गोदावरी नदीत नाव उलटल्याने २२ जण बुडाले, ६ जण बेपत्ता

0
6

गडचिरोली, दि.२१: येथून गोदावरी नदीमार्गे तेलंगणा राज्याकडे जात असलेली नाव उलटल्याने २२ प्रवासी पाण्यात बुडाले. यातील १६ जणांना वाचविण्यात यश आले असून, अजूनही ६ जण पाण्यात बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना आज दुपारनंतर साडेचार वाजताच्या सुमारास घडली.

सिरोंचा तालुका व तेलंगणा राज्याच्या मधोमध गोदावरी नदी वाहते. या नदीवर पुलाचे बांधकाम सुरु असून, लोकांना ये-जा करण्यासाठी रपटा तयार करण्यात आला आहे. पुलाचे काम सुरु असल्याचे गोदावरी नदीच्या पाण्याचा प्रवाह वळविण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे कालपासून रस्ता बंद करण्यात आला असून, स्ट्रीमर बोटद्वारे प्रवाशांची ने-आण केली जात आहे. दरम्यान आज दुपारी सिरोंचाकडील काठावरुन तेलंगणा राज्यातील कालेश्वरनजीकच्या कन्नेपल्लीकडील काठाकडे प्रवासी घेऊन जाणारी नाव मुख्य प्रवाहात आल्याने ती रपटा बनविलेल्या लोहपुलाला जाऊन आदळली. यामुळे नाव उलटून २२ प्रवासी पाण्यात बुडाले. यावेळी उपस्थित नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न केल्याने १६ जणांना वाचविण्यात यश आले. मात्र, संध्याकाळपर्यंत ६ जण बेपत्ताच होते. त्यात ३ लहान मुलांचाही समावेश असल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी शिवाजी पवार, पोलिस निरीक्षक दिलीप लुकडे व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. वनविभाग व महसुल विभागाचे अधिकारीही बचाव कार्यासाठी सरसावले. तेलंगणा राज्यातील विशेष चमूचीही बचाव कार्यासाठी मदत घेतली जात आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.