खासगी मेडिकल कॉलेजेसना पण आता प्रवेश परीक्षा

0
8
नवी दिल्ली, दि. 11 – मेडिकलच्या अॅडमिशनच्या प्रवेशासाठी असलेली परीक्षा किंवा नॅशनल एलिजिबिलिटी एन्ट्रन्स टेस्ट (NEET) पुन्हा सुरू होण्याचे संकेत सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. तीन वर्षांपूर्वी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार सदर प्रवेश परीक्षेवर बंदी घालण्यात आली होती. मात्र, या निर्णयाचा पुनर्विचार करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने दाखल करून घेतली आहे आणि एकप्रकारे एमबीबीएस, बीडीएस व एमडी या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा घेण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे संकेत दिले आहेत.
2012 मध्ये मेडिकल काऊन्सिल ऑफ इंडियाने NEET सुरू केली होती, परंतु खासगी महाविद्यालयांनी याविरोधात याचिका दाखल केली आणि कोर्टाकडून ही परीक्षा त्यांच्यासाठी अनिवार्य नसल्याचा निकाल लागला होता. मात्र, मेडिकल काऊन्सिलने या निर्णयाचा फेरविचार करावा अशी याचिका केली होती.
सुप्रीम कोर्टाने जुना आदेश मागे घेत या प्रकरणाची नव्याने सुनावणी घेण्याचे मान्य केले आणि NEET ला संजीवनी दिल्याची चर्चा आहे. देशभरात 600 वैद्यकीय महाविद्यालये असून ती सगळी यामुळे प्रवेश परीक्षेमध्ये येणार आहेत. वैद्यकीय शिक्षण नियंत्रित करण्याचे अधिकार मेडिकल काऊन्सिलला नसल्याचा सुप्रीम कोर्टाचे जुना आदेश असून आता तो आदेश मागे घेतल्याने एकप्रकारे प्रवेश परीक्षेचा मार्ग मोकळा झाला आहे.