“ज्यांची जयंती साजरी होत नाही, त्यांच्याच विचारांनी देश चालतो”

0
14

गडचिरोली, : पारतंत्र्याच्या काळात पुढाऱ्यांचा एक वर्ग इंग्रजाविरुद्ध लढत होता, तर दुसऱ्या वर्गातील धुरिणांनी सामाजिक लढयाचे नेतृत्व स्वीकारुन बहुजन समाजाला सामाजिक गुलामगिरीतून मुक्त करण्याचा प्रयत्न केला. या दुसऱ्या वर्गातील पुढाऱ्यांचे विचारच देशाला तारणारे आहेत. मात्र ज्यांची जयंती साजरी होत नाही, त्यांच्याच विचारांनी आज देश चालत आहे, अशी खंत भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय प्रचारक डॉ.समीर कदम यांनी व्यक्त केली.

मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड व अन्य संघटनांच्या संयुक्त विद्यमाने येथील शिवाजी महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात “छत्रपती शिवरायांच्या काळातील राज्यव्यवस्था” या विषयावर ते बोलत होते. विशेष अतिथी म्हणून जमाते-इस्लाम-ए-हिंद संघटनेचे नेते प्रा. मोहम्मद अयुब उपस्थित होते. अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष दादाजी चापले हे होते. प्रमुख अतिथी म्हणून बावणे कुणबी समाज संघटनेचे प्राचार्य तेजराव बोरकर, प्रा. मुकेश उरकुडे, प्रा. सूर्यकांत भोंगळे, रत्नदीप म्हशाखेत्री, देवानंद कामडी, सुरेश भांडेकर, चंद्रकांत लेनगुरे, रामदास होकम, दत्तात्रेय खरवडे, नामदेव शेंडे, जनार्धन ताकसांडे, अशोक गडकरी, दिलीप माणुसमारे, सुरेश मांडवगडे, रफिक कुरैशी, गोवर्धन चव्हाण, धर्मानंद मेश्राम, पांडुरंग भांडेकर, डी. एन. बर्लावार आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ.समीर कदम पुढे म्हणाले, इंग्रज भारतातून गेले, म्हणजे केवळ सत्तेचे हस्तांतरण(पॉवर ऑफ ट्रान्सफर) झाले. ते स्वातंत्र्य नव्हते. त्यामुळे जातिव्यवस्थेच्या माध्यमातून सामाजिक गुलामगिरी जशीच्या तशीच होती. या व्यवस्थेला प्रथम सुरुंग लावण्याचे काम म.ज्योतिबा फुल्यांनी केले. म.फुल्यांनीच सर्वप्रथम छत्रपती शिवरायांची समाधी शोधून काढली आणि त्यांच्यावरील पोवाडाही त्यांनीच लिहिला. छत्रपती शिवरायांची राज्यव्यवस्था ही सर्व धर्मियांचा आदर करणारी आणि सर्वांना सोबत घेऊन चालणारी होती. म्हणून शिवराय हे खऱ्या अर्थाने रयतेचे जाणते राजे ठरले, हे डॉ.कदम यांनी विविध दाखले देत स्पष्ट केले. अजूनही राज्यव्यवस्था, प्रशासकीय व्यवस्था, न्यायव्यवस्था, कार्यपालिका व माध्यमे मूठभर लोकांच्याच हातात आहेत. या सर्व व्यवस्था बहुजनांच्या हातात आल्याशिवाय त्यांचा उद्धार शक्य नाही, असे डॉ.कदम म्हणाले. शिवराय हे सर्व जातिधर्माचे राजे होते. अनेक मुस्लिम सरदार त्यांच्या राज्यव्यवस्थेचे अविभाज्य अंग होते. परंतु इतिहासकारांनी शिवरायांना “गो ब्राम्हण प्रतिपालक” ठरवून त्यांचे खरे कार्य लपवून ठेवले, अशी टीकाही डॉ.कदम यांनी केली. म.फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, राजर्षि शाहू महाराज यांच्या विचारांनीच बहुजनांची प्रगती शक्त आहे, असेही ते म्हणाले.

“छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील समाजव्यवस्था” या विषयावर बोलताना प्रा.मोहम्मद अयुब म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी भेदभाववृत्तीला कधीही थारा दिला नाही. मुस्लिम स्त्रियांचा त्यांनी आदर केला. शिवरायांमध्ये नेतृत्व आणि शौयगुण उपजतच होते. जिजाऊंनी त्या गुणांना चालना दिली. त्यांनी आपला राज्यकारभार पूर्ण जबाबदारीने व न्यायाने केला, असेही प्रा.अयुब यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठा सेवा संघाचे कार्याध्यक्ष पांडुरंग नागापुरे, संचालन प्रा.संध्या येलेकर व स्मिता लडके यांनी केले. विनायक बांदूरकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाला प्राचार्य खुशाल वाघरे, दादाजी चुधरी, प्रा. शेषराव येलेकर, सुरेश लडके, एस. टी. विधाते, सुरेश डोंगे, राजेंद्र गोहणे, पी. एम. झंझाळ, पुरूषोत्तम म्हस्के, प्राचार्य घनश्याम दिवटे यांच्यासह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.