वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया १० जूनपासून

0
19

पुणे : प्रथम वर्ष वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया येत्या १० जूनपासून सुरू होणार आहे. या दिवशी प्रवेशासाठी गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार असून, त्यानंतर पसंती क्रम अर्ज आॅनलाइन भरावे लागणार आहेत. गुणवत्ता यादीसाठी विद्यार्थ्यांना खेळ, एनसीसी, हैदराबाद-गोवा मुक्ती लढा आणि स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य यासाठी अतिरिक्त गुण देण्यात येणार आहेत.

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत घेण्यात आलेल्या ‘एमएचटी-सीईटी’ परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाल्यानंतर गुरुवारी प्रवेशाबाबतची अधिसूचना काढली असून, संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. संकेतस्थळावर दिलेल्या मुदतीत माहिती न भरल्यास त्या विद्यार्थ्यांचा अतिरिक्त गुणांसाठी विचार करण्यात येणार नाही. केवळ चार घटकांसाठीच अतिरिक्त गुणांची तरतूद आहे. फक्त टपालाद्वारे प्रमाणपत्रांच्या सत्यप्रती पाठविणाऱ्या विद्यार्थ्यांचा अतिरिक्त गुणांसाठी विचार केला जाणार नाही. सध्या मूळ प्रमाणपत्रे टपालाद्वारे पाठवू नयेत. प्रवेश प्रक्रियेदरम्यान समुपदेशनासाठी बोलावल्यानंतर ही कागदपत्रे दाखविणे आवश्यक आहे. असे प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त चंद्रशेखर ओक यांनी स्पष्ट केले आहे.

वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे संभाव्य वेळापत्रक

२ ते ५ जून : अतिरिक्त गुणांसाठी आॅनलाइन अर्ज भरणे

१० जून : गुणवत्ता यादी जाहीर करणे. विद्यार्थ्यांना गुणपत्रक

डाउनलोड करता येईल

१४ ते ३० जून : राज्यातील चार केंद्रांवर पसंती क्रम अर्ज भरणे

६ जुलै : प्रवेशाची पहिली निवड यादी जाहीर करणे

१५ ते २२ जुलै : यादीनुसार मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश घेणे