दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटीबद्ध – मुख्यमंत्री फडणवीस

0
19

नागपूर : दिव्यांग व्यक्तींमध्ये असणाऱ्या विशेष अंगभूत गुणांमुळे ते सामान्यांपेक्षा जास्त चांगली कामगिरी बजावू शकतात. त्यांना प्रोत्साहनाची गरज आहे. दिव्यांगांना शिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण, घरकुलाचा लाभ, तसेच आरोग्य सेवा पुरविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र राजस्व अभियान 2015 अंतर्गत मध्य नागपूर व जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र, नागपूर (अपंग सक्षमीकरण विभाग, सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार द्वारा नियुक्त महात्मा गांधी सेवा संघ) यांच्या संयुक्त विद्यमाने आज चिटणीस पार्क येथे दिव्यांग लाभार्थ्यांना नि:शुल्क आधुनिक साहित्य व उपकरण वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय भूपृष्ठ परिवहन महामार्ग आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार अनिल सोले, विकास कुंभारे, सुधाकर कोहळे, महापौर प्रवीण दटके, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव जोंधळे, जिल्हा परिषद अध्यक्षा निशा सावरकर तसेच जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्राचे अधिकारी, कर्मचारी, दिव्यांग लाभार्थी आणि पालक मोठया संख्येने उपस्थित होते.

यावेळी दिव्यांग लाभार्थ्यांना 1133 प्रकारचे आधुनिक साहित्य व उपकरणांचे वाटप करण्यात आले. यामध्ये अंध व्यक्तींना डेझी प्लेअर्स, इलेक्ट्रॉनिक केन, ब्रेल किट्सचे वाटप करण्यात आले. तसेच कर्णबधीर आणि मतीमंद व्यक्तींकरिता व्हील चेअर, आधुनिक श्रवण यंत्र, एमआर कीट्सचे वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे यावेळी 250 मोटराईज ट्रायसिकल लाभार्थ्यांना प्रदान करण्यात आले. ही ट्रायसिकल बॅटरीवर चालणारी असून ती 40 किलोमीटरपर्यंत चालते. 

दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणाबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, दिव्यांग व्यक्तींना घरकुल योजनेसाठी दारिद्य्र रेषेखाली असणारी अट शासनाने काढून टाकली आहे. दिव्यांग व्यक्तींच्या सर्वांगिण विकासासाठी विविध योजना आणि उपक्रम राबविण्याचे राज्य शासनाचे नियोजन आहे. त्याबाबत जिल्हा पातळीवर कार्यवाही सुरु आहे. सर्व दिव्यांग लाभार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांना आधुनिक साहित्य आणि उपकरणे देण्यात येईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, समाजातील दिव्यांग लोकांची सेवा करण्याच्या दृष्टीने अशा कार्यक्रमाचे विशेष महत्त्व आहे. दिव्यांग व्यक्तींबद्दल संवेदनशील भावना जपणे हे आपले सामाजिक कर्तव्य आहे. त्यांना सन्मानाने जगण्याचे पाठबळ मिळावे यासाठी शासनातर्फे विविध उपक्रम राबविले जातात. त्या योजनांचा आणि उपक्रमांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे ही सामाजिक जबाबदारी आहे. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी केले. कार्यक्रमाची पार्श्वभूमी आमदार विकास कुंभारे यांनी विषद केली. सुरुवातीला अंध विद्यालय, दक्षिण अंबाझरी रोड, नागपूरच्या विद्यार्थ्यांनी स्वागतपर गीत सादर केले. या स्वागतपर गीताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतूक केले. सूत्रसंचालन दिनेश मासोदकर आणि श्वेता शेलगावकर यांनी तर आभार बंडू राऊत यांनी मांडले.