ITI संस्थेतील प्रशिक्षणाचा दर्जा वाढविणार – मुख्यमंत्री फडणवीस

0
7

मुंबई, दि. 9 : राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य व कोकण रेल्वे कार्पोरेशन लि. आणि भारत
इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, यांच्या दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला आहे.त्यामुळे औद्योगिक क्षेत्राला मोठे प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली.
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य व कोकण रेल्वे कार्पोरेशन लि ,भारत इलेक्ट्रानिक्स लिमिटेड, तळोजा, नवी मुंबई, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, पुणे यांच्या दरम्यान विधान भवन येथे सामंजस्य करार करण्यात आला त्यावेळी श्री. फडणवीस बोलत होते यावेळी कौशल्य विकास व उद्योजकता विभाग मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे प्रधान सचिव दीपक कपूर तसेच व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयचे संचालक एस. एम. हस्ते, कोकण रेल्वेचे मुख्य कार्य अधिकारी नंदू तेलंग, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (तळोजा, नवी मुंबई) चे महाव्यवस्थापक दिनेश कुमार बत्रा, भारत इलेक्ट्रानिक्स लिमिटेड (पुणे)चे अतिरिक्त महाव्यवस्थापक व्ही. एच. मुजूमदार यावेळी उपस्थित होते
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, या सामंजस्य करारामुळे राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रशिक्षण सुविधांची गुणवत्ता व दर्जा यामध्ये वाढ होणार असून त्याद्वारे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील
विद्यार्थींना गुणात्मक व दर्जात्मक प्रशिक्षण मिळण्याची व्यवस्था झालेली आहे. यामुळेच प्रशिक्षित तरूण विद्यार्थी उपलब्ध होणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.