जयला बसविले रेडिओ आयडी कॉलर

0
7

पवनी दि.११-:उमरेड-करांडला अभयारण्याचा जय नामक वाघ हिरो ठरलेला आहे. जय या अभयारण्याच्या १८९ कि.मी. परिसरात व प्रादेशिक वनविभागाच्या जंगलात मुक्तपणे भ्रमण करीत असतो. त्यामुळे या महत्वपूर्ण जय वाघाची सुरक्षा करणे व त्यावर लक्ष ठेवण्याकरीता जयला रेडीओ आयडी कॉलर लावण्यात आले आहे.
दोन वर्षापासून उमरेड-करांडला अभयारण्यात दाखल झालेल्या जय नामक वाघामुळे या अभयारण्यात रौनक आली आहे. या अभयारण्याचा जय राजा झाला आहे. जयच्या धाकाने दुसरा वाघ येथे भटकण्याचाही प्रयत्न करीत नाही. जयच्या संर्पकामुळे पवनी वनपरिक्षेत्रातील दोन वाघीनींनी पाच शावकांना व उमरेड-करांडला अभयारण्याच्या भिवापूर उमरेड जंगलातील दोन वाघीनींनी सहा शावकांना जन्म दिला आहे.
जय वाघ हा आठ-पंधरा दिवस अभयारण्याच्या पवनी वन्यजीव वनपरिक्षेत्रात व प्रादेशिक वनविभागाच्या वणी वनपरिक्षेत्रातील जंगलात राहतो. नंतर हा आठ-पंधरा दिवस अभयारण्याच्या भिवापूर, उमरेड, करांडलाच्या जंगलात वास्तव्य करतो.
गोसीखुर्द धरणाचा जलस्तर मोठय़ा प्रमाणात वाढल्यामुळे मरू नदी पुर्ण पाण्याने भरली असतानाही हा जय वाघ मरू नदीच्या पाण्यात पोहून भिवापूरच्या जंगलात प्रवेश करतो. जय वाघ अभयारण्याच्या १८९ कि.मी. परिसरात व प्रादेशिक वनविभागाच्या जंगलात मुक्तपणे भ्रमण करतो. नागझीराच्या जंगलात माणसांना पाहून असणारा जय माणसासह कोणालाही घाबरत नाही.
काही दिवसापुर्वीच जयला रेडीओ आयडी कॉलर लावण्यात आले आहे. याला अधिकारी सूत्रांनीही दुजोरा दिला आहे.