सोलापूर, अहमदनगर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर

0
7
मुंबई, दि. ९ – दुष्काळाचा फटका बसलेल्या रब्बी हंगामातील १०५३ गावात दुष्काळ जाहीर करण्यात आला असून इतिहासात प्रथमच रब्बी हंगामासाठी अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला आहे. यात सोलापूर जिल्ह्यातील ६४५ तर अहमदनगरमधील ४०८ गावांचा समावेश करण्यात आल्याची माहिती महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत दिली.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महसूल मंत्री खडसे यांनी विधान परिषदेत याबाबतचे निवेदन केले. मंगळवारी रात्री झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला असून या दुष्काळी गावांमध्ये सर्व उपाययोजना लागू करण्यात आल्याचे खडसे यांनी सांगितले.दरम्यान राज्यपालांच्या अभिभाषणात दुष्काळाचा उल्लेखच करण्यात आला नसल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या सुनिल तटकरे यांनी केला. यावर राज्यपालांच्या भाषणात दुष्काळाचा उल्लेख आहे. भाषणादरम्यान गोंधळ घातला नसता तर ऐकू आले असते, असा टोला खडसे यांनी लगावला.