपोर्टिंग देणे बंद करणे, 2 नोव्हेबंरपासून बेमुदत काम बंद आदोलन करण्यात येणार असल्याची माहिती दिली. जिल्ह्यातील सर्वच तालुकास्तरावर कर्मचारी अधिकारी या मोर्चात सहभागी झाले होते.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी-कर्मचारी महासंघाचे गोंदिया जिल्हाध्यक्ष सुनिल तरोणे,उपाध्यक्ष अर्चना वानखेडे,सचिव संजय दोनोडे,डाॅ.मिना वट्टी,प्रदिप रहागंडाले,अविनाश वराडे,संकेत मोरघरे,राजीव येडे ,डाॅ.योगेश पटले,अजितसिंग,तिवारी, पवन वासनिक, ग्रि्ष्मा वाहने,प्रतिमा मेश्राम,संजय मेंढे,अर्चना चौधरी,राखी प्रसाद,रेखा पुराम,अर्चना कांबळे,ललीता गौतम,ममता गजभिये,शालिनि राऊत,निशांत बनसोड,अनिरिध्द शर्मा,अनिल रहमतकर,ुप्रकाश थोरात,सतिश माटे,मनोज सातपुते,विद्या रहागंडाले ,माया नागपूरे,संजय बिसेन यांच्यासह सर्व कर्मचारी सहभागी झाले होते.या आंदोलनाला जिल्ह्यातील बहुतांश संघटनानी आपला पाठिबां जाहिर केला होता.

गोसेखुर्द सिंचन प्रकल्पातील गैरव्यवहाराबाबत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल

0

घोडाझरी कालव्यातील निकृष्ट कामांबाबत 6434 पानांचे दोषारोपपत्र
मुख्य अभियंत्यासह पाच अधिकारी व कंत्रटदारांचा समावेश
नागपूर, दि. 3 – लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या खुल्या चौकशीनंतर विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाअंतर्गत गोसेखुर्द सिंचन प्रकल्पातील घोडाझरी शाखा कालव्यातील निविदा प्रक्रिया व बांधकामात झालेल्या गैरव्यवहारासंदर्भात शनिवारी पोलिसांनी न्यायालयात तब्बल 6434 पानांचे दोषारोपपत्र सादर केले. इतकेच नव्हे तर तपासादरम्यान अधिक पुरावे मिळून आल्यास अथवा अधिक आरोपी निष्पन्न झाल्यास पुरवणी दोषारोपपत्र सादर करण्याची तजवीजसुद्धा दोषारोपपत्रत ठेवण्यात आली आहे.

आरोपींमध्ये तत्कालीन पूर्वअर्हता मूल्यांकन समिती अध्यक्ष आणि मुख्य अभियंता गोसेखुर्द प्रकल्प नागपूर सोपान रामराव सूर्यवंशी, तत्कालीन पूर्वअर्हता मूल्यांकन समिती सदस्य सचिव आणि सध्या कार्यकारी अभियंता (नागपूर) असलेले रमेश डी. वर्धने, तत्कालीन वरिष्ठ विभागीय लेखाधिकारी गुरुदास मांडवकर रा. नागपूर, तत्कालीन अधीक्षक अभियंता संजय खोलापूरकर, तत्कालीन कार्यकारी संचालक रोहिदास लांडगे रा. पुणो आणि कंत्रटदार एफ.ए. कन्स्ट्रक्शन मुंबईचे सक्रिय भागीदार निसार फतेह मोहम्मद अब्दुला खत्री रा. मुंबई यांचा समावेश आहे.

राज्य शासनाच्या गृह विभागाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (अॅन्टी करप्शन ब्युरो) राज्यातील सिंचन प्रकल्पांची उघड चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार ब्युरोचे महासंचालक यांनी विदर्भातील पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत गोसेखुर्द सिंचन प्रकल्पातील झालेल्या भ्रष्टाचारासंबंधी चौकशी सुरु करण्याचे आदेश नागपूर कार्यालयाला दिले होते. त्यानुसार अॅन्टी करप्शन ब्युरोचे पोलीस निरीक्षक युवराज पत्की यांना घोडाझरी शाखा कालवा कि.मी. 4.26क् ते 8.8क्क् मधील मातीकाम ‘कट अॅण्ड कव्हर’ या कामाची निविदा प्रक्रिया व बांधकाम संबंधाने उघड चौकशी केली. चौकशीअंती पोलीस निरीक्षक युवराज पत्की यांनी 23 फेब्रुवारी 2क्16 रोजी आरोपी लोकसेवक व मे.एफ.ए. कन्स्ट्रक्शनचे सक्रिय भागीदार निसार फतेह मोहम्मद खत्री आणि इतर 4 भागीदार यांच्याविरुद्ध नागपूर शहर येथील सदर पोलीस स्टेशन येथे अप.क्र. 3175/2क्16 कलम 13(1) (क), (ड), सह 13 (2) ला.प्र.का 1988 व सह कलम 42क्, 465, 467, 468, 471, 1क्9, 12क् (ब) भां.द.वि.अन्वये गुन्हा दाखल करून गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधीक्षक मिलिंद तोतरे यांच्याकडे सोपविण्यात आला होता.

धान खरेदी योजनेत स्पर्धात्मक ई टेंडरिंग पद्धतीचा वापर करावा- मुख्यमंत्री

0

मुंबई, दि. 2 : शेतकऱ्यांच्या धानाची खरेदी वेळेत व्हावी आणि त्यांना त्याची रक्कम वेळच्या वेळी मिळावी, यासाठी ई-टेंडरिंगद्वारे स्पर्धात्मक पद्धतीने धान खरेदी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी येथे दिले.धान खरेदीसंदर्भात आज सह्याद्री राज्य अतिथीगृहात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. यावेळी खासदार नाना पटोले, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डी.के. जैन, पणन विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल, अन्न,नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, महाराष्ट्र राज्य सहकारी मार्केटिंग फेडरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक निलिमा केरकट्टा, महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डी. के. जगदाळे,भारतीय अन्न महामंडळाचे राज्यातील महाव्यस्थापक सुधीर कुमार,उपमहाव्यवस्थापक हरिष, विभागाचे उपसचिव सतीश सुपे, वित्तीय सल्लागार व उपसचिव सत्यवान उबाळे आदी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, गेल्या काही वर्षांपासून मार्केटिंग फेडरेशनच्या मार्फत शेतकऱ्यांच्या धानाची खरेदी करण्यात येत आहे. परंतु वेळेत धान न उचलणे, रक्कम वेळेत न मिळणे अशा
तक्रारी शेतकऱ्यांकडून येत आहेत. त्यामुळे धानाची खरेदी विकेंद्रित खरेदी पद्धतीने ई-टेंडरिंगद्वारे करावी. यामध्ये खाजगी कंपन्यांचाही सहभाग झाल्यास स्पर्धा निर्माण होऊन धान खरेदी योजना सक्षम होईल. यासाठी केंद्र
शासनाकडे आवश्यक तो प्रस्ताव पाठवावा.

श्री. पटोले म्हणाले की, धान खरेदी योजना एकाच संस्थेमार्फत राबविण्यात येत असल्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर पैसे मिळत नाहीत. तसेच धानाचीही लवकर उचल होत नसल्यामुळे राज्य शासनास आर्थिक तोटा होतो.त्यामुळे या खरेदी योजनेत खासगी कंपन्यांनाही सहभागी करून घ्यावे.प्रधान सचिव श्री. पाठक यांनी खरेदी योजनेची माहिती दिली.

मुख्यमंत्रीच्या हस्ते लोकराज्यच्या ‘आपले पोलीस’ विशेषांकाचे प्रकाशन

0

मुंबई, 02 : लोकराज्य सप्टेंबर 2016 च्या ‘आपले पोलीस’ या
विशेषांकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज येथे
सह्याद्री अतिथीगृहात झाले. या विशेषांकात महाराष्ट्र पोलीसांच्या
सामर्थ्यशाली आणि गौरवशाली कामगिरीचा विस्तृत आढावा घेण्यात आला आहे. या
अंकाचे विशेष संपादन गृह विभागाचे अपर मुख्य सचिव के. पी. बक्षी यांनी
केले आहे.

या प्रकाशन सोहळ्याला शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे,
पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, आमदार सर्वश्री. आशिष शेलार, अबु आझमी,
वारिस पठाण, अस्लम शेख, अमीन पटेल, माजीमंत्री नसीम खान, गृह विभागाचे
अपर मुख्य सचिव के. पी. बक्षी, प्रधान सचिव डॉ. विजय सतबीर सिंग,
नगरविकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर, पोलीस महासंचालक सतीश माथूर,
मुंबई महानगरपालिका आयुक्त अजोय मेहता, पोलीस आयुक्त दत्ता पडसळगीकर,
परिवहन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, संचालक (माहिती व प्रशासन) तथा अंकाचे
प्रबंध संपादक देवेंद्र भुजबळ यांच्यासह पोलीस व विविध विभागांचे वरिष्ठ
अधिकारी उपस्थित होते.

या अंकात सायबर सुरक्षा प्रकल्प, क्राइम ॲण्ड क्रिमीनल
ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम, फिरते न्याय सहायक वैज्ञानिक पथक, रस्ते
सुरक्षा, सीसीटीव्ही यंत्रणा, सोशल मीडियावरील बदनामी, ऑनलाइन पोलीस
सेवा, नक्षलींवर नियंत्रण, महिलांची सुरक्षा, महिला सुरक्षा पथक-दामिनी,
कैद्यांची सुधारणा व पुनर्वसन, नागरी हक्कांचे संरक्षण, सामाजिक बहिष्कार
मुक्ती, पोलिसांसाठी घरे, तंटामुक्तीचे यश, ऑपरेशन मुस्कान, पोलीस
अधिकारी घडवणारी संस्था, पोलीस दलात कसा प्रवेश घ्याल ? आदी विषयांवर
उपयुक्त व माहितीपूर्ण लेखांचा समावेश करण्यात आला आहे.

हा विशेषांक उत्कृष्ट, वाचनीय आणि अत्यंत संग्रहणीय झाल्याची
प्रतिक्रिया उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.