अदानी फाऊंडेशनद्वारे सेंद्रिय शेतीप्रेरक शेतकरी मेळावा

0
15

गोंदिया दि.१७- : अदानी पॉवर महाराष्ट्र लिमिटेड तिरोडाच्या आवारात अदानी फाऊंडेशन तिरोडातर्फे राबवीत येत असलेल्या श्री पध्दतीने सेंद्रिय धान्य लागवड करण्यासाठी शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता.या मेळाव्यात १0५0 शेतकर्‍यांनी हजेरी लावली होती. मेळाव्याप्रसंगी ५0 गावातील सरपंच, उपसरपंच तसेच गावातील ३00 च्या दरम्यान महिला व पुरुष उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अदानी पॉवर महाराष्ट्र लिमिटेडचे स्टेशड हेड सी.पी. शाहू म्हणाले, सेंद्रिय शेती क्रांतीकडे वाटचाल सुरू झालेली आहे. रासायनिक खतांचा वापर करून आप जलद उत्पन्न घेण्याच्या नादात जमिनीची सुपिकता नष्ट करीत आहेत. जमिनीची सुपिकता कायम ठेवण्याकरिता सेंद्रिय शेती करणे काळाची गरज असल्याचे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे उद््घाटन जिल्हा कृषी अधिक्षक अशोक कुरील,यांनी शेतकर्‍यांना आपल्या मार्गदर्शनात म्हणाले, सेंद्रिय शेतीमध्ये जिवाणू तयार होवून हवेतील नत्र शोषून घेतात जिवाणू तयार करण्यासाठी सेंद्रिय पध्दतीचा वापर करावा. यामुळे आपणास आरोग्यदायक अन्न तसेच कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळेल असे सांगितले.
गो विज्ञान अनुसंधान केंद्र, देवलापार येथील सुरेशकुमार ढवले यांनी आपल्या उद्बोधनात शेतकर्‍यांना शेती करणे शिकविण्याची गरज नसल्याचे सांगून शेतकरी हाच अनुभव असून गरज फक्त त्याला आपली मानसिकता बदलविण्याची आहे असे म्हटले. अदानी फाऊंडेशनचे प्रकल्प समन्वयक सुबोधकुमार सिंग, यांनी सेंद्रिय पध्दतीने शेती करणार्‍या शेतकर्‍यांची प्रोड्युसर कंपनी तयार करण्यात यावी व त्या कंपनीचे सर्व हक्क सदस्य शेतकर्‍यांच्या हातात असावे असे सांगितले.
अदानी फाऊंडेशनचे कैलास रेवतकर यांनी आपल्या प्रास्ताविकात रासायनिक शेतीचे दुष्परिणामावर प्रकाश टाकून आरोग्यदायक सेंद्रिय शेतीकडे वाटचाल करावे असे आवाहन केले. पाहुण्यांच्या हस्ते सेंद्रिय किटकनाशके, दशपर्णी अर्क, निमास्त्र, ब्रम्हाअस्त्र, अग्नीअस्त्र, गांडूळ खत तयार करून नियमित वापर सुरू केला. गोमूत्रापासून दंतमंजन, फेसपॉवडर, साबण तयार केल्याबद्दल सुशिला पारधी कवलेवाडा, कविता रहांगडाले कवलेवाडा, महेंद्र भदाडे धामनेवाडा, राजू टेकाम धामनेवाडा, बाबुराव तिडके जमुनिया, टेकचंद भैरम जमुनिया, रमेश पटले खडकी, संजय बिसेन बालापुर, मंगरू पटले धादरी आणि मच्छिद्रनाथ अंबुले एकोडी यांचे स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.