स्वतंत्र विदर्भाच्या नावाने निवडणूक लढून दाखवा, पवारांचे मुख्यमंत्र्यांना जाहीर अाव्हान

0
6
वृत्तसंस्था
पुणे – ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतंत्र विदर्भ राज्य करण्यासाठीचा प्रस्ताव महाराष्ट्राच्या विधिमंडळात मांडून मंजूर करून दाखवावा. म्हणजे मग विदर्भात जनमत घेण्याचीही गरज पडणार नाही,’ असा उपहासात्मक सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी पुण्यातील एका सत्कार समारंभात बाेलताना दिला. ‘छोटी राज्ये करण्याची भारतीय जनता पक्षाची भूमिका आधीपासूनच स्पष्ट आहे. हे मत त्यांनी कधी लपविलेले नाही. त्यामुळे फडणवीसांना माझे एकच सांगणे आहे. त्यांनी स्वतंत्र विदर्भाच्या नावाने निवडणूक लढवावी. त्यात तुम्हाला यश आले तर तुम्हाला आमचा पाठिंबा असेल,’ असे अाव्हानही त्यांनी दिले.
स्वतंत्र विदर्भासाठी लढा वगैरे करायची माझी तयारी नाही, असे स्पष्ट करून पवार म्हणाले, ‘मराठी भाषकांचे राज्य होण्यासाठी संघर्ष झाला. १०६ हुतात्मे झाले. त्यामुळे महाराष्ट्र एकसंघ राज्य राहण्यात अधिक आनंद आहे. विदर्भ राज्याची मागणी सामान्य लोकांनी मतपेटीद्वारे व्यक्त केली तर मी त्याचा आदर करीन. मात्र आजपर्यंत निवडणुकीत वैदर्भीय जनतेने कधीही विदर्भवाद्यांना पाठिंबा दिलेला नाही,’ हे स्पष्ट करतानाच ‘पुणे जिल्ह्यातून शंभर रुपये जर सरकारला गेले तर त्यापैकी २०-२२ रुपयेच पुण्यात खर्च होतात. मात्र, विदर्भातून शंभर रुपये आले, तर १२०- १२२ रुपये विदर्भावर खर्च होतात,’ याकडेही पवारांनी लक्ष वेधले.