पालकमंत्र्यांना झाले सारसांचे दर्शन; समिती सदस्यांशी चर्चा

0
12

गोंदिया,दि.२४ : सारस महोत्सवाचे औचित्य साधून पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी आज २४ जानेवारी रोजी पहाटे सारस पक्षांचे अस्तित्व असलेल्या गोंदिया तालुक्यातील झिलमिली आणि परसवाडा तलाव परिसराला भेट दिली. भेटी दरम्यान झिलमिली तलावांच्या काठावर त्यांना सारस पक्षी बघायला मिळाले. सारस पक्षी बघून पालकमंत्र्यांना आनंद झाला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, पालकमंत्र्यांच्या सुविद्य पत्नी शारदा बडोले,‍  ठाकूर , मानद वन्यजीवरक्षक सावन बहेकार, पालकमंत्र्यांचे स्वीय सहायक समीर बनसोडे, सोनोने,वाघ, माने उपस्थित होते.
सारस महोत्सवामुळे सारस व अन्य स्थलांतरीत पक्षांचे संरक्षण आणि संवर्धनाची लोकचळवळ उभी झाल्याचे चित्र पालकमंत्र्यांना परसवाडा गावात प्रवेश करतांना दिसून आले. परसवाडा येथील अनेक घरांच्या भिंतीवर सारसांचे तसेच ग्रे लेग गूज, बार हेडेड गूज, नॉर्थन पिंटेल, फिजंट टेल जकाना, परपल स्पॅम्पेन, कॉम्ब डक, लेसर व्हिसलींग डक आदी स्थलांतरीत पक्षांचे चित्र पहावयास मिळाले.
सारस पक्षांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी येणाऱ्या अडचणी, त्यांचा धोक्यात असलेला अधिवास, त्यांच्या घरट्यांची जपणूक या विषयावर पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी, मानद वन्यजीव रक्षक व जैविक विविधता समितीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. सारसांचे अस्तित्व असलेल्या शेतात शेतकऱ्यांनी रासायनिक किटकनाशकांचा वापर न जैविक किटकनाशकांचा वापर करुन या पक्षांचे अस्तित्व धोक्यात येणार नाही याची काळजी संबधित शेतकरी बांधवांनी घ्यावी,यावी असेही त्यांनी सांगितले.
परसवाडा येथे जिल्हा पर्यटन समितीच्या वतीने बांधण्यात येत असलेल्या पक्षीविषयक माहिती केंद्राची पाहणी केली. या केंद्रात सारस व अन्य स्थलांतरीत पक्षांची छायाचित्र तसेच जैवविविधतेबाबतची माहिती पर्यटकांना व पक्षी अभ्यासकांना उपलब्ध होणार आहे.
पालकमंत्र्यांनी यावेळी परसवाडा जैविक विविधता समितीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी सलीम शेख-अध्यक्ष, डुलेंद्र हरिणखेडे-सरपंच, गोविंद उईके-उपसरपंच, लखन हरिणखेडे, दिनेश हरिणखेडे, राहूल भावे, रतिराम क्षीरसागर, गौरव बोपचे, मुन्नालाल पारधी व अनुराग शुक्ला उपस्थित होते.