रस्ता सुरक्षिततेसाठी जनजागृती ही काळाची गरज- पालकमंत्री बडोले

0
12

२७ व्या रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन
गोंदिया,दि.१० : रस्ता सुरक्षिततेच्या दृष्टीने शिक्षण आणि अभियांत्रिकीच्या क्षेत्रात अभाव आढळतो. या क्षेत्रातील व्यक्तींनी आपआपल्या जबाबदाऱ्या ओळखून जिवित हानी टाळण्यासाठी काम करावे. रस्ता सुरक्षिततेसाठी जनजागृती करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
आज (१०) उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात १० ते २४ जानेवारी दरम्यान चालणाऱ्या २७ व्या रस्ता सुरक्षा अभियानाचे उदघाटन करतांना पालकमंत्री बडोले बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून आ.गोपालदास अग्रवाल, आ.विजय रहांगडाले, जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, अपर पोलीस अधीक्षक डॉ.संदीप पखाले, गोंदिया नगराध्यक्ष कशिश जायसवाल, माजी आ.हेमंत पटले, फुलचूर सरपंच उर्मिला दहीकर यांची उपस्थिती होती.
पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अपघात प्रवणस्थळी जिल्हा परिषदेने गतीरोधक तयार करावे. त्यामुळे अपघाताला आळा बसण्यास मदत होईल. शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत माहिती देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
सुरक्षेच्या बाबतीत हलगर्जीपणा केल्यास जीवनाची वाताहत होते असे सांगून पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, आपले जीवन सुरक्षित राहील अशाप्रकारचे नियम जीवनात अंमलात आणावे. रस्ता सुरक्षेसाठी जिल्ह्यातील संबंधित यंत्रणांनी अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करुन त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी. नशा करुन कोणीही वाहन चालवू नये. गोंदिया शहरात आवश्यक त्याठिकाणी सिग्नल लावण्यात येतील. शहरात मोठ्या प्रमाणात असलेल्या अतिक्रमणामुळे रस्ते अरुंद झाले आहेत. त्यामुळे असे अतिक्रमण हटविण्याच्या कामाकडे लक्ष देण्यात येईल. विद्यार्थी व नागरिकांना रेल्वे उड्डाण पूल सुरक्षितपणे ओलांडता यावा यासाठी समांतर स्काय वॉक नाविन्यपूर्ण योजनेतून तयार करण्यात येईल. रस्ता सुरक्षेसाठी प्रत्यक्ष कृतीवर भर दयावा अशी अपेक्षाही पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्ती केली.
अध्यक्षस्थानावरुन बोलतांना श्रीमती मेंढे म्हणाल्या, अपघात टाळण्यासाठी दुचाकी चालकाने व मागे बसणाऱ्या दोन्ही व्यक्तींनी हेलमेटचा वापर करण्याबाबत सक्ती करण्यात यावी तसेच नशा करुन कोणीही वाहन चालविणार नाही असा संकल्प करावा, असेही त्यांनी सांगितले.
आ.रहांगडाले म्हणाले, निष्काळजीपणा टाळला तर निश्चितच अपघाताचे प्रमाण कमी होतील. वाहनात बसल्यानंतर सुरक्षिततेसाठी असलेल्या उपकरणांचा वापर प्रत्येकाने केला पाहिजे, असेही ते म्हणाले.
जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी म्हणाले, पृथ्वीवरचा अत्यंत हुशार प्राणी हा मनुष्य आहे. हाच मनुष्यप्राणी त्याच्या चुकांमुळे अपघातात मोठ्या प्रमाणात मृत्यूमुखी पडतो. सुरक्षा विषयक नियमांचे पालन न केल्यास अपघात होतो, प्रसंगी मृत्यूला सामोरे जावे लागते. वाहतुकीचे नियम हे आपल्या जीवन मरणाशी संबंधित आहे. वाहन चालवितांना व बसतांना सिटबेल्ट व हेलमेटचा वापर नियमितपणे केला पाहिजे. निष्काळजीपणामुळे वाहन चालविणे हेच मृत्यूस कारणीभूत असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ.पखाले म्हणाले, वाहतूक सुरक्षेकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून योग्यप्रकारे नियमांचे पालन करावे. जिल्ह्यातील अपघात प्रवणस्थळांचा अभ्यास करुन भविष्यात त्याठिकाणी अपघात होणार नाही याचे नियोजन करण्यात येईल, असे सांगितले. अपघात टाळण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
नगराध्यक्ष जायसवाल यांनी, रस्त्याने वाहन चालवितांना नियमांचे पालन करावे त्यामुळे स्वत:चे व दुसऱ्याचे नुकसान होणार नाही. युवकांनी विशेषत: वाहने हळू चालवावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी अतिथींच्या हस्ते रस्ता सुरक्षेबाबत तयार करण्यात आलेल्या घडिपुस्तिका व माहिती पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. मोटार वाहन निरीक्षक प्रशांत चिंचोळकर यांनी तयार केलेल्या अर्धस्वप्न या वृत्तपटाचेही विमोचन पाहुण्यांनी केले.
कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी के.एन.के.राव, पोलीस उपअधीक्षक(गृह) सुरेश भवर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.राठोड, आगार प्रमुख गौतम शेंडे, तहसिलदार संजय पवार, पोलीस निरीक्षक श्री.सोनवणे, अधिकारी-कर्मचारी समन्वय समितीचे दुलीचंद बुध्दे, उपविभागीय अभियंता संजय कटरे,अश्विन ठक्कर, लिलाधर पाथोडे, मोटार वाहन निरीक्षक विशाल भोवते ,आडे,पोलिस निरिक्षक दिनेश शुक्ला,राजू सोनेवाने,रामनगरचे ठाणेदार पवार अनेक विभागाचे अधिकारी तसेच गोंदिया शहरातील अनेक शाळांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रस्ताविक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नारायण निमजे यांनी केले. संचालन अपूर्व अग्रवाल यांनी तर उपस्थितांचे आभार वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी मानले.