पहिल्यांदाच पाहिली रेल्वे आणि विमान

0
13

नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांनी कथन केले अनुभव

नागपूर दि.२- आमच्या गावाकडे घनदाट जंगलः.जंगलातूनच मैलो न मैल पायपीटः.दिसलीच तर एखादी काळी-पिवळी टॅक्सीः..फार तर महामंडळाची एसटीः..एवढेच. त्यामुळे हीच वाहतुकीची साधने आहेत असा आमचा समज. मात्र यापलीकडेही वाहतुकीसाठी जलद साधने आहेत, ते आम्ही केवळ पुस्ताकात छायाचित्राच्या स्वरुपात पाहिले होते. ही साधने कशी असतात, आपल्याला प्रत्यक्षात पाहायला मिळणार का, अशी कल्पनासुध्दा केली नव्हती. मात्र पोलिसांच्या महाराष्ट्र दर्शन सहलीचा योग आला आणि आम्ही पहिल्यांदाच रेल्वे आणि विमान कसे असते, ते याची डोळा पाहिले. नव्हे तर रेल्वेचा प्रवास देखील अनुभवला, असे अनुभव नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांनी नागपूर भेटीदरम्यान सांगितले.

आपला महाराष्ट्र सुवर्ण जयंती सहल योजनेच्या माध्यमातून गडचिरोली पोलिसांनी नक्षलग्रस्त अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्राचे दर्शन घडविले. सहलीच्या शेवटच्या टप्प्यात गडचिरोलीतील आदिवासी विद्यार्थ्यांनी नागपूर शहरातील विविध स्थळांना भेटी देऊन नागपूरसोबतच राज्यातील मुंबई, पुणे, औरंगाबाद या विविध शहरातील शैक्षणिक तसेच औद्योगिक प्रगती व विकासाची माहिती घेऊन महाराष्ट्र दर्शनाचा लाभ घेतला.

महाराष्ट्र पोलिसांतर्फे सुरू करण्यात आलेल्या सहलीच्या उपक्रमाचा हा दहावा टप्पा होता. या सहलीत गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील ४१ मुले व ४० मुली असे एकूण ८१ विद्यार्थी सहभागी झाले होते. यात नक्षलपिडीत कुटुंबातील आणि नक्षल सदस्य असलेल्या कुटुंबातील प्रत्येकी ५ विद्यार्थ्यांचा समावेश होता. राज्यातील मुंबई, पुणे, औरंगाबाद आदी शहरांना भेटी देऊन विद्यार्थ्यांची ही सहल नागपूरात दाखल झाली. सहलीदरम्यान विद्यार्थ्यांनी दोन दिवसांत शहरातील डॉ. रमन विज्ञान केंद्र, दीक्षाभूमी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, वस्तु संग्रहालय, आकाशवाणी केंद्र, महाराज बाग, क्रेझी कॅसल वॉटर पार्क या ठिकाणी भेट देऊन शहरातील झालेल्या प्रगतीची माहिती जाणून घेतली. या संपूर्ण सहलीत विद्यार्थ्यांना मनोरंजनाच्या माध्यमातून विकासाचीसुध्दा माहिती देण्यात आली. विशेष म्हणजे मुंबईचे विमानतळ पाहण्याची संधी हुकल्यामुळे नागपूरातील विमानतळाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जास्तच उत्सुकता होती. विमान कसे असते, आकाशात ते कसे उडाण घेते आदी गोष्टी त्यांनी नागपूरात अनुभवल्या.