भूमाता रणरागिनी ब्रिगेड आंदोलन करणार शनिच्या दर्शनासाठी

0
12

अहमदनगर,दि.२४ – महिलांना चौथऱ्यावरून शिंगणापूरच्या शनिचे दर्शन मिळावे, या मागणीसाठी २६ जानेवारी रोजी भूमाता रणरागिनी ब्रिगेड आंदोलन करणार असून यावेळी अनूचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. त्यात २० महिला पोलिसांची मंदिर परिसरात नेमणूक करण्यात आली आहे. तसेच गावकरी महिलांही शनिभोवती कवच करणार असल्याची माहिती आहे.

४०० महिलांना घेऊन शनिचे चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेणार असल्याचा इशारा भूमाता रणरागिनी ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी दिल्यामुळे शनि मंदिर ट्रस्टसह पोलिसांसमोरही मोठा पेच निर्माण झाला आहे. चौथऱ्यावर जाऊन महिलांना शनिचे दर्शन घेण्यास मनाई असल्यामुळे या आंदोलनावेळी अनूचित प्रकार घडण्याची दाट शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. तो टाळण्यासाठी पोलिसांनी सुरक्षा यंत्रणेत वाढ केली आहे. यात विशेषकरून २० महिला पोलिसांचा समावेश करण्यात आला आहे. त्यांची नियुक्ती मंदिर परिसरात केली आहे. तसेच मंदिराभोवती १०० मी. अंतरावर बॅरिगेटस लावण्यात आले आहेत. तर मूर्तिभोवती ४० कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

मंदिरात येणाऱ्या प्रत्येक महिला भाविकाची कसून तपासणी करण्यात आहे. शनि शिंगणापूर येथील महिलांनीही भूमाता रणरागिनी ब्रेगेडविरोधात एकत्र आल्या आहेत. त्या ४०० च्या संख्येने येत असतील तर आम्ही ४ हजाराच्या संख्येने शनिभोवती कडे करू, असा इशाराच त्यांनी यावेळी दिली आहे. दरम्यान, तृप्ती देसाई यांनी अहमदनगरचे जिल्हाधिकारी यांना परवानगीसाठी पत्र लिहिले आहे. यात त्यांनी आंदोलनामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असेल तर मला हेलिकॉप्टरने शनिच्या चौथऱ्यावर उतरण्याची परवानगी द्यावी, असे नमूद केले आहे.