बेचिराख झालेल्या कुटुंबाच्या मदतीला ‘खाकी’ धावून जाते तेव्हा….

0
12

गडचिरोली, दि.४: अपार कष्ट आणि मोठ्या हिंमतीनं चाललेला संसाराचा गाडा एका क्षणात बेचिराख होतो, तेव्हा त्या कुटुंबीयांची अवस्था कशी झाली असेल, या प्रश्नाने दामरंचा उपपोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांचे मन गहिवरले आणि काही तासांच्या आतच कोलमडलेले संसाराचे झाड पोलिसांच्या मदतीने पुन्हा ताठपणे उभे राहिले.
हो, खाकी वर्दीची ही माणुसकी अनुभवली नैनगुंडम येथील वसंत सोनू शेगम नामक व्यक्तीच्या कुटुंबीयांनी. दामरंचा उपपोलिस ठाण्यांतर्गत नैनगुंडम येथील वसंत शेगम नामक गरीब व्यक्तीच्या घराला २७ मार्च रोजी अचानक आग लागली. या आगीत वसंतचे अख्खे घर बेचिराख झाले. भांडी निरुपयोगी झाली, कपड्यांची राख झाली, अन्नाचा कणही शिल्लक राहिला नाही. त्यामुळे अंगावर घातलेल्या कपड्यांवरच वसंतची पत्नी आणि चिमुकली पाच मुले घराबाहेर पडली. वसंतच्या कुटुंबीयांवर ओढवलेल्या आपत्तीची माहिती मिळताच दामरंचा उपपोलिस ठाण्यातील पोलिसांनी थेट नैनगुंडम हे गाव गाठून वसंतच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
जिमलगट्टाचे उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दामरंचा उपपोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विलास मोरे, पोलिस उपनिरीक्षक अनिल लवटे, अभिजीत भोसले, नागनाथ पाटील, गणेश मोरे आणि अन्य कर्मचाऱ्यांनी आर्थिक मदत गोळा करण्यास सुरुवात केली. गोळा झालेल्या रकमेतून त्यांनी संसारोपयोगी भांडी, कुटुंबातील सर्व सदस्यांना कपडे आणि किराणा सामानाची खरेदी केली. त्यानंतर हे सर्व साहित्य वसंतच्या कुटुंबीयांना दिले. यामुळे हतबल झालेले त्याचे कुटुंब पुन्हा संसाराचा गाडा हाकण्यास समर्थ झाले. दामरंचा पोलिसांनी दाखविलेल्या या औदार्याचे सर्वत्र कौतूक होत आहे.