MPSC परीक्षेत भूषण अहिरे राज्यात पहिला

0
18

पुणे, दि. 16 – महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी)घेण्यात आलेल्या राज्य सेवा (मुख्य) परीक्षा 2016चा अंतिम निकाल गुरुवारी जाहीर झाला.या परीक्षेत नाशिक जिल्ह्यातील भूषण अशोक अहिरे याने राज्यात प्रथम कमांक पटकवला आहे. तर सातारा जिल्ह्यातील पूनम संभाजी पाटील हिने महिलांमधून प्रथम क्रमांक मिळवला आहे.
भूषण अहिरे अभियांत्रिकी विद्याशाखेचा पदवीधर असून त्याची उपजिल्हाधिकारी पदाकरिता निवड झाली आहे. तर पूनम पाटील हिची पोलीस उपअधीक्षक / सहाय्यक पोलीस आयुक्त या पदाकरिता निवड झाली आहे. एमपीएससीतर्फे 10 एप्रिल 2016 रोजी मुंबईसह राज्यातील 37 जिल्हा केंद्रांवर राज्य सेवा (पूर्व)परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेस 1 लाख 91 हजार 563 उमेदवारांना प्रवेश देण्यात आला होता. पूर्व परीक्षेतील निकालाच्या आधारे 1 हजार 575 उमेदवार मुख्य परीक्षा देण्याकरिता यशस्वी ठरले होते. एमपीएससीतर्फे मुंबईसह, औरंगाबाद, नागपूर व पुणे या चार जिल्हा केंद्रांवर 24 ते 26 सप्टेंबर 2016 या कालावधीत मुख्य परीक्षा घेण्यात आली. मुख्य परीक्षेच्या निकालाच्या आधारे 418 उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात आले होते. पात्र उमेदवारांच्या 16 ते 24 जानेवारी 2017 या कालावधीत मुलाखती घेऊन गुरुवारी अंतिम निकाल एमपीएससीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला.
एमपीएससीतर्फे रज्यभरातील एकूण 130 राजपत्रिक अधिका-यांच्या पदांसाठी यशस्वी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. त्यात गट अ च्या 71 उमेदवार, गट ब च्या 59 उमेदवारांचा समावेश आहे. यशस्वी उमेदवारांमधून 34 महिला उमेदवारांची व 2 अपंग उमेदवारांची शिफारस शासनाकडे करण्यात आली आहे.