शिक्षण परिषद;शिक्षकांनी तयार केलेल्या साहित्य प्रदर्शनाचे कौतूक

0
8

गोंदिया,दि. ९ : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र धोरणाचे प्रभावी अंमलबजावणी व्हावी, शिक्षकांमध्ये नवचैतन्य निर्माण करुन सर्व मुलांना गुणवत्ता पुर्ण शिक्षण मिळावे यासाठी तसेच शिक्षकांशी संवाद साधून शैक्षणिक अडचण दूर करण्यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी महाशिवरात्रीच्या दिवशी जिल्हयातील तीन हजार शिक्षकांशी शिक्षण परिषदेतून संवाद साधला.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे, जि.प.चे शिक्षण सभापती पी.जी.कटरे, शिक्षण उपसंचालक अनिल पारधी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य प्रशांत डवरे, शिक्षणाधिकारी (प्राथ) श्री नरड यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री नंदकुमार यांनी ज्ञानरचनावाद, कृतीयुक्ती अध्यापन, डिजीटल व आयएसओ शाळामार्फत मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कोणत्या पध्दतीचा अवलंब करावा यावर मार्गदर्शन केले. मुल प्रगत झाली पाहिजे याचे भान प्रत्येक शिक्षकाने ठेवले पाहिजे असे सांगून ते म्हणाले, ज्याप्रमाणे पृथ्वी सूर्याभोवती फिरत असल्याने दिवस रात्र होते. दिवस रात्र एकवेळ झाले की, २४ तास म्हणजे एक दिवस होतो. त्याचप्रमाणे ३० दिवस झाले की पगार आपोआपच होतो. पृथ्वी फिरते म्हणून पगार होतो. पृथ्वीला आम्ही थांबवू शकत नाही. म्हणून मुले शिकल्याशिवाय शिक्षकसुध्दा सुखी व समाधानी राहू शकत नाही. शिक्षण क्षेत्रातून अधिकारी हे शब्द गहाळ करुन अधिकाऱ्यांनी सहकार्याची भावना जोपासून शिक्षकांना व मुलांना समुपदेशन व सुलभकाची भूमिका पार पाडावी. लोकसहभागातून शाळेचा विकास कसा होईल. याकडेही शिक्षकांनी लक्ष द्यावे. यावेळी श्री नंदकुमार यांनी शिक्षकांनी विचारलेल्या शंकाचे प्रश्नोत्तराद्वारे संवाद साधून निराकरण केले.
शिक्षकांनी तयार केलेले ज्ञानरचनावादी शैक्षणिक साहित्य व मीना राजू मंचाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या विविध हस्त व चित्रकला साहित्याचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. यावेळी शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख व शिक्षक यांचा स्मृतिचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. शिक्षण परिषदेला जिल्हयातील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील अधिव्याख्याता वर्ग, उपशिक्षणाधिकारी (प्राथ व माध्य) उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन मंजूश्री देशपांडे, अंजिता मेंढे, एच.एस.शहारे यांनी संयुक्तपणे केले. आभार उपशिक्षणाधिकारी (प्राथ) लोकेश मोहबंशी यांनी मानले.