‘आयआयएम’ अखेर नागपूरमध्येच

0
12

नागपूर – राज्यातील पहिले इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) नागपुरात येत आहे. त्यासाठी केंद्राच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने “मिहान‘मधील दहेगावच्या जागेला अंतिम मंजुरी दिली. तसे पत्र सहसंचालक कार्यालयाला मिळाल्याची माहिती तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालक गुलाबराव ठाकरे यांनी दिली. शिवाय व्हीएनआयटीमध्ये आयआयएमचे तात्पुरते वर्ग सुरू करण्यासाठी मंत्रालयाने मान्यता दिली आहे. या मान्यतेमुळे आगामी सत्रात व्हीएनआयटीमध्ये आयआयएमचे वर्ग सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारने नागपुरात आयआयएम स्थापन करण्याची घोषणा केली. यानंतर आयआयएम अहमदाबादने नागपूर आयआयएमचे पालकत्व स्वीकारले. राज्याने आयआयएमसाठी “मिहान‘मधील दहेगाव परिसरात असलेली दोनशे एकर जागाही निश्‍चित केली. तसा प्रस्ताव सहसंचालकांनी केंद्राकडे पाठविला.

आयआयएममध्ये प्रवेश सुरू करण्याच्या दृष्टीने ताप्तुरती सोय म्हणून विश्‍वेश्‍वरैया राष्ट्रीय अभियांत्रिकी संस्थेची (व्हीएनआयटी) पर्यायी जागा सुचविली. या प्रस्तावानंतर मंत्रालयाच्या चमूने या दोन्ही जागांची पाहणी केली. चमूमध्ये मनुष्यबळ विकास विभागाचे सचिव अमरजित सिंग, अहमदाबाद आयआयएमचे संचालक प्रा. आशिष नंद, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव डॉ. संजय चहांदे, मुख्य अभियंता नरेंद्रकुमार, तंत्रशिक्षण सहसंचालक गुलाबराव ठाकरे यांचा समावेश होता.