शिरढोण साहित्य परिषद आणि कवितासागर साहित्य अकादमी, जयसिंगपूर

0
21

‘संवाद’ ग्रामीण साहित्य संमेलन 2016 अध्यक्षीय भाषण

शिरढोण साहित्य परिषद, शिरढोण आणि कवितासागर साहित्य अकादमी, जयसिंगपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘संवाद’ ग्रामीण साहित्य संमेलनाचे संस्थापक, संयोजक, महिला, ज्येष्ठ नागरिक सन्माननीय निमंत्रित तसेच या संमेलनास खास करून उपस्थित राहिलेले सन्माननीय विद्वान, पत्रकार, शिक्षण तज्ञ, संस्थाचालक, लेखक, कवी, ग्रंथकार, इत्यादि व माझ्या रसिक बंधू – भगिनींनो…

मराठी भाषेसारखी लवचिक, तरल, अर्थवाही, शुद्ध, स्वच्छ व प्रामाणिक भाषा नाही. मराठी वाङमय विविधतेने समृद्ध व सुरक्षितपणे जतन करून साहित्यक्षेत्रात पुराणे, चरित्रे, कथा, प्रबंध, काव्य, नाटके इत्यादि साहित्यकृती द्वारे ज्ञानवृद्धीस मदत होत आली आहे.मराठी साहित्य निर्मिती व अभिवृद्धी साधण्यासाठी एक नवा लेखक – कवी वर्ग उदयास येत आहे आणि त्यांचे प्रतिनिधी आज या संमेलनाच्या निमित्ताने येथे बहुसंख्येने उपस्थित झाले आहेत ही मोठी उपलब्धी आणि समाधानाची बाब आहे.

आज श्रद्धा, निष्ठांच्या बदलाने नीतिमुल्यांचा -हास होत आहे. जसे सामाजिक संदर्भ बदलतात तसे साहित्याचेही मूल्य बदलतात, संकल्पनाही बदलतात म्हणून साहित्य चळवळ संमेलनाच्या रूपाने घडवली जातात, जीवनात आनंद निर्माणाचा यत्न होतो. मानवी विकास हा मांगल्यानेच होऊ शकतो. साहित्यातील सौंदर्य – आशयाशी एकरूप व्हावा लागतो.नवसाहित्यिकांशी हितगुज करतांना मला असे वाटते की, काही चांगले कवी, कथाकार, नाटककार, कादंबरीकार व चरित्र – आत्मचरित्रकार निश्चितपणे परिसरात आहेत पण कुठेतरी त्यांची अनुभूती कमी पडते, परिश्रम फार कमी घेतले जातात, स्वतंत्र चिंतनाचा प्रत्यय येत नाही.

जीवन सृष्टीवरील प्रेमानेच अधिक जिवंत साहित्य निर्माण होऊ शकते. साहित्यात ताजेपणा, जिवंतपणा, वास्तवता अधिक असावी, आज साहित्याच्या आविष्काराचे तंत्र फार बदलत आहे त्याचा आत्मविश्वासाने स्वीकार करून साहित्यनिर्मिती व्हावी.आज मराठी साहित्यदेवतेची अनेक संप्रदायांनी, विचारवंतांनी पूजा बांधली असल्याचे ‘संवाद’ ग्रामीण साहित्य संमेलनाच्या रूपाने शिरढोण येथे ही पूजा दृष्टीस पडते कारण, माय मराठी हे आपल्या सर्वांचे लाडके दैवत आहे.

बालवाङमय तुलनेने फार कमी हाताळले जाते. संस्कारक्षम वयातील मुलांना सद् विचार – आचार यांना पोषक साहित्य या वयात अत्याधुनिक दृकश्राव्य माध्यमांच्या स्पर्धेत त्यांच्या हाती पडणे आवश्यक आहे. त्यासाठी पालक वर्ग सुज्ञ – विचारी आणि सुसंस्कृत असणे काळाचीच गरज आहे, उत्तम साहित्यिकांची त्यादृष्टीने फार मोठी जबाबदारी आहे.

साहित्य रसिक, माता – पित्यांना मी विनंती करू इच्छितो की, आपल्या घरी स्वतः मराठीतच बोलण्याची सवय ठेवावी आणि मुला – मुलींच्या हाती सात्विक – सद् विचार आणि अहिंसक वृत्तींना प्रेरक मराठी साहित्य ठसेल असा प्रयत्न करावा. मातृभाषेविषयी त्यांना आदर व अभिमान वाटावा, त्यातील चांगले विचार आत्मसात करावे, मराठीच्या सुरक्षा व अभिवृद्धीसाठी मी संवाद ग्रामीण साहित्य संमेलनाच्या निमित्ताने ग्रामस्थांना विनंती करतो कारण आता जे थोडेफार बाकी आहे ते त्यांच्याच हाती आहे.

शिरढोण येथील ‘संवाद’ ग्रामीण साहित्य संमेलन गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या हिरीरीने आणि उत्साहाने आयोजित होत आले आहे. पंचक्रोशीतील साहित्यिक, कलावंत, लेखक, कवी आणि सामाजिक बांधिलकीची जाण असलेला चोखंदळ रसिकवर्ग यांचा सुखद सुसंवाद घडवून आणण्यासाठी विश्वास बालिघाटे, दिलीप कोळी, डॉ. कुमार पाटील, महादेव पाणदारे आणि प्रकाशक डॉ. सुनील दादा पाटील ही मंडळी यशस्वी प्रयत्न करीत आहेत.

सन्माननीय मान्यवरांचे यथोचित आतिथ्य, गौरव आणि प्रोत्साहन देऊन आपल्या कार्यात सामील करून घेण्याचे महतकार्य आज शिरढोण साहित्य परिषद – शिरढोण, कवितासागर साहित्य अकादमी जयसिंगपूर, गावातील आबालवृद्धांनी आणि महिलांनी हा आनंदोत्सव साजरा करीत असलेचे पाहून विस्मय वाटतो, शिरढोण गावातील प्रत्येक घटक कार्यप्रवण झालेला दिसतो.

शिरढोण साहित्य परिषद, शिरढोण आणि कवितासागर साहित्य अकादमी, जयसिंगपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘संवाद’ ग्रामीण साहित्य संमेलनाने विविध क्षेत्रात काम करणा-या कुशल व्यक्तींचा शोध घेऊन त्यांचा आपल्या विचारमंचावर गौरव करून त्यांच्या कार्याची दाद घेतली. मग तो लेखक, साहित्यिक, संपादक, प्रकाशक, कवी, उद्योगपती, कारखानदार, समाजसेवक, पत्रकार यांच्यातील सद् गुण समुच्चयाचा शोध त्यांचा यथोचित मान सन्मान या विचारमंचावर होत आला आहे.
अत्यंत तळमळीने, निष्ठेने, निस्वार्थबुद्धीने गांवपातळीवर अशा प्रकारचा सुसंवाद साधण्यास दिवस – रात्र एक करून कार्य करणा-या कार्यकर्त्यांना मी विनम्रतापूर्वक वंदन करू इच्छितो.
या मंडळीने केवळ साहित्य संमेलन करून विराम दिला नाही तर सुसज्य ग्रंथालय, महिलांच्या उन्नती आणि सुरक्षिततेसाठी, लघुउद्योग, व्यवसायाची दृष्टी ठेवली, ज्येष्ठांसाठी त्यांच्या सुखदु:खाच्या निवारणासाठी आणि ज्येष्ठांच्या प्रदीर्घ अनुभव संपन्नतेचा सदुपयोग करून गावाच्या उन्नतीचा मार्ग स्वीकारला आहे.
वाचन संस्कृती संवर्धनाचा प्रयत्न ‘संवाद’ ग्रामीण साहित्य संमेलनाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून तळमळीने आणि अत्यंत निष्ठेने केले जात आहे. आज ‘वाचाल तर वाचाल’ या उक्तीप्रमाणे शिरढोण गावच्या भावी पिढीकरिता अहोरात्र कार्यरत असलेल्या, समाजहित दक्ष अशा कार्यकर्त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
आज शिरढोण गावात समृद्ध वाचनालय आहे, ज्यात जवळपास पंधरा हजार ग्रंथ विविध विषयांनी भरलेले आहेत. आता फक्त या ग्रंथांचा अधिकात अधिक उपयोग कसा करून घेता येईल हा प्रश्न आहे, विविध स्वरूपाचे वाचन, लेखन, वक्तृत्व स्पर्धांच्या आयोजनातून विद्यार्थ्यांना व पालकांना आकर्षित करून आवड वाढविण्यावर भर दिला जावा असे मला वाटते.
‘संवाद’ ग्रामीण साहित्य संमेलनातून सामाजिक, जीवन, संस्कार, समता, बंधुता यांचा पुरस्कार व्हावा ही अपेक्षा असते, वाचन लेखनांसाठी प्रमाणभाषेचाच अंगीकार करावा असे मुळीच नाही.
ग्रामीण भाषा ही अधिक जवळची, जिव्हाळ्याची आणि भाव – भावना व्यक्त करण्याचे अत्यंत प्रभावी साधन आहे.
आज ग्रामीण साहित्य अधिक प्रभावी ठरत आहे. असंख्य लेखक, कवी आपले विचार प्रकर्षाने आपल्या ग्रामीण साहित्यकृतींमधून व्यक्त करतांना दिसतात ही उज्ज्वल भविष्याचीच लक्षणे आहेत. सहकार्याची भावना ग्रामीण साहित्य संमेलनातून नक्कीच वाढीस लागते.
शिरढोण गांव हे साहित्य प्रेमींचे माहेरघर आहे. महिला – भगिनी अत्यंत उत्साहाने दीपोत्सवाला लाजवेल असा हा साहित्याचा आनंद महोत्सव पार पाडतांना दिसतात. सडासम्मार्जन करून रांगोळीची आरास आणि भव्य – दिव्य मंगल अशा ग्रंथ दिंडीत सहभागी ग्रामस्थ व साहित्यिकांचे स्वागत करण्यास उत्सुक असतात. साहित्य संमेलनाची शोभा त्यांच्या उपस्थितीने फुलून येते. त्यांचा उत्साह पाहून संपूर्ण शिरढोण गांव चैतन्याने बहरून आले ही कौतुकास्पद बाब आहे. खरे साहित्य ते की, ज्यात भाव, अर्थ, रस आणि सौंदर्य यांनी ओथंबलेल्या शब्दांची, मनाला आकर्षून घेणारी परिणामकारक रचना म्हणजे साहित्य म्हणता येईल.
ग्रामीण भागातील लेखक – कवी यांचे साहित्य ख-या अर्थाने अस्सल व चिरकाल टिकणारे आहे. छोटी ग्रामीण साहित्य संमेलने ही ख-या अर्थाने मराठी भाषा टिकविण्याचे काम करतात. ग्रामीण साहित्य संमेलने ही सांस्कृतिक विकासाची केंद्रे आहेत.

माणसाला दिलेली विशिष्ट जीवनदृष्टी, जीवनमूल्ये व जीवन पद्धती आणि समता, एकात्मतेची भावना याचे निखळ ज्ञान प्रभावीपणे सर्व सामान्यांच्यापर्यंत पोचविण्याची जबाबदारी आपणासर्वांवर आज आहे. म्हणून विश्वशांती आणि प्रेम, सद् भावना आणि सद् विचार यांच्या मिलनाने चिंब झालेली शब्द रचना तुमच्या साहित्यातून अखंडपणाने बरसत राहो ही अपेक्षा व्यक्त करतो.

‘संवाद’ ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी माझी पात्रता नसून आपण टाकली, ‘संवाद’ ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद एक सन्मान नसून माझ्यावर जाणीवपूर्वक सोपवलेली एक वाङमयीन व सांस्कृतिक जबाबदारी आहे आणि ती मी विश्वासपूर्वक पार पाडेन अशी आपणास ग्वाही देतो. आजचा मंगल दिवस आपल्यासारख्या रसिकांच्या सहवासात व साहित्य चिंतनात करण्याची दुर्मिळ संधी मला मिळाली, मी धन्य झालो.

जास्तीत जास्त मराठी रसिकांनी अशा प्रकारच्या संस्मरणीय साहित्य संमेलनाचा लाभ घ्यावा, भविष्यात ‘संवाद’ ग्रामीण साहित्य संमेलन हे एका वेगळ्या वैचारिक उंचीवर निश्चितच जाईल असे मला वाटते कारण काही वर्षापूर्वी नव्याने कथा – कविता लिहू पाहणा-यांना हा मंच उपलब्ध करून दिला आणि आज त्याचे स्वरूप अत्यंत व्यापक असे झाले आहे. ‘संवाद’ ग्रामीण साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आपण माझे विचार आत्मसात केलेत याबद्दल मी आपला ऋणी आहे.

जय हिंद – जय महाराष्ट्र!
– प्रा. प्रवीणकुमार हेमचंद्र वैद्य,संमेलनाध्यक्ष,संवाद ग्रामीण साहित्य संमेलन, शिरढोण (9766581353, 9975873569)