सातवे ‘अँग्रो व्हिजन’ राष्ट्रीय प्रदर्शन ११ पासून

0
5

नागपूर दि.10: विदर्भातील शेतकर्‍यांसाठी वरदान ठरलेल्या ‘अँग्रो व्हिजन’ या राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाचे चार दिवसीय आयोजन रेशीमबाग मैदानावर ११ डिसेंबरपासून करण्यात येत आहे. मुख्य प्रवर्तक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदर्शन होणार आहे. कार्यशाळा आणि परिसंवादाद्वारे मिळणार्‍या भरघोस माहितीचा फायदा शेतकर्‍यांना होणार असल्याची माहिती प्रदर्शनाचे संयोजक गिरीश गांधी यांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिली. पत्रपरिषदेत ‘अँग्रो व्हिजन’चे संयोजन सचिव रमेश मानकर व रवी बोरटकर, जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर, ‘वेद’चे अध्यक्ष देवेंद्र पारेख, भाजपाचे जिल्हा अध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, माजी जि.प. अध्यक्ष अशोक धोटे, उपाध्यक्ष नितीन राठी, टेकचंद सावरकर, रमजान अन्सारी, श्रीकांत पांडे उपस्थित होते.
‘अँग्रो व्हिजन’मुळे शेतीत होत असलेले फायदे ठळकपणे दिसून येत आहेत. विदर्भातील शेतकर्‍यांमध्ये या कार्यक्रमाबाबत कमालीची उत्सुकता आहे. आयोजनाचे सातवे वर्ष आहे. ‘अँग्रो व्हिजन’चे उद््घाटन ११ रोजी दुपारी ३ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. मुख्य अतिथी म्हणून राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे उपस्थित राहतील. कृषी व महसूल मंत्री एकनाथ खडसे विशेष अतिथी तर अध्यक्षस्थानी नितीन गडकरी राहतील.

केंद्रीय मंत्री राधामोहन सिंग यांच्या हस्ते १२ डिसेंबरला सकाळी ११ वाजता कार्यशाळांचे उद््घाटन होईल. त्यानंतर तीन दिवस शेतकर्‍यांकरिता एकूण ४५ कार्यशाळा होणार असून देशभरातून येणारे ६0 तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. प्रयोगशील शेतकरी आपल्या यशोगाथा शेतकर्‍यांना सांगतील. कार्यशाळांसाठी मैदानावर चार सभागृहे उभारण्यात आली आहेत. इतर विषयांव्यतिरिक्त अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांच्या ‘कृषी क्षेत्रात रेडिएशनची उपयुक्तता’ या विषयावर कार्यशाळा होणार आहे. ड्रॅगनफ्रूट लागवड व बाजारपेठ, चंदनशेती, जवस सुधारित लागवड तंत्रज्ञान, जलयुक्त शिवार, जमिनीचे आरोग्य कार्ड, राष्ट्रीय बाजारपेठांची माहिती इत्यादी विषयांवरही कार्यशाळा प्रथमच घेण्यात येणार आहे.

शासकीय विभाग व खासगी कंपन्यांचा सहभाग
सात हँगर्स आणि मोकळ्या मैदानातील प्रदर्शनात शेती व पशुसंवर्धन, मत्स्योत्पादन, कुक्कुटपालन इत्यादी संलग्न विषयांशी संबंधित अशा ४00 हून अधिक खासगी तसेच सरकारी विभाग व संचनालय संस्था, संशोधन व शैक्षणिक संस्था आणि स्वयंसेवी संघटनांचा सहभाग आहे. प्रदर्शन आणि कार्यशाळांमध्ये प्रवेश विनामूल्य आहे. विदर्भ तसेच मध्य प्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेशातील शेतकरी सहभागी होतील. प्रदर्शन १२ ते १४ डिसेंबरपर्यंत दररोज सकाळी ११ ते सायंकाळी ७ पर्यंत खुले राहील. कार्यशाळा दुपारी १२ वाजता सुरू होईल. १४ रोजी दुग्धव्यवसाय व्यवस्थापन या विषयावर परिषद होईल