पक्ष शिस्तभंग करणाऱ्या मंत्री-आमदारांना भाजपाची तंबी

0
5

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे आयोजित करण्यात आलेल्या उद्बोधन वर्गाला गैरहजर राहणाऱ्या एकूण २२ मंत्री व आमदारांना भाजपातर्फे तंबी देण्यात आली आहे. या वर्गाबाबत सूचना देऊनदेखील न येणे हे पक्षशिस्तीला धरून नसल्याचे, पक्षाने जारी केलेल्या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. पक्षातील सदस्यांमध्ये शिस्त वाढीस लागली पाहिजे अशी अपेक्षा संघाकडून व्यक्त करण्यात आली होती. याची गंभीर दखल भाजपाने घेतल्याचे दिसून आले.

विधिमंडळ अधिवेशनाच्या निमित्ताने संघातर्फे उपराजधानीत आलेले भाजपचे आमदार व मंत्र्यांसाठी गुरुवारी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग स्थित स्मृतिमंदिर येथे उद्बोधन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. लोकप्रतिनिधींनी शिस्तीचे पालन करावे असे संघाचे अगोदरपासून मत आहे. त्यामुळेच भाजपातर्फे या कार्यक्रमात सर्वांची उपस्थिती रहावी यासाठी पक्षाचे मुख्य प्रतोद राज पुरोहित यांनी सर्व आमदारांना याची कल्पना दिली होती.

भाजपातर्फे वर्गस्थानावर उपस्थितांची हजेरीदेखील घेण्यात आली. प्रत्यक्ष वर्गाच्या वेळी १३९ आमदारांपैकी ११७ जणच उपस्थित असल्याची बाब समोर आली. अनुपस्थित असलेल्या २२ जणांमध्ये परिवहन राज्यमंत्री विजय देशमुख व आदिवासी विकास राज्यमंत्री अंबरीश आत्राम तसेच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे यांचादेखील समावेश होता. याची पक्षातर्फे गंभीर दखल घेण्यात आली व या सर्व आमदारांना तंबी देणारे पत्र पाठविण्यात आले. पक्षाने कळवूनदेखील अनुपस्थित राहणे हे पक्षशिस्तीच्या दृष्टीने योग्य नाही असे यात नमूद करण्यात आले आहे.विजय देशमुख, अंबरीश आत्राम, आशीष देशमुख, कृष्णा खोपडे, देवयानी फरांदे, अनिल मोटे, लखन मलिक, समीर मेघे, लक्ष्मण पवार, सुभाष देशमुख, अमल महाडिक, मितेश भांगडिया, विनायक मेटे, सुधीर पारवे, भारती लव्हेकर, राहुल अहेर, प्रभुदास भिलावेकर, संतोष दानवे, योगेश टिळेकर, सुधीर गाडगीळ, रामनाथ मोते, महादेव जानकर.