३०, ३१ जानेवारीला राज्य शिक्षक परिषदेचे गडचिरोलीत अधिवेशन

0
9

गडचिरोलीत,दि.२४: महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे विभागीय अधिवेशन गडचिरोली येथे ३० व ३१ जानेवारी रोजी होणार असून नागपूर विभागातील सहा जिल्हयांमधील शिक्षक त्यात सहभागी होणार असल्याची माहिती शिक्षक परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

 सत्यम चकिनारप यांनी सांगितले की, गडचिरोली येथील संस्कृती लॉन येथे हे अधिवेशन होणार असून, ३० जानेवारीला सकाळी ११ वाजता राज्याचे शालेय शिक्षण व क्रीडामंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन होईल. खा.अशोक नेते प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. राज्य शिक्षक परिषदेचे नागपूर विभागाचे अध्यक्ष डॉ.उल्हास फडके कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहतील. पहिल्या दिवशी “प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र” या विषयावर बिट, केंद्र, शाळा, पंचायत व जिल्हास्तरांवरील सादरीकरण आणि चर्चा करण्यात येणार आहे. त्यात राज्यभरातील तज्ज्ञ शिक्षक मार्गदर्शन करतील.

दुसऱ्या दिवशी ३१ जानेवारी रोजी सकाळी योग व प्राणायाम यावर सत्यम चकिनारप मार्गदर्शन करतील. त्यानंतर “राष्ट्रविकासात शिक्षकांची भूमिका”या विषयावर मोहन गोपाल पुरोहित मार्गदर्शन करतील. सकाळी साडेदहा वाजता केंद्रीय रस्ते व जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत व संघटनेचे प्रांताध्यक्ष वेणूनाथ कडू यांच्या अध्यक्षतेखाली समारोपीय कार्यक्रम होईल. चिमूरचे आमदार कीर्तिकुमार भांगडिया हे या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष आहेत, अशी माहिती श्री.चकिनारप यांनी दिली. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद शिक्षक व विद्यार्थ्यांच्या हिताचे उपक्रम राबवीत असून, शिक्षक भरती प्रक्रिया व अन्य बाबतीत पारदर्शक धोरण राबविण्यासंदर्भात परिषद आग्रही असल्याचेही श्री.चकिनारप यांनी यावेळी सांगितले.

पत्रकार परिषदेला राज्य शिक्षक परिषदेचे नागपूर विभागाचे सहकार्यवाह सत्यम चकिनारप, माध्यमिक विभागाचे जिल्हाध्यक्ष विजय कोमेरवार, जिल्हा कार्यवाह रमेश बोरकर, जिल्हा संघटक गिरीश तलवलकर, प्राथमिक विभागाचे जिल्हाध्यक्ष अविनाश तालापल्लीवार, जिल्हा कार्यवाह प्रमोद खांडेकर, जिल्हा उपाध्यक्ष यशवंत शेंडे, गोपाल मुनघाटे, सत्यवान मेश्राम उपस्थित होते.