विद्यार्थ्यांनी साकारले वन्यजीवांचे चित्र ;पालकमंत्र्यांची सदिच्छा भेट

0
11

वन्यजीव संरक्षण व संवर्धन जनजागृती
गोंदिया(जिमाका),दि.१० : सारस महोत्सवाचे औचित्य साधून जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे व स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धन विषयक जनजागृती करण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी भित्ती चित्रकला स्पर्धेचे आयोजन आज केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरातील भिंतीवर करण्यात आले.
पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी याठिकाणी भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. वन्यजीवांचे काढण्यात येत असलेले चित्र पाहून त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतूक केले. यामध्ये विद्यार्थीनींची उपस्थिती लक्षणीय होती. भित्‍तीवरील चित्रकला स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूल, गुजराती राष्ट्रीय विद्यालय, राजस्थानी कन्या विद्यालय, गर्ल्स कॉलेज, प्रोग्रेसीव्ह हायस्कूल, रविंद्रनाथ टागोर हायस्कूल, मनोहर म्युन्सीपल हायस्कूल, विवेक मंदिर, सुकन्या हायस्कूल काटी, गोंदिया पब्लिक स्कूल, साकेत पब्लिक स्कूल, निर्मल हायस्कूल व जी.एस.हायस्कूल कवलेवाडाच्या विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला. सारस पक्षांचे, बार हेडेड गुज, कॉमन टेल, युरेशियन विंजेल यासह अन्य स्थलांतरीत व विदेशी पक्षांचे सुद्धा संवर्धन व संरक्षण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी त्यांच्या कल्पनेतून चित्र रेखाटले.
यावेळी पालकमंत्र्यांसमवेत जि.प.अध्यक्ष उषा मेंढे, आ.गोपालदास अग्रवाल, आ.विजय रहांगडाले, जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, उपविभागीय अधिकारी के.एन.के.राव, तहसिलदार संजय पवार, वन्यजीव प्रेमी डॉ.राजेंद्र जैन, मानद वन्यजीव रक्षक सावन बहेकार तसेच या स्पर्धेच्या आयोजनासाठी पुढाकार घेणारे वन्यजीव प्रेमी मुकूंद धुर्वे, दुश्यंत आकरे, शशांक लाडेकर, रवि गोलानी, अविजीत परिहार, राजकुमार खोडेचा, रुपेश निंबार्ते, राजेश तिवारी, डॉ.विजय ताते यांची उपस्थिती होती.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.जी.गिरडकर यांनी सुद्धा सारस महोत्सवादरम्यान आयोजित वन्यजीव संरक्षण व संवर्धन जनजागृती विषयक आयोजित भित्तीचित्रकला स्पर्धेदरम्यान के.टी.एस. जिल्हा सामान्य रुग्णालय परिसराला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला व ते काढत असलेल्या चित्रांचे कौतूक केले.