समकालीन वास्तव टिपण्याचे सार्मथ्य निर्माण करा : डॉ. ऑम्व्हेट

0
6

वर्धा berartimes.com दि.१२: महात्मा फुलेंचे विचार समग्र मानवी विश्‍वाला कवेत घेणारे असून जात व धर्मात बंदीस्त होणारे नाही. त्यामुळे लेखक, कलावंतांनी महात्मा फुलेंपासून प्रेरणा घेऊन समकालीन वास्तव टिपण्याचे सार्मथ्य निर्माण करावे, असे प्रतिपादन प्रसिद्ध संशोधक व लेखिका डॉ. गेल ऑम्व्हेट यांनी अखिल भारतीय सत्यशोधक, साहित्य व संशोधन परिषदेतर्फे शिववैभव सभागृहात व्यंकटराव गोडे साहित्यनगरीत आयोजित दहाव्या सत्यशोधकी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून त्या बोलत होत्या.
शहरातील बॅचलर रोड वरील शिव वैभव सभागृहात आयोजित दहाव्या सत्यशोधकी साहित्य संमेलनाची सुरुवात शनिवारी सकाळी गं्रथ दिंडीने करण्यात आली. ही दिंडी सत्यशोधक व्यंकटराव गोडे साहित्य नगरीतून काढण्यात आली. या दिंडीने शहरातील मुख्य मार्गाने मार्गक्रमण केले. या दिंडीत विविध ठिकाणाहून आलेल्या सत्यशोधक साहित्यिक सहभागी झाले होते.
प्रसिद्ध नाटककार व संपादक ज्ञानेश महाराव यांच्या हस्ते संमेलनाचे उद््घाटन झाले. यावेळी स्वागताध्यक्ष डॉ. शिरीष गोडे, माजी संमेलन अध्यक्ष नागेश चौधरी, उत्तमराव पाटील, महिला काँग्रेस कमिटीच्या प्रदेश अध्यक्ष चारुलता टोकस, डॉ. श्रीराम गुंदेकर, प्रा. नुतन माळवी, अखिल भारतीय सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष डॉ. अशोक चोपडे, गुणवंत डकरे आदी उपस्थित होते.
पुढे डॉ. गेल ऑम्व्हेट म्हणाल्या, सत्यशोधकी साहित्य हे मुलत: विज्ञाननिष्ठ असून समतेचे स्वप्न उराशी बाळगून साहित्याच्या वेगवेगळ्या क्षेत्रात नवे विचार मांडणारा आहे. महात्मा फुलेंनी मानसांचा केवळ एकमयतेचा नव्हे तर मानव व निसर्ग संबंधाचा एकमयतेचा मुलभूत विचार मांडला. जंगल, पाणी, शेत, प्राणी व पक्षांबरोबर प्रेमाचे, मैत्रीचे आणि एकतेचे नाते निर्माण करण्यासाठी प्रेरणादायी साहित्य निर्माण केले व समतेचे पर्याय आपल्यापुढे ठेवले. मात्र आज जात व धर्माच्या दुराभिमान वाढू लागला. जाती व्यवस्था नष्ट होण्याऐवजी ती आणखी घट्ट होताना दिसते. त्यामुळे लोकशाही व्यवस्थेला बळकट करण्यासाठी सत्यशोधकी लेखकांनी केवळ बंडखोरी नव्हे तर सकारात्मक समाजनिर्मितीचा व्यापक विचार कलाकृतीतून मांडला पाहिजे, असे सांगितले. याप्रसंगी ज्ञानेश महाराव म्हणाले, महात्मा फुलेंची ग्रंथ संपदा कालातीत आहे. त्यांनी मराठी लेखनाचे सर्व प्रकार मोठय़ा ताकदीने हाताळले. विषमतावादी व्यवस्थेवर प्रखर हल्ला करून भारतीय समाजाला जागे केले. आज अनेक समस्या असून समस्यांचे अंतरग लक्षात घेऊन सत्य सांगण्याचे धाडस लेखकांनी करावे. कारण स्वप्न रंजनाचे साहित्य उपयोगाचे नसून लोकाभिमूख साहित्य चिरकाल टिकणार आहे, असे सांगितले.
यावेळी स्वागताध्यक्ष डॉ. शिरीष गोडे यांनी वर्धा जिल्ह्यातील सत्यशोधक चळवळीचा इतिहास सांगितला. संयोजक डॉ. अशोक चोपडे यांनी संमेलनाची भूमिका विषद केली तर डॉ. गुंदेकर व चारुलता टोकस यांनी मनोगत व्यक्त केले. माजी संमेलनाध्यक्ष नागेश चौधरी यांनी संमेलनाध्यक्ष डॉ. गेल ऑम्व्हेट यांना भारतीय संविधानाची प्रत देऊन सत्यशोधकी साहित्य संमेलनाचे सूत्र सोपविले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते संमेलनाची स्मरणिका व ६ ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे पंजाबराव कुडे, शालिग्राम गवळी, महादेव भुईभार, विठ्ठल बुचे, डॉ. रा.गो. उकेकर, एन.टी. मुसाफीर, चंद्रशेखर इंगोले, डॉ. सुभाष खंडारे, बाबासाहेब गलाट, पुंडलिक केळझरकर, अवचित सयाम, प्रा. दत्तानंद इंगोले, इक्राम हुसेन, शारदा झामरे, नारायण आमटे आदींना स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. संचालन गिरीधर कोठेकर, संगिता ताटेवार यांनी केले. आभार गुणवंत डकरे यांनी मानले. उद््घाटन सत्रानंतर दुपारी २ वाजता सत्यशोधकी साहित्य आणि सामान्य माणूस या विषयावर परिसंवाद झाला. त्यात अँड़ सुभाष निकम, प्रा. जी.ए. उगले, प्रा. जावेश पाशा, डॉ. विजय कुवठेकर यांनी विचार मांडले.

<>