सर्व शिक्षा अभियानातील कर्मचार्‍यांना राज्य सरकारने सोडले वार्‍यावर

0
9

सुरेश भदाडे
गोंदिया-राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाचा डोलारा ज्यांच्या खांद्यावर उभा आहे; त्या सर्व शिक्षा अभियानातील कर्मचार्‍यांनाच राज्य सरकारने वार्‍यावर सोडल्याचे दिसून येत आहे़ राज्यभरातील सुमारे ६ हजार ५०० कर्मचारी सेवेत कायम होण्यासाठी धडपडत असून, नव्या सरकारकडून न्याय मिळण्याच्या अपेक्षेत आहेत़
१० जून रोजी सर्व शिक्षा अभियान कर्मचारी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत धरणे आंदोलन केले होते़ त्यावेळी आ़ गिरीश बापट यांनी नवीन सरकार येताच तत्काळ निर्णय घेऊन सेवेत कायम केल्याचा कागद कर्मचार्‍यांच्या हातात देऊ, असे आश्वासन दिले होते़ मात्र, त्यांच्या आश्वासनाचीही पूर्तता अद्याप न झाल्याने कर्मचार्‍यांमध्ये नैराश्य पसरले आहे़ गेल्या ९ वर्षांपासून कर्मचार्‍यांच्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे आ़ सुधीर मुनगंटीवार आता कॅबिनेट मंत्री झाले असून, ते हिवाळी अधिवेशनात तरी न्याय देतील काय, असा सवाल हे कर्मचारी करू लागले आहेत़

राज्य सरकारने १९९४ मध्ये जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम (डीपीईपी) सुरू केला होता़ राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये असलेला हा प्रकल्प २००३ पर्यंत सुरू होता़ पुढे याच सुमारास केंद्र सरकारने देशभर सर्व शिक्षा अभियान सुरू केले़ त्यावेळी डीपीईपीमधील कर्मचार्‍यांना सर्व शिक्षा अभियानात सामावून घेऊन अन्य नव्या पदांचीही भ्ररती करण्यात आली़ जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखालील समितीने लेखी परीक्षा, आवश्यक तेथे प्रात्यक्षिक व मुलाखतीद्वारे ही पदभरती केली होती़ त्यात कार्यकारी अभियंता, कनिष्ठ अभियंता, संगणक प्रोग्रॅमर, वरिष्ठ लेखा लिपिक, साधन व्यक्ती, डाटा एन्ट्री आॅपरेटर, सहायक कार्यक्रम अधिकारी, संशोधन सहायक इत्यादी १६ प्रकारच्या कर्मचाºयांचा समावेश आहे़ राज्य स्तरावर काही वेगळे कर्मचारी कार्यरत आहेत़ या सर्वांची भरती कंत्राटी पद्धतीने करण्यात आली़ मात्र, त्यांना ११ वर्षे होऊनही सेवेत कायम करण्यात आले नाही़ या कर्मचार्‍यांना पाचव्या वेतन आयोगानुसार वेतन देण्यात येत आहे़ सहावा वेतन आयोग अद्याप त्यांना लागू करण्यात आलेला नाही़ वेतनवाढ, वैद्यकीय रजा, वैद्यकीय देयक, महिला कर्मचार्‍यांना ६ महिन्यांची प्रसूती रजा अशा मुलभूत सुविधांपासून हे सर्व कर्मचारी वंचित आहेत़