मल्ल्यांचा धडा आता आयआयएमचे विद्यार्थी गिरवणार

0
8

अहमदाबाद(वृत्तसंस्था) – देशातील 18 सरकारी बॅंकांना नऊ हजार कोटींने गंडवून परदेशी पलायन करणारे मद्यसम्राट विजय मल्ल्या यांच्या आर्थिक गैरव्यवहाराचा आता “आयआयएम अहमदाबाद‘मध्ये अभ्यास केला जाणार आहे. लवकरच त्यासंबंधीचा एक स्वतंत्र पाठ व्यवस्थापन संस्थेच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केला जाणार असून, सध्या तज्ज्ञ प्राध्यापकांची एक समिती यावर काम करत आहे. 

“दि लिकर बॅरन डेब्ट फियास्को‘ या नावाने स्वतंत्र पाठ तयार करण्यात येईल. तत्पूर्वी सत्यम कॉम्प्युटर गैरव्यवहाराचे प्रकरणही व्यवस्थापन शाखेच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आले होते.

मल्ल्यांचा हा पाठ इंदूर, लखनौ आणि बंगळूरमधील व्यवस्थापन संस्थांमध्येही शिकविला जाण्याची शक्‍यता आहे. फायनान्स, अकाउंटिंग आणि ब्रॉड मॅनेजमेंट या विषयांतर्गत हे प्रकरण शिकविले जाऊ शकते. मल्ल्यांचा कर्जबुडवेपणा, सत्यम कॉम्प्युटर गैरव्यवहार ही दोन्ही प्रकरणे कार्पोरेट्‌स एथिक्‍स आणि गव्हर्नन्सशी संबंधित आहेत. त्यामुळे व्यवस्थापन शाखेच्या विद्यार्थ्यांनी याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. या प्रकरणांचा परिणाम थेट भागधारकांपासून कंपनीचे कर्मचारी आणि प्रमोटर्स यांच्यापर्यंत होतो. यामुळे सर्वांनाच आर्थिक नुकसान सहन करावे लागते. कंपनीचा ब्रॅंड बदनाम होण्यासदेखील अशा प्रकारचे गैरव्यवहार कारणीभूत ठरू शकतात. याबाबी विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाच्या अवधीमध्येच समजणे गरजेचे असल्याचे प्राध्यापकांचे म्हणणे आहे.