मुंबईतील डबेवाले पोहोचविणार स्वच्छ भारत चा संदेश

0
14

मुंबई, दि. 12 : स्वच्छ भारत अभियान हे अभियान न राहता आता एक
लोकचळवळ झाली असून या चळवळीत मुंबईतील डबेवालेही सामील झाले आहेत.
मुंबईतील डबेवाले जेवणापूर्वी हात स्वच्छ धुवावे, डब्यातील शिल्लक अन्न
इतरत्र न टाकता ते वेस्टबीनमध्येच टाकावे हा स्वच्छतेचा संदेश दोन लाख
कुटूंबापर्यंत पोहोचविणार आहेत.
अंधेरी रेल्वे स्टेशन येथे आज ‘स्वच्छ भारत मिशन’चे प्रकल्प
संचालक प्रविण प्रकाश यांच्या हस्ते या मोहिमेचा शुभारंभ झाला. यावेळी
स्वच्छ महाराष्ट्र अभियान चे संचालक उदय टेकाडे, मुंबई डबेवाला संघटनेचे
माजी अध्यक्ष रघुनाथ मदगे यांचेसह मुंबईतील डब्बेवाले मोठया संख्येने
उपस्थित होते.
यावेळी स्वच्छ भारत अभियानाचे प्रकल्प संचालक श्री. प्रकाश
म्हणाले की, स्वच्छ भारत अभियानात मुंबई डबेवाले स्वयंस्फूर्तीने सहभागी
होऊन स्वच्छतेचा संदेश देणार आहेत, ही या अभियानाची फलश्रुती आहे.
मुंबईतील डबेवाले दररोज दोन लाख व्यक्तींपर्यंत डब्बे पोहोचविण्याचे काम
करतात. या डब्यांवर लावण्यात आलेल्या स्वच्छतेच्या संदेशामुळे
डब्बेवाल्या व्यक्ती व त्यांचे कुटूंब यांच्यामध्ये स्वच्छतेची शिस्त
येण्यास मदत होणार आहे.
मुंबई डबेवाला संघटनेचे माजी अध्यक्ष श्री. मदगे म्हणाले की,
स्वच्छता बाळगणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. या कर्तव्य भावनेतून
आम्ही या अभियानात सहभागी होणार असून येत्या आठ दिवसांत मुंबईतील सर्व
डबेवाले वाटप करीत असलेल्या दोन लाख डब्यांवर स्वच्छता संदेशाचे स्टीकर
स्वत:हून लावणार आहोत.प्रातिनिधीक स्वरुपात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते
डब्यांवर स्टीकर लावण्यात आले.