रविवारी परीक्षा : नेट परीक्षेसाठी पेन, घड्याळास बंदी, सीबीएसईचा निर्णय

0
10
गोंदिया- : रविवारी 27 डिसेंबर रोजी होणाऱ्या नॅशनल इलिबिजिलिटी टेस्ट (नेट) परीक्षेच्या वेळी आता मनपसंत पेन किंवा घड्याळ वापरण्यावर सीबीएसईने बंदी घातली आहे. अत्याधुनिक प्रकारे होणाऱ्या कॉपी केस, पेपरफुटीमुळे सीबीएसईने हे पाऊल उचलले आहे.
घड्याळ पेन नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होऊ नये म्हणून परीक्षागृहातच बॉलपेन दिला जाईल. तसेच प्रत्येक खोलीत विद्यार्थ्यांना स्पष्टपणे दिसेल, अशी घड्याळ असणार आहे. त्यामुळे घरून पेन किंवा घड्याळ आणण्याची गरज विद्यार्थ्यांना भासणार नाही.
जून महिन्यात झालेल्या नेट परीक्षेपेक्षाही यंदा जाचक नियम लावण्यात आले आहेत. तसेच पेपर सुरू व्हायच्या अडीच तास आधी केंद्रावर पोहचण्याची अट घालण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांना तपासणीसाठी किमान अडीच तास आधी परीक्षा केंद्रावर हजर रहावे लागणार आहे. प्रवेशपत्रासह पॅनकार्ड, मतदानकार्ड, वाहन चालवण्याचा परवाना किंवा अाधारकार्ड सोबत ठेवणे आवश्यक आहे. ऑल इंडिया प्री-मेडिकल टेस्ट प्रमाणेच आता नेट परीक्षेचे नियम असणार आहेत. गेल्या काही वर्षांत प्रश्नपत्रिका फुटणे, अत्याधुनिक पद्धतीने कॉपी करण्याचे प्रकार उघडकीस आले होते. यास पायबंद घालण्यासाठी आता जाचक अटी लादण्यात आल्या आहेत. तसेच दोन पेपरमधील अंतर कमी करून आता केवळ अर्धा तास गॅप ठेवण्यात येणार आहे.