सप्ताहामुळे समाजात एकोपा व समरसता वाढीस मदत – नरेंद्र लोणकर

0
10

गोंदिया,दि.११ : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्ताने राज्यात सामाजिक समता सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहामुळे समाजकल्याण विभागाच्या व अधिनस्त असलेल्या विविध महामंडळाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचण्यास मदत होणार असून सप्ताहामुळे समाजात एकोपा व समरसता वाढीस मदत होईल. असे मत निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांनी व्यक्त केले.
८ ते १४ एप्रिल दरम्यान डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती निमित्ताने साजरा करण्यात येणाऱ्या सामाजिक समता सप्ताहाचे उदघाटन ८ एप्रिल रोजी सामाजिक न्याय भवन येथील सभागृहात श्री.लोणकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते उपस्थितांना मार्गदर्शन करतांना बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून संत रोहिदास चर्मकार महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक विजयालक्ष्मी भगत, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्ग विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक अनंत मुडे, राजीव गांधी समाजकार्य महाविद्यालयाच्या प्राचार्य मंगला कटरे, निबंधक प्रा.संगीता घोष, सामाजिक कार्यकर्त्या सविता बेदरकर, समाजकल्याण सहायक आयुक्त मंगेश वानखेडे, प्रभारी जिल्हा समाज कल्याण अधिकारी मिलिंद रामटेके यांची उपस्थिती होती.
श्री. लोणकर पुढे म्हणाले, सप्ताहामुळे समाजकल्याण विभागाच्या विविध योजना तसेच विविध महामंडळाच्या योजना अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांपर्यंत पोहोचवाव्यात. त्यामुळे खऱ्या अर्थाने सामाजिक समता सप्ताह साजरा केला असे म्हणता येईल. यावेळी उपस्थित पाहुण्यांनी सुद्धा मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला जिल्ह्यातील विविध कार्यालयातील कर्मचारी तसेच जिल्हा ग्रंथालयातील कर्मचारी, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी, शासकीय वसतीगृहे व निवासी शाळांमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहायक आयुक्त मंगेश वानखेडे यांनी केले. संचालन करुणा मेश्राम यांनी तर उपस्थितांचे आभार श्री.रामटेके यांनी मानले.