काचेवानीत अदानीच्या सौजन्याने जलशुद्धीकरण प्रकल्पाचे उद्घाटन

0
8

गोंदिया,दि.१३ : चांगल्या आरोग्यासाठी शुद्ध पाणी ही प्राथमिक गरज आहे. ५० टक्के आजार अशुद्ध पाण्यामुळे उद्भवतात. ही शुद्ध पाण्याची सुविधा आपल्या गावात उपलब्ध झाल्यामुळे आजारांना दूर ठेवून आपल्या कुटुंबियांचा वैद्यकीय उपचारावरील खर्च वाचू शकेल, असा विश्वास जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी व्यक्त केला.
काचेवानी येथे अदानी फाऊंडेशनच्या वतीने उभारण्यात आलेल्या आर.ओ. प्लान्टचे उद््घाटन शुक्रवारी जिल्हाधिकारी काळे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते.सदर कार्यक्रमापूर्वी अदानी फाऊंडेशनच्या वतीने वनविभागाला विविध उपकरणांनी सुसज्ज अशी प्राणी बचाव व्हॅन भेट देण्यात आली. या व्हॅनमुळे आजारी किंवा जखमी प्राण्यांना वेळीच उपचार मिळण्यासाठी नेले जाणार आहे. या व्हॅनची चावी उपवनसंरक्षक जितेंद्र रामगावकर यांच्या सुपूर्द करण्यात आली. त्याबद्दल डॉ.रामगावकर यांनी अदानी समुहाचे आभार मानले. तसेच त्यांच्याकडे पर्यावरण संरक्षणासाठी आणि हिरवळ जपण्यासाठी परिसरात केल्या जात असलेल्या प्रयत्नांचेही त्यांनी कौतुक केले.
यावेळी उपवनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर, तिरोडा अदानी प्रकल्पाचे प्रमुख सी.पी.शाहू, जनरल मॅनेजर मोहन पांडे, सीएसआर युनिट हेड नितीन शिराळकर, सहायक गटविकास अधिकारी दुबे, काचेवानीच्या सरपंच गायत्री चौधरी, उपसरपंच पप्पू सय्यद, माजी सरपंच प्रमिला रहांगडाले यांच्यासह मोठया संख्येने गावकरी उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी काळे यांनी काचेवानीसारख्या गावात शुद्ध पाण्याचा प्रकल्प सुरू केल्याबद्दल तसेच परिसरातील ५० गावांमध्ये विविध उपक्रम राबवून सुविधा देत असल्याबद्दल अदानी समुहाचे उपाध्यक्ष अजित बारोडिया आणि महाव्यवस्थापक मोहन पांडे यांचे आपल्या भाषणातून आभार मानले. मुख्यमंत्र्यांच्या महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियानातही अदानी समुहाने दिलेल्या योगदानाचा त्यांनी प्रकर्षाने उल्लेख केला.