मुंबईतून निघाली ‘व्याघ्र संवर्धन संदेश रॅली’

0
18

मुंबई दि.२४ : वाघांचे संवर्धन व संरक्षणाबाबत जनजागृती करण्यासाठी वन विभागाच्या वतीने आयोजित ‘महाराष्ट्र व्याघ्र संवर्धन संदेश जनजागृती रॅली’चा राज्याचे व्याघ्रदूत ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते शनिवारी हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ झाला.

मुंबईतील जुहू परिसरातील जनक कार्यालयापासून सकाळी सातला या जनजागृती रॅलीला सुरुवात झाली. रॅलीत ‘अलायन्स रायडिंग नाईट्स’ या संस्थेतर्फे मुंबई-ठाण्याहून 20 दुचाकीस्वार सहभागी झाले. ही रॅली मेळघाट व्याघ्र प्रकल्प, पेंच व्याघ्र प्रकल्प, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प तसेच ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट देऊन परतीच्या प्रवासाला निघणार आहे. वाघाचे अन्न साखळीतील महत्त्व, वाघाविषयी सर्वसाधारण माहिती, वाघांची संख्या, महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांची माहिती देत व्याघ्र संवर्धन व संरक्षणाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम या रॅलीच्या माध्यमातून केले जाणार आहे.

या रॅलीत राजीव तेलंग, हर्षिनी कान्हेकर, प्रणीश उरणकर, प्रथमेश साबळे, आनंद मोहनदास, व्हिक्टर पॉल, ओमयार वाटच्या, श्रीराम गोपालकृष्णन, शार्दुल चामलाटे, शहनवाज बोंदरे, मुनीष चेतल, पल्लवी राऊत, योगेश आंबेकर, योगेश साळुंखे, जितु गडकरी, अदनान तुंगेकर, निसर्ग अग्रवाल, चंदन ठाकुर, दीपक ग्रेग्रथ, राहुल शिंदे, आकाश साळवे, दिनेश सिंग, अभिजित पी. आदी सहभागी झाले.