राजगुडा व सिंदीपार येथे ग्रामरोजगार दिवस

0
19

गोंदिया,दि.३ : महाराष्ट्र स्थापना दिवस आणि कामगार दिवसाचे औचित्य साधून १ मे रोजी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सडक/अर्जुनी तालुक्यातील राजगुडा व सिंदीपार येथे एक दिवस मजूरासोबत राहून ग्रामरोजगार दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसभापती विलास शिवणकर होते. उदघाटक म्हणून तहसिलदार व्ही.एम.परळीकर होते. प्रमुख अतिथी म्हणून सरपंच पुष्पमाला पंचभाई, सहायक कार्यक्रम अधिकारी भारत बोदेले, तांत्रिक अधिकारी मुनेश्वर चौधरी यांची उपस्थिती होती.
तहसिलदार परळीकर यावेळी म्हणाले, ज्या मजुरांनी १०० दिवस काम केले आहे अशा मजूरांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यात येईल. आम आदमी विमा योजना व कामगार कल्याण मंळाच्या विविध योजनांची माहिती त्यांनी दिली. यावेळी त्यांच्या हस्ते महसूल विभागाकडून मजूरांना आधार कार्ड, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र, उत्पन्नाचे दाखले, सात-बारा देण्यात आले. सन २०१६-१७ च्या मजूराची तरतूद व नियोजन आराखडा सरपंचांना देण्यात आला.
सहायक कार्यक्रम अधिकारी श्री.बोदेले यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेविषयी ग्रामस्थांना वैयक्तीक शौचालय, सिंचन विहिर, गुरांचा गोठा, शोषखड्डे व कृषी कामाबाबतची माहिती दिली.
राजगुडा हे गाव जंगलव्याप्त असून आदिवासी बांधवांची बहुसंख्या या गावात जास्त आहे. जलयुक्त शिवार अभियानामध्ये राजगुडा(मोगरा) सन २०१६-१७ मध्ये घेण्यात आले आहे. या गावामध्ये विविध कामाचे नियोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य, ग्रामरोजगार सेवक नरेश मेश्राम यांचेसह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार ग्रामसेवक पुष्पा चाचेरे यांनी मानले.