जेष्ठ व्यंगचित्रकार आर.के लक्ष्मण कालावश

0
17

पुणे, दि. २६ – ख्यातनाम व्यंगचित्रकार आर.के लक्ष्मण यांचे पुण्यात वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले आहे. गेले काही दिवस त्यांची प्रकृती चिंताजनक होती. आठ दिवसांपूर्वी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. आर.के फुफ्फुस व किडनीच्या विकाराने त्रस्त होते. तसेच काही दिवसांपूर्वीच त्यांचे डायलिसिस करण्यात आल्याचे समजते. कॉमन मॅन हे त्यांचे गाजलेले व्यंगचित्र. कॉमनमॅन या व्यंगचित्रामुळेच व्यंगचित्रकार म्हणून त्यांची देशभर ओळख निर्माण झाली. त्याचप्रमाणे ‘टनेल ऑफ टाइम’ हे आत्मचरित्र मराठीत ‘ लक्ष्मण रेषा’ म्हणून प्रसिद्ध आहे. २०१० साली झालेल्या पक्षघाताने त्यांना नीट बोलता येत नव्हते. परंतू त्यांनी आपल्या व्यंगचित्रांच्या रेखाटनामध्ये व्यत्यय येऊ दिला नाही.
रासिपुरम कृष्णस्वामी लक्ष्मण असे त्यांचे पूर्ण नाव होते. २४ ऑक्टोबर १९२४ रोजी म्हैसुर येथे त्यांचा जन्म झाला होता. त्यांचे वडील एका महाविद्यालयात प्राचार्य होते. अतिशय सुशिक्षित आणि समृद्ध अशा कुटुंबात त्यांचा जन्म झाला. मोठे बंधु प्रसिध्द लेखक आर.के नारायण यांनी त्यांच्यातील व्यंगचित्रकलेला प्रोत्साहन दिले. पुढे मुंबईतील सर जे.जे. कला माहाविद्यालयात व्यंगचित्रकलेसाठी त्यांना प्रवेश नकारण्यात आला होता. पुन्हा म्हैसुर येथे जाऊन त्यांनी बी.ए पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले व मुंबईत आल्यावर अनेक नावाजलेल्या वर्तमानपत्रांतून आपल्या व्यंगचित्रांची भुरळ वाचकांवर कायम ठेवली. त्यांना पद्मविभुषण, पद्मभुषण, रेमनमॅगॅसेसे आणि इतर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्वाचे पुरस्कार मिळाले. आर.के नारायण यांच्या मालगुडी डेज या पुस्तकासाठीही त्यांनी व्यंगचित्र काढली होती. ‘द सर्व्हंट्स ऑफ इंडिया’, हॉटेल रिवेरा या पुस्ताकांव्यतिरिक्त ‘द मेसेंजर’ व ‘द एलोक्युएंट ब्रश’ इत्यादी पुस्कं प्रसिद्ध आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची राजकीय काराकिर्द सुरु होण्यापूर्वी आर. के व बाळासाहोबांनी व्यंगचित्रकार म्हणून एकत्र काम केले होते.२६ जानेवारी २०१५ रोजी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्यांचे पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात त्यांचे निधन झाले. ५० वर्षांहून अधिक काळ महत्वाच्या वर्तमानपत्रात ते व्यंगचित्र काढत होते.