राज्यात खनिकर्म विद्यापीठ स्थापणार- मुख्यमंत्री

0
8

मुंबई, दि. 12 – राज्यात खनिकर्म उद्योगाचा विकास आणि त्यात रोजगार निर्मिती करण्यासाठी नागपुरात खनिकर्म विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे. रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथील खनिकर्म विद्यापीठ आणि महाराष्ट्र शासनादरम्यान आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्य उपस्थितीत आज त्यासाठी सामंजस्य करार झाला.

सेंट पीटर्सबर्ग येथील जगप्रसिद्ध हर्मिटेज म्युझियम आणि मुंबई महापालिका यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराच्या माध्यमातून कला व संस्कृतीच्या संवर्धन आणि विकासासाठी संयुक्तरित्या प्रयत्न करण्यात येणार आहेत.

सध्या रशिया दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वातील सेंट पीटर्सबर्ग खनिकर्म विद्यापीठाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. १७७३ मध्ये स्थापन झालेले हे विद्यापीठ आहे. विदर्भातील विपूल खनिज संपत्ती लक्षात घेता खनिकर्म विद्यापीठ हे या विद्यापीठाच्या सहकार्याने नागपुरात उभारण्याचा करार करण्यात आला. या विद्यापीठाचे प्रतिनिधी प्रा. व्लादीमीर लिटविनेंको यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. मुंबई महापालिकेचा हर्मिटेज सोबत करार

कला आणि संस्कृतीच्या सर्वसमावेशक विकासासाठी बृहन्मुंबई महापालिका आणि जगातील सर्वात मोठे आणि जुने म्युझियम म्हणून ख्याती असलेले सेंट पीटर्सबर्ग येथील हर्मिटेज म्युझअिम यांच्यात करार करण्यात आला. यावेळी मुंबई महापालिकेचे आयुक्त अजॉय मेहता उपस्थित होते.

महाराष्ट्र आणि रशियातील स्वेर्डलॉवस्क या प्रांतांमध्ये सिस्टर स्टेटचे संबंध स्थापन करण्यासाठीच्या करारावर काल सह्या करण्यात आल्या. यावेळी अजॉय मेहता, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी उपस्थित होते.