अश्विनी भिडे-देशपांडे, नाथ नेरळकर यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान

0
20

नवी दिल्ली दि.२४: संगीत नाटक अकादमीतर्फे वर्ष 2014 चे पुरस्कार राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये एका शानदार सोहळ्यात प्रदान करण्यात आले. महाराष्ट्रातून शास्त्रीय गायक अश्विनी भिडे-देशपांडे, नाथ नेरळकर यांचा समावेश तर गोव्यातून तुलसीदास बोरकर आणि नाट्य अभिनेते रामदास कामत यांचा समावेश आहे.

संगीत, नृत्य, नाटक क्षेत्रात उत्कृष्ट तसेच अविरत कामगिरीबद्दल संगीत नाटक अकादमीतर्फे राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केले जातात. पुरस्कारप्राप्त कलाकारांची निवड महा परिषदेच्या वतीने केली जाते. त्यात संगीत, नृत्य, नाटक या क्षेत्रातील एकूण 40 कलाकारांची निवड 2014 च्या अकादमी पुरस्कारासाठी करण्यात आली.

संगीत नाटक अकादमी फेलोशीप प्राप्त कलाकारांना तीन लाख रूपये रोख, शाल आणि स्मृतिचिन्ह देण्यात येते. यावर्षी चार ज्येष्ठ कलाकारांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये तुलसीदास बोरकर (संगीतकार) एस.आर. जानकीरमन (संगीततज्ज्ञ), एम.एस. सथ्यू (चित्रपट निर्माते), विजय कुमार कीचलू (शास्त्रीय गायक) यांना सन्मानित करण्यात आले.

संगीत, नाटक, नृत्य, लोककला या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलाकारांना एक लाख रूपये रोख, ताम्रपत्र, शाल दिले जाते. यामध्ये देशातील एकूण 36 कलाकारांना आज सन्मानित करण्यात आले. संगीत क्षेत्रामध्ये अश्विनी भिडे-देशपांडे, इक्बाल अहमद खान व नाथ नेरळकर (हिंदुस्थानी गायन), नयन घोष (तबला), रोणु मजुमदार (बासरी), आर. संथनागोपालन (गंभीर कंठ संगीत), थुरूवालापुथूर टी. ए. कालीयामूर्ती (थावली), सुकन्या रामगोपाल (घातम), द्वाराम दुर्गा प्रसाद राव (व्हायोलिन) या कलाकारांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

नृत्य क्षेत्रामध्ये आर्याम्बथ जर्नादणन (भरतनाट्यम), उमा डोगरा (कथ्थक), एन. अमुसाना देवी (मनिपुरी), वेदांत्म राधेस्याम (कुचीपुडी), सुधाकर साहू (ओडीसी), अनिता शर्मा (सत्रिया), जागृ महतो (चाऊ), नवतेज सिंग जोहर (समकालीन नृत्य), वाराणसी विष्णु नामपूथीरी (कथकली) या कलाकारांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

नाटक क्षेत्रामध्ये असगर वजाहत (नाटक लेखन), सूर्या मोहन कुलश्रेष्ठा (दिग्दर्शन), चिदम्बरराव जाम्बे (दिग्दर्शन), देब शंकर हल्दार (अभिनय), रामदास कामत (अभिनय), अमोद भट (नाटक संगीत), मंजुनाथ भागवत होस्तोता (यक्षगाण), अमरदास माणिकपुरी (छत्तीसगड) याही कलाकारांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

लोककलांमध्ये पुरण शाह कोटी (लोकसंगीत-पंजाब), के.केशवासामी (पारंपरिक बाहुल्यांचे खेळ- पुदुचेरी), कलमंडलम राम मोहन (नेपथ्य-वेशभूषा- कथकली), रेबा कांत महंता (मुखवटे निर्मिती- असम), अब्दूल रशीद हाफीज (लोकसंगीत- जम्मू आणि काश्मिर), के. शानथोईबा शर्मा (थांग-ता- मनिपूर), रामदयाल शर्मा (नौटंकी- उत्तरप्रदेश), थांग डारलोंग (लोकसंगीत- त्रिपूरा) या कलाकारांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

कला क्षेत्राच्या सर्वंकष कामगिरीसाठी अक्षरा के.व्ही., इंदूधरा निदोडे यांना अकादमी पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.