सुमतीताईंच्या प्रेरणेने कामाची स्फूर्ती मिळते-बावनकुळे

0
9

नागपूर : लोकमाता सुमतीताई सुकळीकर यांनी माझ्यावर पुत्रवत प्रेम केले. त्यांनी जी स्फूर्ती दिली त्यामुळेच कुठल्याही पदावर असलो तरी काम करण्याची प्रेरणा मिळते. त्यांनी पाहिलेल्या स्वप्नांकडे अग्रेसर होण्यासाठीच आम्हा सर्व कार्यकर्त्यांचे काम सुरू आहे. त्यांची प्रेरणा सदैव ऊर्जा देत राहील, असे मत पालकंमत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी व्यक्त केले.
लोकमाता सुमतीताई स्मृती प्रतिष्ठानतर्फे पाचवा वार्षिक सामाजिक पुरस्कार वितरण सोहळा सायंटिफिक सभागृहात आयोजित करण्यात आला. याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. याप्रसंगी कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मनपा स्थायी समितीचे माजी अध्यक्ष दयाशंकर तिवारी, माजी महापौर अटलबहादूर सिंग, न्या. विकास सिरपूरकर, बालरोगतज्ज्ञ डॉ. उदय बोधनकर, माजी महापौर कुंदाताई विजयकर, ज्योत्स्ना पंडित, प्रमिला असोलकर, सुहासिनी सुकळीकर उपस्थित होते. बावनकुळे म्हणाले, समाजासाठी काम करताना चुका टाळण्यासाठी काय करावे, हे सुमतीताईंनी शिकविले. सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांशी आपले संबंध सलोख्याचे असावे, हे त्यांनी शिकविले आणि त्यांचे संबंध सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांशी कौटुंबिक होते, असे ते म्हणाले.