गोंदिया : पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी कारंजा येथे तालुका बीज गुणन व कृषि चिकित्सालय परिसरात विकसित होत असलेल्या कृषि पर्यटन केंद्राला भेट देऊन पाहणी केली.
या केंद्रातील सेंट्रलाईज ईरिगेशन सिस्टिम, मल्चिंग व ठिबक पद्धतीने डाळींब व ऊस लागवड, ट्रॅक्टरद्वारे पेरणी, ठिबक सिंचनावर आधारित उन्हाळी शेती, दीड कोटी लिटर क्षमतेच्या शेततळ्याच्या माध्यमातून संरक्षित सिंचन, मोगराबांध पद्धतीतून मत्स्यबीज उत्पादन, भाताच्या बांधित सिंगाडाशेती, ठिबक सिंचनाच्या माध्यमातून एक डोळा पद्धतीने ऊस लागवड आणि नायलॉन जाळीद्वारे शेतातील पिकांचे संरक्षण आदीची पाहणी पालकमंत्र्यांनी केली. अशा आधुनिक शेती पद्धतीच्या प्रकारातून कृषि पर्यटनाला चालना मिळेल. तसेच अनेक शेतकरी या केंद्राच्या प्रेरणेतून आधूनिक शेतीकडे वळतील, असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.
विकसित होत असलेल्या कृषि पर्यटन केंद्राबाबतची माहिती पालकमंत्र्यांना जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अशोक कुरील यांनी दिली. यावेळी आमदार विजय रहांगडाले, विनोद अग्रवाल, उपविभागीय कृषि अधिकारी श्री. नाईकवाड, कृषि पणन तज्ज्ञ श्री. शिंदे, कृषि पर्यवेक्षक श्रीमती पटले, कृषि उपसंचालक श्रीमती भोपळे, उपप्रकल्प व्यवस्थापक श्रीमती फाडके, कृषि तंत्रज्ञ व व्यवस्थापक राहूल सेंगर, पद्माकर गिदमारे आदी उपस्थित होते.